इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०२२

आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेश अर्ज ऑनलाईन स्विकारण्याची प्रक्रिया सुरु

 

 

       कोल्हापूर, दि. 18 (जिमाका): आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेश अर्ज दि. 18 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाईन स्विकारण्यास सुरुवात झाली आहे. तरी इच्छुक पालकांनी आरटीई पोर्टलवर नमुद कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आशा उबाळे यांनी केले आहे.

            आरटीई  अंतर्गत सामाजिक, वंचित घटक, आर्थिक दुर्बल घटक, घटस्फोटीत तसेच विधवा महिलांचे पाल्य, अनाथ, दिव्यांग, एचआयव्ही प्रभावित बालके इ. घटकांतील मुलांच्या प्रवेशासाठी पालकांकडून ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. 28 फेब्रुवारीनंतर  ऑनलाईन प्रवेश अर्जासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये अल्पसंख्यांक शाळा वगळता राज्यातील सर्व अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयं अर्थसहाय्यता तत्वावरिल प्राथमिक शाळांना पहिलीच्या वर्गाच्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी 25 टक्के पर्यंतच्या जागा नजिकच्या परिसरातील वंचित गटाच्या व दुर्बल घटकांतील बालकांच्या प्रवेशासाठी राखून ठेवणे व अशा बालकांना त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण पुरविणे बंधनकारक आहे. या अंतर्गत सन 2022-23 या शैक्षणिक वर्षामधील पूर्व प्राथमिक व इयत्ता पहिलीसाठी 25 टक्के आरक्षण प्रवेश प्रक्रिया https://student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील आरटीई पोर्टल या लिंकवर ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे.

          आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेश घेणाऱ्या मुलांच्या पालकांसाठी आवश्यक कागदपत्रे-

          जन्माचे प्रमाणपत्र (सर्व घटकांना अनिवार्य), निवासी पुरावा (सर्व घटकांना अनिवार्य), सामाजिक वंचित घटक यांच्यासाठी पालकांचा/ बालकांचा जातीचा दाखला/ प्रमाणपत्र, आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या पालकांचा उत्पन्नाचा दाखला (रु. एक लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा), घटस्फोटीत व न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोट प्रकरणातील महिलांच्या मुलांसाठी आवश्यक कागदपत्रे (न्यायालयाचा निर्णय अथवा प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा, आईचा रहिवाशी पुरावा), विधवा महिलांच्या मुलांसाठी (पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, बालकाच्या आईचा रहिवाशी पुरावा), एकल पालकत्व असल्यास आई किंवा वडील यापैकी निवडलेल्या व्यक्तीची कागदपत्रे ग्राह्य, अनाथ बालकांसाठी- अनाथालयाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावीत. जर बालक अनाथालयात रहात नसेल तर जे पालक सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक, एचआयव्ही बाधित/ एचआयव्ही प्रभावित बालकांसाठी-जिल्हा शल्यचिकित्सक/ वैद्यकीय अधिक्षक, अधिसुचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अपंगत्व प्रमाणपत्र व अर्ज करणाऱ्या बालकाचे पासपोर्ट साईज रंगीत छायाचित्र इ. कागदपत्रे आवश्यक आहेत.

0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.