इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, ५ ऑगस्ट, २०२०

वाढती रुग्ण संख्या लक्षात घेवून कोव्हिड काळजी केंद्रातील क्षमता वाढवा - जिल्हाधिकारी दौलत देसाई


 

कोल्हापूर, दि. 5 (जिल्हा माहिती कार्यालय) : तालुक्यात वाढणारी रुग्ण संख्या लक्षात घेवून कोव्हिड काळजी केंद्रातील क्षमता वाढवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.  

 जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व उप विभागीय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने आदी सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, नवीन कोव्हिड काळजी केंद्रात सुविधा पूर्ण करा. त्याचबरोबर आपल्या तालुक्याची वाढणारी रुग्ण संख्या लक्षात घेवून त्याची क्षमता वाढवावी. त्याबाबत तसे नियोजन करावे. रुग्ण ठेवायला जागा नाही असं अजिबात होता कामा नये. रुग्णांचा आलेख कसा वाढत गेला ते पाहून प्रतिदिन क्षमता किती असावी याबाबत नियोजन करा. 

ऑक्सिजन लाईन, ऑक्सिजन सिलेंडर याचेही नियोजन असायला हवे. स्थानिक पातळीवर उपलब्ध होत असल्यस त्याची खरेदी करायला हरकत नाही.  त्यात काही कमी पडू देवू नका. किमान 10 टक्के बेड हे ऑक्सिजनचे असायला हवे. कोव्हिड रुग्णालयात आणि कोव्हिड काळजी केंद्रात काम न करणाऱ्या तसेच उपचाराबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टर्सवर उप विभागीय अधिकारी यांनी कारवाई करावी, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. 

इचलकरंजी येथील आयजीएममधील नगरपालिकेच्या 42 जणांना तात्काळ करार पध्दतीने सेवेत सामावून घ्या, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, खासगी फिजिशयनच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांवर उपचार करावेत. त्यासाठी प्रत्येक केंद्राला मोबाईल देण्यात आला आहे त्याचा वापर करावा. 

डॉ. साळे यांनीही तालुका निहाय कोव्हिड काळजी केंद्र तेथील सुविधा रॅपिट ॲन्टीजन किट टेस्टींग त्याबाबतच्या सुविधा याचा सविस्तर आढावा घेतला. 

0 0 0 0 0 0 0 0


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.