** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, May 17, 2020

जिल्ह्यात 31 मे पर्यंत लॉकडाऊन;जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश

       कोल्हापूर, दि. 17 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने पारित केलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात लॉकडाऊन बंदी आदेश दिनांक 31 मे 2020 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत वाढविण्यात आल्याचा आदेश जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिला.
            कोरोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 मधील तरतूदीच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमीत करण्यात आले आहे. याबाबत नियमावली प्रसिध्द केली असून जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोव्हिड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाया योजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीप्रमाणे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हे कोणतीही आपत्ती रोखण्यासाठी किंवा आपत्तीविरूध्द प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी सक्षम प्राधिकारी आहेत.
            सद्यस्थितीत कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्यासाठी शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकरिता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याअर्थी राज्य शासनाच्या दिनांक 17 मे च्या आदेशानुसार दिनांक 31 मे 2020 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यत लॉकडाऊनची मुदत वाढविण्यात आली आहे. या कालावधीत जिल्हा बंदी आदेश अंमलात राहतील.
            यापूर्वी घालण्यात आलेले निर्बंध व सूट देण्यात आलेल्या बाबी कायम ठेवण्यात येत आहेत. राज्य शासनाकडून वेळोवेळी काढण्यात आलेल्या आदेशातील प्रतिबंधीत बाबी तसेच निर्बंधामधून वगळण्यात आलेल्या अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक बाबी कायम राहतील. केंद्र शासनाचे कोरोना बाधित जिल्ह्याचे वर्गीकरण प्राप्त झाल्यानंतर सदरच्या आदेशामध्ये आवश्यक बदल करण्यात येतील.
            आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेव भारतीय दंड संहीता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल असा इशाराही या आदेशात देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.