कोल्हापूर, दि. 13 (जिल्हा
माहिती कार्यालय) : इचलकरंजी
येथील आयजीएम रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या कोरोना बाधीतांसाठी रेमडिसीव्हीर मोफत
देण्याची व्यवस्था करण्यात आली असून खासगी रुग्णालयांमधील रुग्णांसाठी दर निश्चित करण्यात
आला आहे. त्याच्यापेक्षा जास्त दर आकारणी केल्यास त्याची तक्रार करावी.
त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिला.
पालकमंत्री श्री. पाटील
यांनी आज संजय घोडावत विद्यापीठ येथील कोविड काळजी केंद्र तसेच आयजीएम रुग्णालयाला
भेट देऊन प्रांत कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीला नगराध्यक्ष अलका स्वामी,
आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजू आवळे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पाटील
यांनी कोरोनाबाबतचा सविस्तर आढावा यावेळी घेतला. त्यानंतर ते म्हणाले, आयजीएम
रुग्णालय हे सीपीआर नंतरचे मोठे हॉस्पिटल आहे. या रुग्णालयाची तीनशे खाटांची
क्षमता करण्याचा निर्णय घेतोय. सध्या 6 हजार लिटर लिक्वीड ऑक्सिजनचा टँक बसविण्यात
आला असून आणखी एक तितक्याच क्षमतेचा टँक बसविण्याचा निर्णय घेत आहोत. सीटी स्कॅनची
सुविधाही केली जाईल. एचआरसीटीचे दर खासगी रुग्णालयात जास्त प्रमाणात आकारणी होत
असल्याची तक्रार येत आहेत. त्याबाबत लवकरच दर निश्चित करण्याचा धोरणात्मक निर्णय
घेतला जाईल.
व्याधीग्रस्त रुग्णांची माहिती ताबडतोब कळवा
इचलकरंजीमध्ये झालेल्या
169 मृत्यूमधील 40 सोडले तर उर्वरित सर्व मृत्यू व्याधीग्रस्त आहेत. त्यामुळे
व्याधीग्रस्त रुग्ण असतील तर त्यांची माहिती ताबडतोब कळवा. 80 मृत्यू हे 48
तासांमध्ये झाले आहेत. आरोग्याची सुविधा घेण्यासाठी उशीरा आल्याचे दिसून येत आहे.
लक्षणे दिसली तर तात्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा. स्वाब देऊन अहवाल
पॉझिटीव्ह आल्यास तात्काळ उपचार सुरु करता येतील. यामुळे रुग्ण दगावणार नाही हे
दिसून आले आहे. आयजीएम मधून सुमारे 3 हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
जिल्ह्यामधील 20 हजार
रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. अडीच ते तीन हजार जणांनी घरातून कोविडवर मात केली
आहे. त्यामुळे लक्षणे दिसताच अथवा थोडी जरी शंका आली तरी तात्काळ
आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
यांनी 15 सप्टेंबर पासून सुरु करत असलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेत सर्व पक्षाच्या
नगरसेवकांनी - कार्यकर्त्यांनी, सामाजिक मंडळांनी योगदान द्यावे असे आवाहनही
पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले.
या बैठकीला अप्पर पोलीस
अधीक्षक श्रीनिवास घाडगे, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसिलदार प्रदीप उबाळे,
मुख्याधिकारी संतोष खांडेकर, नगरसेवक राहूल खंजिरे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, राजीव आवळे, आदिंसह
नगरसेवक, सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.