** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, June 4, 2021

जिल्ह्यातील ऑक्सीजन औद्योगिक कारणासाठी नियंत्रित पध्दतीने वितरीत करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

 


कोल्हापूर, दि. 4, (जिल्हा माहिती कार्यालय) :  जिल्ह्यात दि. 04 जून पासून कार्यान्वित असणाऱ्या ऑक्सीजन उत्पादन, साठा व रिफिलींग करणाऱ्या आस्थापना मधून मेडिकल व औद्योगिक वापरासाठी वितरीत होणाऱ्या ऑक्सिजनबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी  खालील प्रमाणे आदेश दिले आहेत.

            ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या आस्थापनांनी एकूण उत्पादित ऑक्सिजन पैकी 90 टक्के  ऑक्सिजन मेडीकल वापरासाठी रुग्णालयांना व 10 टक्के ऑक्सिजन फक्त खाली नमुद पात्र उद्योगांना औद्योगिक वापरासाठी वितरीत करावयाचा आहे.  जिल्ह्यातील सर्व ऑक्सिजन उत्पादन व रिफिलींग करणाऱ्या आस्थापनांनी दैनंदिन ऑक्सिजन वाटप करीत असताना प्रथम प्राधान्याने लिक्वीड मेडीकल ऑक्सिजन वाटप करणे व वैद्यकीय कारणासाठी लागणारे ऑक्सिजन सिलेंडर भरुन देणे बंधनकारक आहे. दररोजच्या मागणी प्रमाणे व पुढील 24 तासासाठी आवश्यक वैद्यकीय उपयोगासाठी ऑक्सिजन शिल्लक ठेवणे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारे कमतरता पडू नये याची जबाबदारी उत्पादक व रिफिलर यांच्यावरती राहील. ज्या इतर उद्योगांना ऑक्सिजन पुरवठा करणार आहे त्यांची सविस्तर यादी प्रत्येक उत्पादक व रिफिलर यांनी ठेवायची आहे. प्रत्येक ऑक्सिजन उत्पादक कंपनींच्या ठिकाणी जिहाधिकारी कार्यालयाकडून नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी यांनी उपरोक्त नमुद उद्योगांची यादी प्रमाणीत करावयाची आहे. तसेच उद्योगांसाठी 10 टक्के मर्यादेपेक्षा जास्त ऑक्सिजन पुढील आदेश होई पर्यंत दिला जाणार नाही याबाबत नियंत्रण ठेवणेचे आहे व सदर आदेशाचे काटेकोरपणे पालन होत असल्याची खात्री करावी.  जर वैद्यकीय कारणास्तव ऑक्सिजनची कमतरता भासू लागल्यास ऑक्सिजन उत्पादक कंपन्या व रिफिलर यांनी इतर उद्योगासाठी वितरीत करत असलेला 10 टक्के  ऑक्सिजन तात्काळ स्वत:हून बंद करावयाचा आहे.

यामध्ये पुढील दहा दिवसात रुग्णसंख्येचा आढावा घेवून ऑक्सिजन वितरणाच्या प्रमाणाबाबत पुढील निर्णय घेणेत येईल.

जिल्ह्यात कोविड-19 संसर्गाच्या प्रादुर्भावामध्ये वाढ होत असून गंभीर व अतिगंभीर कोविड बाधीत रुग्ण शासकीय, खाजगी रुग्णालये तसेच जिल्ह्यातील सर्व CCC/DCHC मध्ये उपचारासाठी मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. जिल्ह्यामध्ये दिनांक 04 जून रोजी ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 18579 इतकी असून त्यापैकी 3146 रुग्ण ऑक्सिजन बेड वर आहेत. जिल्ह्यासाठी कोविड-19 बाधीत रुग्णांच्या उपचारासाठी अद्यापही दररोज 52.22 मे. टन ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. तसेच यामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेतील उद्योग व सुरु राहण्यास पात्र उद्योगांना पुढील आदेश होई पर्यंत एकूण उत्पादन किंवा रिफिलींगच्या 10 टक्के ऑक्सिजन वितरीत करणेस परवानगी देणे विचाराधिन होते,

१) औषध उत्पादक आस्थापना, लस उत्पादन करणाऱ्या आस्थापना व अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे तयार करणाऱ्या आस्थापना.२) अत्यावश्यक सेवा देणारे उद्योग,

3) निर्यात घटक,

4) निरंतर प्रक्रिया उद्योग,

5) उद्योगाच्या ठिकाणी कामगारांची राहण्याची सोय असणारे उद्योग.

आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेव भारतीय दंड संहीता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल असे आदेशात नमूद आहे.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.