इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, १० जानेवारी, २०२२

खाद्यपदार्थ वर्तमानपत्राच्या कागदातुन दिल्यास विक्रेत्यांवर होणार कारवाई तपासणीसाठी अन्न सुरक्षा अधिकारी यांची पथके तैनात

 


कोल्हापूर, दि.10 (जिमाका) : विविध खाद्यपदार्थ उदा. बटाटे वडे, भजी, समोसे, कचोरी, भेळ, इडली, पोहे, कच्छी दाबेली, पॅटीस, मसाला टोस्ट तसेच जिलेबी वैगेरे तयार करून विकणारे अन्न व्यावसायिक हे खाद्यपदार्थ तयार करून ग्राहकांना वर्तमानपत्राच्या अथवा मासिकांच्या पानांमधून देताना आढळल्यास त्यांच्यावर अन्न सुरक्षा व मानदे कायदा, २००६ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या कागदांच्या वापरास कायद्यानुसार बंदी आहे. याप्रकारच्या खाद्यपदार्थांचे व्यावसायिक हे तरतुदींचे पालन करत असल्याची शहानिशा करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने अन्न सुरक्षा अधिकारी यांची पथके तैनात केली असून सध्या त्यांच्या मार्फत वरील प्रकारच्या विविध अन्न व्यावसायिकांची तपासणीची मोहीम सुरू आहे, अशी  माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर यांनी दिली.

हातगाडीवर किंवा एखादा खाद्यपदार्थ तयार करून विकणाऱ्या, स्नॅक सेंटर, मिठाई दुकानातून, हॉटेल अथवा उपहारगृहामध्ये बटाटे वडे, भजी, समोसे, कचोरी, भेळ, इडली, पोहे, कच्छी दाबेली, पॅटीस, मसाला टोस्ट अथवा जिलेबी यासारखे खाद्यपदार्थ तयार करून ते ग्राहकांना विकताना जर वर्तमानपत्रातून किंवा मासिकांच्या पानामधून देताना आढळल्यास अशा अन्न  व्यावसायिकांवर अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत कडक कारवाई करण्यात येणार आहे. हे कृत्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरू शकते.

वर्तमानपत्रासाठी वापरण्यात येणारी छपाईची शाई ही डायआयसो ब्युटाईल फ्थालेट, डायमिथाईल सल्फोक्साइड, न्याफ्थाईल अमाईन अॅरोमॅटिक हायड्रोकार्बन, मिनरल ऑईल, रेसीन्स व लेड यासारख्या केमिकलयुक्त रासायनिक पदार्थांपासून बनवलेली असल्याने व ही केमिकल्स तेलामध्ये विरघळणारे असल्याने छपाईची शाई ही खाद्यपदार्थांचे सेवन करताना आपल्या पोटामध्ये जाऊन त्यामुळे आतड्यांना ईजा होऊ शकते. त्यामुळे खाद्यपदार्थ जरी चांगला असला तरी तो याप्रकारचा कागद वापरल्याने विषारी शाईमुळे दूषित होतो व अशा दूषित पदार्थाच्या वारंवार सेवनामुळे त्वचारोग होण्याची शक्यता असते. तसेच किडनीचे आजार अथवा विविध कॅन्सर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे वरील व्यवसाय करणाऱ्या अन्न व्यावसायिकांनी ग्राहकांना खाद्यपदार्थ देताना ते वर्तमानपत्र अथवा मासिकांच्या पानामधून गुंडाळून अथवा पार्सल स्वरुपात न देता कोणतीही छपाई नसलेल्या कोऱ्या  पेपरमधून अथवा खाकी कागदातून द्यावेत, ज्यामुळे खाद्यपदार्थ दूषित होणार नाहीत.

गृहीणींनीही चपाती ठेवण्याच्या बुट्टी/भांड्यामध्ये वर्तमानपत्राचा अथवा मासिकाचा कागद वापरू नये त्या ऐवजी स्वच्छ कापडाचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले  आहे.

 

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.