इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, १८ जानेवारी, २०२२

सामान्यांच्या न्यायासाठी संघर्ष करणारं नेतृत्व हरपलं ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रा. एन.डी. पाटील यांना श्रद्धांजली..

 



 



कोल्हापूर, दि.18 (जिमाका):  ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील सर हे राज्यातील राजकीय आणि सामाजिक प्रश्नांची जाण असणारं चालतं-बोलतं विद्यापीठ होते. शेतकरी, कष्टकरी, सामान्य, वंचित, दुर्बलांचा कळवळा असणारं आणि समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करणारं नेतृत्व आपल्यातून हरपलं आहे, अशा भावपूर्ण शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली.

            ज्येष्ठ नेते, विचारवंत प्रा.एन.डी. पाटील यांचे काल वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज  कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालयाच्या प्रांगणात दिवंगत प्रा. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण केला. तद्नंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

            दिवंगत एन. डी. पाटील यांच्याविषयी भावना व्यक्त करताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा आणि वसा प्रा. एन. डी. पाटील सरांनी आयुष्यभर जपला. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श आणि विचार घेऊन त्यांनी तळागाळातील मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी आपले आयुष्य वेचले. पुरोगामी विचारांचा चेहरा असलेले प्रा. एन. डी. पाटील आज आपल्यात नाहीत, हे मनाला क्लेशदायकच आहे. शेतकरी कामगार पक्षाची बांधिलकी त्यांनी अखेरपर्यंत जपली असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

संघर्षाचं दुसरं नाव प्रा. एन. डी. पाटील..!

            जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रा. एन. डी. पाटील सरांनी

सतत संघर्ष केला. अन्यायाविरुध्द आवाज उठवून न्याय मिळेपर्यंत त्यांनी संघर्ष सोडला नाही, म्हणून  संघर्षाचं दुसरं नाव प्रा. एन. डी. पाटील असेच म्हणावे लागेल, अशा भावपूर्ण शब्दात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी भावना व्यक्त केल्या. कोणत्याही प्रकारच्या लढ्यात ते स्वत:ला झोकून देवून लढा यशस्वी करण्यासाठी अग्रही राहत असत. मराठा आंदोलन,  महाराष्‍ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न, विजेचा प्रश्न, शेतकरी व कामगार वर्गाचे प्रश्न आणि कोल्हापूर येथील टोलच्या प्रश्नात त्यांचे मोठे योगदान आहे. राज्यात सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी सामान्यांच्या न्यायासाठी ते नेहीमीच अग्रही राहिले आहेत. स्वत:च्या मतावर ठाम राहून त्यांनी अनेक घटकांसाठी न्याय मिळवून दिला आहे. प्रसंगी स्वत:च्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करुन वंचितांच्या न्यायासाठी ते अहोरात्र झटले. त्यांच्या निधनाने आम्हा तरुणांचे मार्गदर्शक हरपले आहेत, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेल्या या पुरोगामी नेतृत्वाने राज्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा निर्माण केला. समाजातील वंचित, दुर्बल घटकांना न्याय मिळवून देवून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडविणे, हीच दिवंगत प्रा. एन. डी. पाटील सरांना श्रद्धांजली ठरेल, अशा भावनाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी व्यक्त केल्या.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.