इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, १० फेब्रुवारी, २०२२

स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेमार्फत महिलांना ब्युटी पार्लरचे मोफत प्रशिक्षण

 


कोल्हापूर, दि. 10 (जिमाका):   बँक ऑफ इंडियाद्वारा प्रायोजित स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान (आरसेटी) कोल्हापूर तर्फे महिलांसाठी 30 दिवसांचे मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आरसेटीच्या संचालिका सोनाली चतुर यांनी दिली.

 प्रशिक्षणासाठी बचत गटातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये करवीर, पन्हाळा आणि राधानगरी तालुक्यातील 28 महिलांनी सहभाग घेतला. प्रशिक्षणा दरम्यान महिलांना एच डी मेकअप, फेशियल, हेअर कटिंग, कलरिंग, ट्रीमिंग अशा विविध कौशल्याबरोबरच उद्योजकीय ज्ञानही देण्यात आले. त्याच बरोबर बँक कर्ज प्रस्ताव मार्गदर्शन, विविध शासकीय योजना, सुरक्षा योजना यांचीही माहिती प्रशिक्षणातून देण्यात आली.

प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी बँक ऑफ इंडिया मुख्य शाखेचे सहायक महाप्रबंधक ईलाही सय्यद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले, “ब्युटी पार्लर ही आता पूर्वी पेक्षा, विशेषत: शहरी भागातील महिलांची गरज बनली आहे. याचा फायदा घेऊन महिलांना या व्यवसायात प्रगती करता येईल. व्यवसाय वाढवण्यासाठी आवश्यक कर्ज घेवून व ते नियमित परतफेड करून बँकेत आपली पत निर्माण केली पाहिजे.’’ यावेळी श्री. सय्यद यांच्या हस्ते 28 महिला प्रशिक्षणार्थींना  प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.

कार्यक्रमासाठी स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान (आरसेटी) कोल्हापूरच्या संचालिका सोनाली चतूर, आरसेटी श्रेष्ठता केंद्राच्या प्रतिनिधी कृष्णाली शिवशरण,  तांत्रिक प्रशिक्षिका विना रेळेकर आणि आरसेटीचे प्रजोत ढाले, असिफ जमादार व विष्णू मांगोरे उपस्थित होते.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.