** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, June 6, 2020

स्वॅब घेतल्यानंतर त्या व्यक्तीला कोव्हिड काळजी केंद्रात ठेवा पूरपरिस्थितीच्या दक्षतेसाठी आवश्यकतेप्रमाणे तालुक्यांना बोटी - जिल्हाधिकारी दौलत देसाई



      कोल्हापूर,दि. 6 (जिल्हा माहिती कार्यालय) : स्वॅब घेतल्यानंतर अशी व्यक्ती गावात अथवा घरी जाणार नाही याची काळजी घ्या. त्या व्यक्तीला कोव्हिड काळजी केंद्रात ठेवा, असे सांगतानाच पूरपरिस्थितीच्या दक्षतेसाठी प्रत्येक तालुक्यांना आवश्यकतेप्रमाणे बोटी पुरवण्यात येतील. त्याचबरोबर गाव निहाय नियोजनाचा आराखडा तयार ठेवावा, असे निर्देशही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले.
            जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व उप‍ विभागीय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम  तसेच पाटबंधारे विभागाचे उप अभियंता यांच्याशी जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी आज संवाद साधला. 
            निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले नुकसान, गेल्या वर्षीच्या पीक नुकसान भरपाई वाटपाची सद्यस्थिती, पुराच्या अनुषंगाने झालेली पूर्व तयारी आणि कोव्हिड-19 प्रतिबंधात्मक उपाय या विषयांवर जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी तालुका निहाय सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले, सद्यस्थिती कोव्हिडसाठी संस्थात्मक अलगीकरण केंद्रासाठी प्रामुख्याने शाळा घेतल्या आहेत. पूरपरिस्थितीत स्थलांतरीतांसाठी निवारागृहांसाठी  विविध महाविद्यालये तसेच अन्य ठिकाणांची पाहणी आताच करुन ठेवावी. गेल्या वर्षीचे पीक नुकसान भरपाई वाटप किती शिल्लक आहे त्यासाठी लागणाऱ्या अनुदानाची मागणी करावी. सद्या जे संस्थात्मक अलगीकरण केंद्रात आहेत त्यांच्याबाबत अतिशय दक्ष रहावे. त्यांचे काँन्ट्रॅक्ट ट्रेसिंग, ट्रॅव्हल हिस्ट्री याबाबत माहिती ठेवावी.  तसेच ते व्याधीग्रस्त आहेत का, त्यांच्यामध्ये कोणती लक्षणे दिसतात का याबाबत नियमित तपासणी करावी. 
            पूरपरिस्थितीची पूर्व तयारी म्हणून तात्पुरती निवारागृहे, त्या ठिकाणी देण्यात येणाऱ्या सुविधा तसेच स्वच्छता यासाठी आतापासूनच प्रक्रिया सुरु करुन एजन्सी नेमावी. जनावरांसाठी चारा पुरवण्याबाबत आणि तेथील स्वच्छतेसाठीही एजन्सी पाहून ठेवावी. त्याचबरोबर आतापासूनच संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना जबाबदारीचे वाटप करुन त्या संबंधी आदेश काढावेत, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
केंद्रीय समितीची पाहणी
            जिल्ह्यातील कोव्हिड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाची तीन सदस्यीय समिती लवकरच आपल्या जिल्ह्यामध्ये येणार आहे. यामध्ये केंद्र शासनाचे सचिव आणि नागपूर एम्समधील दोन डॉक्टरांचा समावेश असेल. कोव्हिड काळजी केंद्र, कोव्हिड आरोग्य केंद्र तसेच संस्थात्मक अलगीकरण अशा कोणत्याही ठिकाणी ही समिती भेट देईल, याबाबत सर्वांनी दक्ष रहावे, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. तसेच आशा वर्कर मार्फत सर्व्हेक्षणाचे कामही सुरु करावे, असे ते म्हणाले.
शाळा, रस्ते आणि आरोग्य या तीन गोष्टींवर गट विकास अधिकारी यांनी विशेष लक्ष द्यावे, असे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल म्हणाले, शाळा आणि रस्ते यांचे नुकसान झाले असेल त्याबाबत कार्यवाही करावी. गट शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळांवर विशेष भर द्यावा. तेथील सुविधांबाबत तपासणी करावी. त्याचबरोबर सुरु असणारी अभ्यासमाला विद्यार्थ्यांपर्यंत पोहचती का नाही यावर लक्ष द्यावे. तसेच आरोग्याबाबत विशेष दक्षता घेवून उपाय योजनांवर भर द्यावा. 
            जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे यांनीही संगणक प्रणालीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकूर कावळे, डॉ. हर्षला वेदक, डॉ. तेजस्विनी सांगरुळकर, डॉ. अनिता सैबण्णावर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, पशुसंवर्धन उपायुक्त वाय.ए.पठाण आदी उपस्थित होते.
0 0 0 0 0 0


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.