** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, May 12, 2020

प्रधानमंत्री सुरक्षा आणि जीवन ज्योती विमा 25 मे ते 1 जून कालावधित नुतनीकरण



कोल्हापूर, दि. 12 (जिल्हा माहिती कार्यालय) :-  प्रधानमंत्री सुरक्षा विमा व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा नुतनीकरण मोहीम दिनांक 25 मे ते 1 जून या कालावधीत राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
देशामध्ये सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा प्रणाली अस्तित्वात आणण्यासाठी 9 मे 2015 रोजी सामाजिक सुरक्षिततेच्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा या दोन योजना प्राधान्याने गरीब व वंचित घटकांसाठी सुरू करण्यात आल्या.
सर्व बँकांच्या माध्यमातून या योजना राबविल्या जातात. जिल्ह्यामध्ये 7 लाख 80 हजारांवर बँक ग्राहकांनी सुरक्षा विमा अंतर्गत तर 3 लाख 92 हजारावर बँक ग्राहकांनी जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत सहभाग नोंदविला आहे. जिल्ह्यातील लोकसंख्या पाहता तसेच बँक खात्यांची संख्या पाहता हे प्रमाण कमी आहे. जास्तीत-जास्त नागरिकांनी त्यांचे बँक खाते असणाऱ्या बँकेत या योजनांचा लाभ घ्यावा.
सुरक्षा विमा योजना ही अपघाती मृत्यू व अपंगत्व यासाठी 2 लाखापर्यंत विमा संरक्षण देणारी योजना असून वय वर्षे 18 ते 70 वयोगटातील व्यक्ती यामध्ये सहभाग घेवू शकतात. सुरक्षा विमा योजनेंतर्गत वार्षिक हप्ता 12 रू. इतका आहे. जीवन ज्योती विमा योजना ही नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाखापर्यंत विमा संरक्षण देणारी योजना असून वय वर्षे 18 ते 50 वयोगटातील व्यक्ती यामध्ये सहभाग घेवू शकतात. या योजनेचा वार्षिक हप्ता 330 रू. इतका आहे. नागरिक आपले बँक खाते ज्या बँकेत आहे त्या शाखेत, बँकेतर्फे नेमणूक करण्यात आलेल्या व्यवसाय समन्वयक व ग्राहक सेवा केंद्रात देखील अर्ज करू शकतात. तसेच पोस्ट बँकेत, पोस्ट ऑफिसमध्येही अर्ज करू शकतात.
जे ग्राहक या विमा योजनेपासून वंचित आहेत अशा ग्राहकांनी त्वरित आपल्या बँक शाखेशी, व्यवसाय समन्वयक ग्राहक सेवा केंद्राशी किंवा पोस्ट ऑफिसशी संपर्क साधून या विमा योजनांमध्ये आपला सहभाग नोंदवावा. प्रत्येक गावातील ग्रामपंचायतींना बँकांना सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत स्तरावरून गावात दवंडी देवून तसेच माहिती देवून ग्रामस्थांना विमा हप्ता रक्कम खात्यावर राखून ठेवण्यासाठी तसेच या विमा योजनेअंतर्गत नवीन खातेदार वाढविण्यासाठी बँकांना सहकार्य करण्याच्या सूचना सर्व ग्रामपंचायतींना देण्यात येत आहेत, असेही श्री. देसाई यांनी स्पष्ट केले.
000000


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.