** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, August 8, 2020

महापुराबाबत महाराष्ट्र व कर्नाटक दोन्ही राज्यांमध्ये समन्वय राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांनी पूरस्थितीची केली पाहणी

 





 

कोल्हापूर, दि. 8 (जिल्हा माहिती कार्यालय) : सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांनी शनिवारी शिरोळ तालुक्यातील शिरदवाड येथे पंचगंगा नदीची पाणी पातळी व नदी काठावरील पूरपरिस्थितीबाबत  सद्यस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर महाराष्ट्र व कर्नाटक मधील उपस्थित अधिकाऱ्यांसोबत बोरगांव येथे आढावा बैठक घेतली.

यावेळी चिक्कोडी मतदारसंघाचे आमदार गणेश हुक्किरे, बेळगावचे जिल्हाधिकारी आर.जे.हिरेमठ, बेळगावचे जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निम्बर्गी,  प्रांताधिकारी रवींद्र करलींग, उपविभागीय पोलिस अधिकारी मनोजकुमार नाईक, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सी. डी. पाटील, चिकोडीचे तहसीलदार एस. संपगावी, इचलकरंजीचे प्रांताधिकारी विकास खरात, शिरोळच्या तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, पाटबंधारे विभागाचे अभियंता शिरीष पाटील, इचलकरंजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक पाटील, नायब तहसीलदार श्रीमती सनदी आदी उपस्थित होते.

 २०१९ मध्ये महापुरामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीची दखल घेत, महापुरासाठीच्या नियोजनाबाबत  जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, कर्नाटकचे जलसंपदामंत्री रमेश जारकीहोळी च्यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीमध्ये आलेल्या महापुराचा आढावा व संभाव्य महापुराबाबत कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबाबतचे नियोजन निश्चित केले होते.

 मागील चार दिवस झाले महाराष्ट्राच्या प्रमुख धरणक्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर, सांगली भागात महापुराची परिस्थिती निर्माण होऊ पाहत आहे. दोन्ही राज्याकडून सध्या समन्वय राखला जात आहे. यापुढे तो कायम ठेवावा असे उपस्थित अधिकाऱ्यांना मंत्री जारकीहोळी व आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी आदेश दिले. पुढील काळासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. सध्या महाराष्ट्रामधील प्रमुख धरणांमधून १.५६००० क्यूसेक्स घनमीटर पाण्याचा विसर्ग होत आहे, तर कर्नाटक मधील आलमट्टी या प्रमुख धरणांमधून २.२०००० क्युसेक्स घनमीटर पाण्याचा विसर्ग होत असल्याची माहिती आढावा बैठकीमध्ये दोन्ही राज्यातील पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली,

महापुरामुळे दोन्ही राज्यांमधील गावांना व जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागू नये त्याचबरोबर त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी कर्नाटक व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घ्यावी अशा सूचना मंत्री श्री. जारकीहोळी व राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.