इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

रविवार, २ ऑगस्ट, २०२०

कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी फिजीशिएनचे मार्गदर्शन मोलाचे -पालकमंत्री सतेज पाटील

                

कोल्हापूर, दि. 2 (जिल्हा माहिती कार्यालय): कोव्हिड केअर सेंटरवरील रुग्णांसाठी खासगी फिजीशिएनचा सल्ला व मार्गदर्शन मोलाचे ठरणार आहे.  या मार्गदर्शनामुळे कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास निश्चितच मदत होणार आहे. आजवर या सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य केले आहे. तसेच यापुढेही असे सहकार्य करुन जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री श्री. पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व खासगी फिजीशिएनसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अधिष्ठाता डॉ. चंद्रकात म्हस्के, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. केम्पी-पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, डॉ. हर्षला वेदक, डॉ. अनिता सैबन्नावर उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, कोव्हिड केअर सेंटरवरील उपचार घेत असलेल्या रुग्णांवर तेथील कार्यरत डॉक्टर उपचार करत आहेत. मात्र काही प्रसंगी रुग्ण अस्वस्थ झाल्यास त्याला केअर सेंटरमधून तातडीने पुढील उपचारासाठी संदर्भित कोव्हिड रुग्णालयाकडे पाठविले जाते. काही वेळेला अशा रुग्णांसाठी कोव्हिड काळजी केंद्रावरच उपचार करण्यासाठी डॉक्टरांना सल्ला व मार्गदर्शनाची आवश्यकता असते. फिजीशिएननी रुग्णांची हिस्ट्री पाहून त्याबाबत सल्ला व मार्गदर्शन करावे. यामुळे मुख्य रुग्णालयावर पडणारा अतिरिक्त ताण कमी होऊन रुग्णासही मदत होईल.

माझा जिल्हा आणि मी अशी भावना ठेऊन काम करा- जिल्हाधिकारी

          जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, कोव्हिड रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यासाठी कोव्हिड काळजी केंद्र, कोव्हिड रुग्णालये, कोविड आरोग्य केंद्रे यांची स्थापना करण्यात आली आहे. या प्रत्येक ठिकाणी फिजीशिएनची सेवा आवश्यक आहे. कोव्हिड काळजी केंद्रातील रुग्णांवरील उपचारासाठी मार्गदर्शन करावे. त्याबाबत सर्व फिजीशिएनना केंद्रे वाटून देण्यात आली आहेत. ‘एक जिल्हा डॉक्टारांची एक संघटना, माझा जिल्हा आणि मी’ अशा भावनेतून फिजीशिएननी उपचार करावेत. सर्वांनीच हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले.  

          जिल्ह्यात कोरोनासाठी लागणारा औषध साठा उपलब्ध असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मित्तल यांनी सांगितले. तर खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांच्या रुग्णालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा विमा उतरावा असे महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी सांगितले. 

यावेळी अधिष्ठाता डॉ. म्हस्के, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. केम्पी पाटील यांनी मार्गदर्शन केले. या व्हिसी मध्ये डॉ. राहूल दिवाण, डॉ. चंद्रशेखर देसाई, डॉ. विजय हिराणी, डॉ. जयवंत पाटील, डॉ. सुभाष पाटील, डॉ. स्मिता कुडाळकर, डॉ. चंद्रशेखर पाटील, डॉ. अभयकुमार कुडचे, डॉ. दिपक सातोस्कर, डॉ. अतिक पटेल, डॉ. अभयदीप आरगे, डॉ. सॅम्युअल भंडारे, डॉ. किरण यादव, डॉ. एम.ए. बोरगावे, डॉ. इम्तीयाज पठाण, डॉ. अरविंद कोळी आदी सहभागी झाले.

00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.