** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, June 18, 2020

अवैद्य सावकारी : झडतीची कार्यवाही पूर्ण गैरअर्जदाराच्या घरातून महत्वपूर्ण दस्तऐवज जप्त -जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे




अवैद्य सावकारीच्या अनुषंगाने नागरिकांनी तक्रार करण्याचे आवाहन

कोल्हापूर,दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय): जुना बुधवार पेठेतील रोहन मारुती जाधव यांच्याविरुध्द अवैद्य सावकारी व्यवसाय करत असल्याबाबतच्या तक्रारीनुसार सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांच्या पथकाने गैरअर्जदार यांच्या घरातून कच्चानोंदी असलेल्या वह्या व डायऱ्या, कोरे व लिखित चेक व हस्तलिखित बॉन्ड, संचकार पत्रे, दस्त, भीशी नोंद वही व जमीनीशी संबंधित कागदपत्रे असे महत्वपूर्ण दस्तऐवज जप्त करण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी दिली.
जिल्हयात महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ अंतर्गत प्राधान्यक्रमाने कार्यवाही करण्यात येत असल्याचे सांगून जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे म्हणाले की, रोहन मारुती जाधव, रा.अवदुत गल्ली, जुने पद्माराजे हायस्कुल समोर, सोन्या मारुती चौक, जुना बुधवार पेठ, कोल्हापूर हा अवैद्य सावकारी व्यवसाय करत असल्याबाबतची तक्रार जिल्हा पोलीस प्रमुख कोल्हापूर यांच्याकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक,कोल्हापूर यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र सावकारी (नियमन)  अधिनियम २०१४ मधील तरतुदीनुसार पडताळणी करुन पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे आदेशान्वये झडती घेण्यासाठी प्राधिकृत अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तपासणी पथकाची नेमणूक करण्यात आली.
            सदर गैरअर्जदार यांचे विरुध्द झडतीची कार्यवाही जिल्हा उपनिबंधकांच्या  मार्गदर्शनाखाली नियुक्त पथक प्रमुख  सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांच्या पथकाने पुर्ण केली.  सदर गैरअर्जदार यांच्या राहते घरातून कच्चानोंदी असलेल्या वह्या व डायऱ्या, कोरे व लिखित चेक व हस्तलिखित बॉन्ड, संचकार पत्रे, दस्त, भीशी नोंद वही व जमीनीशी संबंधित कागदपत्रे असे महत्वपूर्ण दस्तऐवज जप्त करण्यात आली आहेत. या कामी सहकार विभागाचे १ अधिकारी व ७ कर्मचारी असे ८ कर्मचा-यांची व ७ पोलीस कॉन्स्टेबल यांची नियुक्ती करण्यात आली होती. झडती मध्ये प्राप्त झालेल्या अवैध सावकारीचे दस्त ऐवज,बाँन्ड,कोरे चेक व इतर नोंदवहया यांची चौकशीचे काम सुरु आहे. ही कार्यवाही जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या  मार्गदर्शनाखाली सहकार, महसूल व पोलीस प्रशासन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने आज दिनांक १८ जून २०२० रोजी पुर्ण करण्यात आली.
जिल्हयातील नागरिकांनी अवैद्य सावकारीचे अनुषंगाने आर्थिक पिळवणूक अगर अवैद्य सावकारीचे ओघात स्थावर मालमत्ता, शेती, जमीन सावकाराने बळकाविली असल्यास जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था च्यांच्या कार्यालयाकडे तक्रार अर्ज सादर करावा, असे आवाहनही श्री. शिंदे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.