** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, October 22, 2020

राधानगरी इको सेन्सेटीव झोन; अधिसूचना प्रसिध्द जिल्ह्यातील 26 आणि सिंधुदुर्गमधील 15 गावांचा समावेश वनसंरक्षक समाधान चव्हाण यांची माहिती

 




कोल्हापूर, दि. 22 (जिल्हा माहिती कार्यालय) : राधानगरी अभयारण्याच्या सिमेच्या चारही बाजूने 200 मीटर ते 6.01 कि.मी. पर्यंत विस्तारीत क्षेत्र करुन जिल्ह्यातील 26 गावांचा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 15 गावांना संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. याबाबत केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचना प्रसिध्द केली आहे, अशी माहिती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वन संरक्षक समाधान चव्हाण यांनी दिली.

          राज्य शासनाने 16 सप्टेंबर 1985 रोजी अधिसूचना काढून 351.16 चौ.किलो मीटर क्षेत्रावर राधानगरी वन्यजीव अभयारण्य जाहीर केले. 1986 ला पर्यावरण कायदा झाला. त्यानुसार अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने यांच्या बाहेरच्या सिमेपासून 10 किलो मीटरपर्यंत संवेदनक्षेत्र राहील अशी तरतुद करण्यात आली. त्यामुळे लोकांच्यावर बंधने आली. राज्य शासन, केंद्र शासन यांच्या मार्फत वेळोवेळी मार्गदर्शक सूचनांच्या आधारे उप वनसंरक्षक कोल्हापूर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील 26 गावे 15 हजार 039 हेक्टर क्षेत्र व सिंधुदुर्गमधील 15 गावे 10 हजार 26 हेक्टर क्षेत्र असे एकूण 25 हजार 066 हेक्टर क्षेत्रावर इको सेन्सेटीव झोन प्रस्तावित करुन 9 ऑक्टोबर 2019 ला केंद्र शासनाला पाठविण्यात आला होता.

            त्यावर 15 ऑक्टोबर 2020 रोजी अधिसूचना प्रसिध्द केली. राधानगरी अभयारण्याच्या सिमेच्या चारही बाजूने 200 मीटर ते 6.01 कि.मी. पर्यंत निश्चित केला. त्यामुळे राधानगरी अभयारण्यापासून 10 किलो मीटरच्या गावांमध्ये असणाऱ्या बंधनापासून थोडी सुटका मिळाली असल्याचे सांगून वनसंरक्षक श्री. चव्हाण यांनी सांगितले.

          राधानगरी वन्यजीव अभयारण्यामध्ये विविध प्रकारच्या वनस्पतीसह स्तनप्राण्यांच्या 47 प्रजाती सरीसुर्पांच्या 59 प्रजाती, उभचाऱ्यांच्या 20 आणि फुलपाखरांच्या 60 प्रजाती आढळतात. अभयारण्यात बिबट्या, रानमांजर, जंगली कुत्रे, शेकरु, गवा, पटेरी वाघ, हत्ती आदी आढळतात. अभयारण्याच्या विस्ताराचे क्षेत्रफळ 250.66 चौ. कि.मी. आहे. या क्षेत्रामध्ये व्यावसायिक उत्खनन, प्रदुषण उत्पन्न करणारे उद्योग, जल विद्युत प्रकल्प, लाकूड गिरण्या, विटभट्टी,प्लॅस्टिक पिशव्यांचा उपयोग, व्यावसायिक हॉटेल, प्रदुषण निर्माण करणारे लघु उद्योग, वृक्षतोड यावर निर्बंध असणार आहेत. स्थानिक नागरिकांना घरांच्या बांधणी आणि दुरुस्तीसाठी जमीन खुदाईला परवानगी असणार आहे.     

राधानगरी वन्यजीव अभयारण्याच्या विस्तारीत क्षेत्राच्या देखरेखीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 13 जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचा प्रतिनिधी, राज्य शासनाद्वारे नियुक्त वन्यजीव संरक्षक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनेचा प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण बोर्डाचे क्षेत्रीय अधिकारी, वरिष्ठ नगर योजनागार, महाराष्ट्र शासनाचा महसूल विभागाचा प्रतिनिधी, पाटबंधारे विभागाचा प्रतिनिधी, लोक निर्माण विभागाचा प्रतिनिधी, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वन संरक्षक, राज्य सरकार तर्फे नियुक्त पर्यारवण क्षेत्रातील विश्व विद्यालयातील पर्यावरण क्षेत्रातील विशेष तज्ञ, राज्य जैव विविधता बोर्डाचा सदस्य, सावंतवाडी विभागाचे उप वनसंरक्षक हे सदस्य तर कोल्हापूर विभागाचे उप वन संरक्षक हे सदस्य सचिव असणार आहेत.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.