** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, June 26, 2020

केशकर्तनालये, सलून्स व ब्युटीपार्लर्स सशर्त सुरु करण्यास परवानगी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश



कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यातील केशकर्तनालये, सलून्स व ब्युटी पार्लर्स काही अटी व शर्तीस अधिन राहून सुरु करण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले आहेत.
   दिनांक 14 मार्च 2020 पासून कोरोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 मधील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रात कोव्हिड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. 
जिल्ह्यात लॉकडाऊनची मुदत दिनांक 30 जून 2020 रोजी रात्री 12 वा. पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. मुख्य सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या दिनांक 31 मे 2020 रोजीच्या आदेशानुसार तसेच इकडील आदेशानुसार दिनांक 30/06/2020 रोजी रात्री 12 वा. पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. या आदेशामध्ये केशकर्तनालये, स्पा, सलून्स, ब्युटीपार्लर्स प्रतिबंधित क्षेत्रामध्ये समाविष्ट करण्यात आलेली होती.
     मुख्य सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या दिनांक 25 जून 2020 आदेशामध्ये केशकर्तनालये, सलून्स व ब्युटीपार्लर्स काही अटी व शर्तीस अधिन राहून प्रतिबंधित क्षेत्र वगळून उर्वरीत राज्यात दिनांक 27/06/2020 पासून सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.
    जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी जिल्ह्यातील  केशकर्तनालये, सलून्स व ब्युटीपार्लर्स खालील अटी व शर्तींना अधिन राहून सुरु करण्यास परवानगी दिली आहे.
1) उपरोक्त नमुद आस्थापनात केवळ निवडक सेवा जसे की, केस कापणे, केसांना रंग (डाय) करणे, वॅक्सींग, थ्रेडींग इ. ला परवानगी असेल.
2) त्वचेशी संबंधित सेवांना (जसे की दाढी, फेशियल, मसाज इ.) परवानगी असणार नाही. या सेवा दिल्या जाणार नाहीत असा फलक आस्थापनेच्या दर्शनी भागामध्ये सर्वांना दिसेल असा लावण्यात यावा.
3) आस्थापना चालक / कर्मचाऱ्यांनी संरक्षक साधने जसे की, हातमोजे (हॅन्ड ग्लोव्हज), ॲप्रन व मास्क वापरणे बंधनकारक असेल.                           
4) आस्थापनेतील सर्व कार्यक्षेत्र व फक्त केस कापण्यासाठी वापरण्यात येणारी हत्यारे व उपकरणे जसे की खुर्ची, कात्री, वस्तरा, कंगवे, झीरो मशीन, ब्लेडस् इ. प्रत्येक सेवेनंतर निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक असेल. तसेच सर्व सामाईक वापर क्षेत्रे व पृष्ठभाग प्रत्येक दोन तासांनी निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक असेल.     
5) आस्थापनेत ग्राहकांसाठी डिस्पोजेबल टॉवेल्स / नॅपकीन्स वापरणे व वापरानंतर त्याची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावणे बंधनकारक असेल. नॉन डिस्पोजेबल साधने प्रत्येक वापरानंतर स्वच्छ व निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक असेल.
6) प्रत्येक आस्थापनेने ग्राहकांच्या माहितीसाठी वरील सर्व खबरदारीच्या सूचना दर्शनी भागात लावल्या पाहिजेत.
उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही यात म्हटले आहे.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.