** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, August 16, 2019

गावगाडा उभा राहण्यासाठी कर्ज वाढले तरी चालेल - कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत






कोल्हापूर दि.16 (जिमाका)  : ग्रामीण भागातील गावगाड्याला डोळ्यासमोर ठेवून शासन निर्णय घेत आहे, अजून कर्ज झाले तरी चालेल पण गावगाडा उभा राहिला पाहिजे, अशी भूमिका शासनाची आहे, असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.
       शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी येथील गुरुदत्त शुगर्स कारखान्यावरील पूरग्रस्तांच्या शिबीराला कृषीराज्यमंत्री श्री. खोत यांनी आज भेट दिली. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष माधवराव घाटगे, जयसिंगपूर नगराध्यक्ष डॉ. निता माने, विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, अशोकराव माने, धनाजी जगदाळे, राजवर्धन नाईक-निंबाळकर, राहूल घाटगे आदी उपस्थित होते.
            कृषीराज्यमंत्री श्री. खोत पुढे म्हणाले, पुर ओसरु लागला आहे. पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत शासन गायराण जमिनीचा विचार करत आहे. जनावरांची नुकसान भरपाई म्हणून 30 हजार रुपये देण्यात येत आहेत. पूरग्रस्तांना रोख 5 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदानही वाटप करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत देण्यात येणार आहे. या परिस्थितीत प्रशासनाने प्रचंड काम केलं आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गुरुदत्त शुगर्सने तसेच जनावरांसाठी शिबीर सुरु केल्याबद्दल त्यांनी अध्यक्ष माधवराव घाटगे यांचे अभिनंदन केले.
            पाणी पुरवठा योजना सुरळीत करण्यासाठी त्यांच्या दुरुस्तीचा खर्च शासन देणार आहे, असे सांगून श्री. खोत पुढे म्हणाले, माणसाला धीर देणं, उभं करणे महत्वाचं आहे, त्यासाठी ग्रामीण भागातील गावगाडा डोळ्यासमोर ठेवून शासन निर्णय घेत आहे. संक्रमण शिबीरातून जातानाही पुढील सात दिवस पुरेल इतकी शिधा सामुग्रीही देण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
            कारखान्याचे अध्यक्ष माधवराव घाटगे यावेळी म्हणाले, शिरोळ तालुक्यात येणारी नैसर्गिक आपत्ती दुष्काळग्रस्त भागात वळवण्यासाठी प्रयत्न व्हावेत. माण, खटाव, खानापूर, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ याभागामध्ये आपल्या जिल्ह्यात येणारे महापुराचे पाणी वळवावे, म्हणजे हा दुष्काळग्रस्त भाग  नंदनवन होईल, असे सांगून एनडीआरएफ, लष्कर, एसडीआरएफ, नौदल, वायुदल या सर्वांचे त्यांनी आभार मानले.
            यावेळी नगराध्यक्ष डॉ. माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पूरग्रस्त महिलांनी यावेळी कृषी राज्यमंत्री श्री. खोत यांना राखी बांधली. श्री. खोत यांच्याहस्ते‍ यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात रक्षाबंधनची भेट म्हणून साड्या वाटप केल्या.
 0 0 0 0 0 0 0 0

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.