कोल्हापूर, दि. 9 (जि.मा.का):-
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील
(केडीसीसी) 53 हजार 311 महिलांच्या जन धन खात्यांवर शासनाकडून एप्रिल आणि मे
महिन्याचे पाचशे रुपयाप्रमाणे दोन महिन्याचे एक हजार प्रमाणे रक्कम कोल्हापूर
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून संबंधित महिलांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली
आहे. मात्र हे पैसे काढण्यासाठी बँकेने दिवस आणि वेळापत्रक आखून दिले असून
त्यानुसारच रक्कम काढता येईल, अशी माहिती अग्रणी जिल्हा प्रबंधक राहुल माने आणि
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक माने
यांनी दिली.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर
लॉकडाऊन घोषित केला असून गोरगरीब माहिलांचे हित डोळयासमोर ठेऊन शासनामार्फत
एप्रिल, मे आणि जुन या तीन महिन्यात प्रतिमहिना रुपये पाचशे इतकी रक्कम
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत जमा करण्यात येत आहे. यानुसार जिल्हा
मध्यवर्ती सहकारी बँकेत प्रधानमंत्री जन धन योजनेत खाती उघडलेल्या महिला
खातेदारांच्या खात्यांवर प्रति महिना रुपये पाचशे इतकी रक्कम जमा करण्यात येत आहे.
यानुसार एप्रिल आणि मे या दोन महिन्याची रक्कम रुपये एकहजार शासनाकडून बँककडे वर्ग झाले असून
बँकेकडून ही रक्कम संबंधित महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आली आहे.
जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या कोविड-19
साथीमुळे बँक शाखांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी
बँकेने पुढीलप्रमाणे दिवस आणि वेळापत्रक आखून दिले आहे.
दिवस पहिला :- 11 मे 2020 असून या दिवशी ज्या खाते क्रमांकांचा शेवट 0
किंवा 1 ने होतो, त्या खात्यांतील रक्कम काढता येईल. 2) दिवस
दुसरा:- 12 मे 2020 असून या दिवशी ज्या खाते क्रमांकांचा शेवट २ किंवा ३ ने
होतो, त्या खात्यांतील रक्कम काढता येईल. 3) दिवस तिसरा:- 13 मे 2020 असून
या दिवशी ज्या खाते क्रमांकांचा शेवट 4 किंवा 5 ने होतो त्या खात्यांतील रक्कम
काढता येईल.4) दिवस चौथा :- 14 मे 2020 असून या दिवशी ज्या खाते क्रमांकांचा
शेवट 6 किंवा 7 ने होतो, त्या खात्यांतील रक्कम काढता येईल. आणि 5) दिवस
पाचवा :- 15 मे 2020 असून या दिवशी ज्या खाते क्रमांकांचा शेवट 8 किंवा 9 ने होतो,
त्या खात्यांतील रक्कम काढता येईल.
याप्रमाणे जनधन खात्यावरील रक्कम काढता येणार
असून शक्य असलेल्या ठिकाणी खातेदार भगिनीना एटीएम कार्डव्दारे केव्हाही रक्कमेची उचल
करता येईल. तरी जनधन खातेदार महिलांनी सलग्न शाखेशी संपर्क साधावा, तसेच शाखेमध्ये
व्यवहार करतांना कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक ते
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सामाजिक अंतर, मास्कचा वापर व सॅनिटायझरचा वापर करणे
अनिवार्य असल्याचेही श्री. माने यांनी स्पष्ट केले.
0000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.