** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, June 5, 2020

खासगी हॉस्पिटलच्या परवाना नुतनीकरणाची प्रलंबित प्रकरणे मार्गी लावणार - जिल्हाधिकारी दौलत देसाई



कोल्हापूर,दि. 5 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्हयातील खासगी हॉस्पिटलच्या प्रलंबित असलेल्या परवाना नुतनीकरणाची प्रकरणे मार्गी लावण्यासाठी प्रक्रिया अधिक गतिमान केली जाईल, अशी  ग्वाही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिली.
कोव्हिड-19 वॉर रुमच्या जिल्हास्तरीय बैठकीत जिल्हाधिकारी दौलत देसाई बोलत होते. या बैठकीस खासदार संजय मंडलिक यांचे प्रतिनिधी विज्ञान मुंडे, सीएम फेलो जान्हवी भानुशाली यांच्यासह कोव्हिड वॉर रुमचे सदस्य डॉ. टोपकर, डॉ. गीता पिल्ले, डॉ. शीतल पाटील, डॉ. संदिप पाटील, डॉ. शिरीष पाटील, डॉ. संजय देसाई यांच्यासह गडहिंग्लज मेडिकल असोसिएशनचे डॉ. पी.डी. कल्याणशेट्टी, डॉ. शैलेश ढाबू, डॉ. व्ही.जी.इंगवले, डॉ. पी.डी.पाटील, डॉ. एन.एम.पट्टणशेट्टी,डॉ. एम.एस.बेळगुंद्री यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात कोल्हापूर जिल्हयातील जनतेबरोबरच खासगी हॉस्पिटल्स आणि खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचे महत्वपूर्ण योगदान लाभल्याबद्दल जिल्हाधिकारी श्री देसाई तसेच कोव्हिड वॉर रुम सदस्यांनी समाधान व्यक्त केले. जिल्हाधिकारी श्री देसाई म्हणाले, खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या हॉस्पिटल्सच्या परवाना नुतणीकरणाचे काम प्राधान्याने करण्यासाठी स्थानिक मेडिकल असोसिएशननी पुढाकार घेऊन ज्या हॉस्पिटलचे परवाना नुतणीकरणाचे काम प्रलंबित आहे, अशांची एकत्रित यादी तयार करुन जिल्हा प्रशासनास सादर करावी, त्यानुसार परवाना नुतणीकरणाची पुढील कार्यवाही प्राधान्यक्रमाने केली जाईल.
खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या अडी-अडचणी आणि प्रश्न निश्चितपणे सोडविण्यास प्रशासनाचे प्राधान्य राहील, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी जनतेमध्ये प्रभावी जागृती आणि आरोग्य शिक्षणाचे काम केले आहे. यापुढील काळातही कोरोना युध्द जिंकण्यासाठी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून सक्रीयपणे पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.