कोल्हापूर दि. 23 (जिल्हा माहिती कार्यालय) :- कागल
नगरपरिषदेच्या हद्दीत असणाऱ्या 14 झोपडपट्यांचे कालबध्द नियमितीकरण करा, अशी सूचना
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिली.
येथील शासकीय विश्रामगृहात ग्रामविकास मंत्री
श्री. मुश्रीफ यांनी आज बैठक घेतली. बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, तहसिलदार
शिल्पा ठोकडे, कागल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडीत पाटील, अधीक्षक भूमी अभिलेख
डॉ. वसंत निकम, कनिष्ठ अभियंता सुनील माळी, महसूलच्या तहसिलदार रंजना बिचकर आदी
उपस्थित होते.
कागल नगरपरिषदेच्या हद्दीत वड्डवाडी गोसावी
वसाहत, कुरणे झोपडपट्टी/जगताप वसाहत, पसारेवाडी/बिरदेव वसाहत, बिरदेव वसाहत, मडीगेट
कॉर्नर, राजीव गांधी वसाहत, सांगाव नाका फुले वसाहत, मातंग वसाहत, दावणे गल्ली पिंजारी
पर्डी, बेघर वसाहत, पसारेवाडी, मठुरेपर्डी, आंबेडकर वसाहत, वड्डवाडी गोसावी वसाहत
अशा 14 झोपडपट्या आहेत. या झोपडपट्यांचे नियमितीकरण करण्यासाठी सर्व्हेक्षण करुन
मोजणी करावी. ज्यांची मोजणी झालेली आहे त्यांचे प्रस्ताव नगररचना कार्यालयाकडे पाठवावे. भूमी अभिलेख
कार्यालयाने तात्काळ मोजणी करुन नगररचना कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवावेत,अशी सूचना
ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिली.
अधिकाऱ्यांनी गोरगरिबांसाठी तळमळीने वेळेत काम
पूर्ण करावे. येत्या सहा महिन्यात या झोपडपट्यांचे नियमितीकरण करुन त्यांचा मालकी
हक्क त्यांना प्रदान करण्याचा आपला प्रयत्न राहील, असेही ग्रामविकास मंत्री श्री.
मुश्रीफ म्हणाले.
यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रताप
ऊर्फ भैया माने, माजी नगराध्यक्ष प्रकार गाडेकर, माजी उप नगराध्यक्ष रमेश माळी,
नगरसेवक नितीन दिंडे, आनंदराव पसारे, सतीश घाटगे उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.