इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०२२

मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पेनेतील शेतकऱ्यांच्या योजना उत्पन्न वाढीसाठी वरदान ठरतील - जिल्हाधिकारी राहुल रेखावार

 









कोल्हापूर द्राक्ष महोत्सवाचे उद्घाटन
      कोल्हापूर, दि. 10 (जिमाका): शेतकऱ्यांच्या जास्तीत जास्त उत्पन्न वाढीसाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या 'शेतकरी ते ग्राहक थेट विक्री', 'विकेल ते पिकेल' यासारख्या योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी वरदान ठरतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी केले.

'शेतकरी ते ग्राहक थेट विक्री' योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, कोल्हापूर व  कृषि उत्पन्न बाजार समिती, सांगली  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोल्हापूर द्राक्ष महोत्सव 2022 चे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री.रेखावार यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सांगली कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, संचालक जीवन पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, विभागीय कृषि सहसंचालक बी. जी. बिराजदार, विभागीय जात पडताळणी समितीचे  उपायुक्त उमेश घुले,  जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, कृषि पणन मंडळ कोल्हापूर विभागाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले आदि मान्यवर उपस्थित होते.

हा महोत्सव दि. 11 ते 20 फेब्रुवारी या कालावधीमध्ये शाहू स्मारक भवन येथे सकाळी 9 ते रात्री 8 या वेळेत सुरु राहणार आहे. जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी मुख्यमंत्री महोदयांच्या 'शेतकरी ते ग्राहक थेट विक्री' तसेच 'विकेल ते पिकेल'  या संकल्पनांचा या महोत्सवामध्ये संगम झालेला पहायला मिळतो. महोत्सवामध्ये तरुण शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याने  तरुण शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनांना चांगला प्रतिसाद देण्याचे ठरविले असल्याचे प्रतिबिंबीत होते. पूर्वी द्राक्ष म्हटले की, केवळ नाशिक व उत्तर महाराष्ट्र समोर येत असे. पण अनेक वर्षांपासून  सांगली जिल्ह्यामध्येही द्राक्ष पिकाने आपले पाय घट्ट रोवलेले आहेत, असे नमूद करुन आपल्या जिल्ह्याची सुपिकता पाहता विविध उत्पादनांसाठी जिल्ह्यातील सर्व मंत्री महोदय, लोकप्रतिनिधी तसेच कृषि व पणन विभागाच्यावतीने असेच नाविन्यपूर्ण उपक्रम करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही ते म्हणाले.  

मागील वर्षी झालेल्या द्राक्ष महोत्सवाला कोल्हापूरवासियांकडून मिळालेला उदंड प्रतिसाद उल्लेखनीय होता. अशा महोत्सवांमुळे शेतकरी व ग्राहक या दोघांनाही निश्चितच फायदा होतो. यामध्ये बाजारभावापेक्षा कमी दरात उत्तम प्रतिचा माल ग्राहकांपर्यंत थेट पोहचतो. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी शेतकऱ्यांचा कोणताही माल थेट शेतकऱ्यांकडूनच खरेदी करण्याचा प्रयत्न करावा, असे सांगून हा महोत्सव अधिक मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी नागरिकांना आवाहन केले व महोत्सवास शुभेच्छा दिल्या.  

महोत्सवामध्ये कोल्हापूरवासियांना क्रीमसन, अनुष्का, ज्योती, रेडग्लोब, सुपर सोनाक्का, माणिकचमण, कृष्णा सिडलेस, आर.के. सुपर, शरद सिडलेस इत्यादी जातींच्या द्राक्षांची चव चाखायला मिळणार असल्याचे डॉ. सुभाष घुले यांनी प्रास्ताविकामध्ये सांगून उपस्थित सर्वांचे स्वागत केले. दिनकर पाटील यांनी आभार मानले.

याप्रसंगी सेंद्रीय कृषि भूषण पुरस्कार प्राप्त पुजा सावंत, हिंदकेसरी दिनानाथ सिंह, सांगली बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण, पी. डी. सावंत, बबन रानगे, सांगली बाजार समिती व कोल्हापूर कृषि पणन मंडळाचे अधिकारी व कर्मचारी  यांच्यासह द्राक्ष उत्पादक शेतकरी, ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते..

0000000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.