इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, १३ जानेवारी, २०२२

अवैध सावकारी बाबत तक्रार करावी

 


 

          कोल्हापूर, दि. 13 (जिमाका): अवैध सावकारीमुळे आर्थिक पिळवणूक अगर स्थावर मालमत्ता, शेती, जमीन सावकाराने बळकाविली असल्यास जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयास संपर्क साधण्याचे किंवा तक्रार अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी केले आहे.

अनधिकृत सावकारी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याच्या उद्येशाने तसेच सावकारी व्यवसायावर योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम,2014 ची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याबाबत जिल्हास्तरावर त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी हे  या समितीचे अध्यक्ष असून जिल्हा पोलीस प्रमुख हे सदस्य तर समितीचे सहकारी संस्थेचे  जिल्हा उपनिबंधक हे सदस्य सचिव आहेत.

या समितीची नुकतीच सभा घेण्यात आली. अवैध सावकारीच्या पाशात अडकलेल्या नागरिकांनी समितीकडे  मदतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी या बैठकीत केले.

सभेस जिल्हाधिकारी राहुल रेखावार, स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव व सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे उपस्थित होते.

          जिल्हयात अवैध सावकारीच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या तक्रार अर्जांवर कार्यवाही करण्यात येत आहे. काही प्रकरणांत प्रत्यक्ष सावकाराच्या राहत्या घरी, दुकान अगर व्यवसायाच्या ठिकाणी विहीत पध्दतीने पथक गठीत करुन धाडी टाकण्यात आल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र सावकारी (नियमन)अधिनियम 2014 या कायद्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने 51 खासगी सावकारांवर धाडी टाकण्यात आल्या असून 16 खासगी सावकारांवर अवैद्य सावकारीच्या अनुषंगाने कागदपत्र, दस्तऐजव आढळल्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

00000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.