** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, August 2, 2019

'वारणा अर्बनमुळे' सर्वसामान्यांच्या गरजा पूर्ण -कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत





       कोल्हापूर, दि. 2 (जि.मा.का.) : तरूणांनी सकारात्मक भूमिका ठेवल्यास विश्वासाला गवसणी घालता येते. त्यासाठी योग्य रस्ता निवडायला हवा. कर्तृत्वावर श्रेष्ठत्व ठरत असतं. यातूनच गावातील तरूणांनी एकत्र येऊन वारणा अर्बन मल्टिपल निधी लिमिटेडची सुरूवात केली.यामुळे सर्वसामान्यांच्या गरजा आता पूर्ण होतील, अशी अपेक्षा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली.
       अमृतनगर पारगाव येथे आज वारणा अर्बन मल्टिपल निधी लिमिटेडचे उद्घाटन कृषी राज्यमंत्री  श्री. खोत यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या पूजनाने करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना कृषी राज्यमंत्री श्री. खोत पुढे म्हणाले, गावातील रयतेच्या अर्थव्यवस्थेचा पाया छत्रपती शिवाजी महाराजांनी रचला आहे. शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारधारेतून महाराष्ट्राला पुरोगामी दृष्टिकोन लाभला आहे. सहकार पंढरी म्हणून राज्याची ओळख आहे. थोर साधू संतांचा वारसा आणि वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक कर्तबगार व्यक्तींनी आपला ठसा उमटवला आहे.
          त्याच भूमिकेतून 'वारणा अर्बन'ची आज गावात सुरूवात झाली आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील माणसाची स्वतंत्र बँक आहे. वर्षभर लागणाऱ्या आपल्या गरजा तो पूर्ण करून ठेवतो. गावगाड्याची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी विकासाची गंगा त्यांच्यापर्यंत पोहचली पाहिजे. त्याच हेतूने गावातल्या तरूणांनी एकत्र येवून ही भरारी घेतली आहे. त्यामुळे निश्चितच सर्व सामान्यांच्या गरजा आता पूर्ण होतील, अशी अपेक्षाही  शेवटी त्यांनी व्यक्त केली.
          सचिव राजेंद्र घाडगे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. या उद्घाटन सोहळ्याला गोरक्षमठ शिराळा येथील अवघड पीर अनंतनाथ महाराज,अध्यक्ष विश्वास माने,उपाध्यक्ष राजकुमार जाधव, सागर खोत, अजितसिंह काटकर, पी.डी. पाटील, शिवाजी सिध्द, संभाजी चरणे, ए.बी.पाटील,वैभव कांबळे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
00000







No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.