** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, September 16, 2020

जिल्हा प्रशासन, सीपीआर प्रशासन आणि खासगी डॉक्टरांच्या कार्याबद्दल गौरवोदगार जिल्ह्यासाठी दोन दिवसात समर्पित ऑक्सिजन टँकर देणार - विभागीय आयुक्त सौरभ राव

 


 



कोल्हापूर, दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय) : येत्या दोन दिवसात जिल्ह्यासाठी समर्पित ऑक्सिजन टँकर दिला जाईल, असे सांगतानाच विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जिल्हा प्रशासन आणि सीपीआर प्रशासनाने कोव्हिड बाबत केलेल्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त करुन गौरव केला. खासगी डॉक्‍टरांनी दिलेल्या सेवाभावी योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले.

पुणे‍ विभागीय आयुक्त श्री. राव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोन आजार प्रतिबंध उपाययोजना आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी संगणकीय सादरीकरण करुन माहिती दिली. आज अखेर जिल्ह्यात बाधित झालेले रुग्ण, झालेले मृत्यू, कोरोना मुक्त झालेली संख्या, बाधित दर, मृत्यू दर, काँन्टॅक्ट ट्रेसिंग, महिना निहाय वाढणारे रुग्ण, दिवसागणिक बाधित आणि बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या, जिल्ह्यातील हॉटस्पॉट, आज अखेर प्रयोगशाळेत करण्यात आलेली तपासणीची माहिती, संशयित आणि बाधित रुग्णांना दाखल करण्यात आलेल्या केंद्रांची माहिती, ग्रामीण आणि शहरी भागातील विभागणी, वय आणि लिंग निहाय रुग्ण आणि मृत्यूची माहिती, झालेल्या मृत्यूचा निष्कर्ष, प्रतिबंधित क्षेत्र आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, उपलब्ध खाटांची संख्या, आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनची मागणी, नियोजन अतिरिक्त खाटांचे नियोजन आदींबाबत सविस्तर माहिती दिली.

विभागीय आयुक्त श्री. राव यांनी नियोजनाबाबत आणि उपाययोजनाबाबत समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, कोव्हिड काळजी केंद्रात 25 टक्के खाटा ऑक्सिजनेटेड करण्यात आले आहेत, ही अत्यंत चांगली बाब आहे. त्याच बरोबर रेमडेसिव्हीर हे इंजेक्शनही मोफत उपलब्ध करण्यात आले आहे, असे नियोजन कोणत्याही जिल्ह्यात विशेषत: ग्रामीण भागात नाही. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम प्रभावीपणे राबवून यामध्ये अँन्टीजेन टेस्टवर लक्ष केंद्रीत करा. लक्षणे असणाऱ्या रुग्णांबाबत आरटीपीसीआर टेस्ट करा. स्थानिक पातळीवर तेथील परिस्थिती पाहून निर्णय घ्या. लोकप्रतिनिधींच्या सहायाने नियोजन करा.

   मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे, वारंवार हात धुणे यावर लोक प्रबोधन करावे. त्याचबरोबर दुकानांच्या बंद काळात औषध फवारणी, साफसफाई, निर्जंतुकीकरण यावर भर द्यावा. कोव्हिड काळजी केंद्र, समर्पित कोव्हिड आरोग्य केंद्रात  सुविधा देण्यासाठी खासगी डॉक्टरांकडून आणखी मदत घ्यावी. एसडीआरएफ आणि एनएचएम मधून निधी मिळण्याचा विषय मार्गी लावला जाईल. लोकप्रबोधनाच्या कार्यक्रमात महापालिका, नगरपालिका पथकाला सक्रिय करा. पेालीसांच्या मदतीने दंडात्मक कारवाईवर भर द्यावा, असेही श्री. राव म्हणाले.

कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक मनोज लोहिया म्हणाले, ज्या ठिकाणी संसर्ग वाढतोय त्या  ठिकाणी लोकांच्या हलचालीवर निर्बंध घालावेत. बाधित गावांवर लक्ष केंद्रीत करावे. खासगी डॉक्टर्स नर्सेस यांच्या माध्यमातून कोव्हिड केंद्र येथे सुविधा देण्यावर भर द्यावा.

खासगी डॉक्टरांचे गौरवशाली सहकार्य

प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत खासगी डॉक्टर्स काही ठिकाणी प्रत्यक्ष, काही ठिकाणी टेलिमेडिशनच्या माध्यमातून कोव्हिडसाठी सहकार्य करत आहेत. हे गौरवास पात्र आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. यापुढेही प्रशासनामार्फत अतिरिक्त खाटांची सुविधा करण्यात येत असून या डॉक्टर्सनी त्यामध्येही योगदान द्यावे, अशी अपेक्षाही विभागीय आयुक्त श्री. राव यांनी व्यक्त केली.

महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी महापालिकेच्यावतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. डॉ. आरती घोरपडे यांनी सीपीआरची माहिती दिली. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनीही उपाययोजनांबाबत माहिती दिली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी.केम्पीपाटील,  प्र. आरोग्य उपसंचालक डॉ. उज्ज्वला माने, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे,  जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार आदी उपस्थित होते.

00000

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.