इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०२२

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने विविध पुरस्कारांचे वितरण ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्र समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील -ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ

 


 





        कोल्हापूर दि. 18 (जिमाका): ग्रामपंचायतींचा कारभार सुलभ होण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास विभागाने आजवर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. ग्राम विकास विभागाच्या विविध योजना राबवून ग्रामीण महाराष्ट्र समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

        कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊ बहुउद्देशीय सभागृहात जिल्हा व तालुकास्तरीय यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार, आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार तसेच अन्य विविध पुरस्कारांचे वितरण ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद आणि शिवाजी विद्यापीठामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. तसेच ऑनलाईन शाळा - शिक्षण सक्षमीकरण प्रणालीचा शुभारंभ ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला.

        यावेळी खासदार धैर्यशील माने, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जयवंत शिंपी, सभापती वंदना जाधव, कोमल मिसाळ, रसिका पाटील, शिवानी भोसले, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु दिगंबर शिर्के, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, प्रकल्प संचालक रवी शिवदास तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

      कार्यक्रमात तालुकास्तर स्वच्छता दर्पण व स्वच्छ सुंदर शौचालय पुरस्कार, जल जीवन मिशन अंतर्गत पुरस्काराचे वितरण मंत्री श्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य तसेच विकास योजना तळागाळापर्यंत पोहोचवून ग्राम विकासासाठी योगदान देणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या वाटचालीवर आधारित लघुपटाचे प्रसारण करण्यात आले.

 

       ग्राम विकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी राधानगरी धरणाच्या माध्यमातून जिल्ह्याला सुजलाम सुफलाम बनवले. छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून कोल्हापूर जिल्हा सर्व क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. कोल्हापूर जिल्ह्याच्या व राज्याच्या विकासाची शपथ घेऊन आजवर काम सुरु आहे.

       प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून अधिकाधिक निधी मिळवून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांचा विकास साधण्यात येईल. महाआवास योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यात लाभार्थींना 5 लाख घरे अत्यंत कमी वेळेत बांधून दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ग्रामविकास विभागाचे कौतुक केले होते. दुसऱ्या टप्प्यातील काम देखील जलदगतीने पूर्ण करुन सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण केले जाईल, असे आश्वासन देऊन मंत्री श्री. मुश्रीफ यांनी कोरोनामुळे मयत झालेल्यांच्या वारसांना अर्थसहाय्य, अंगणवाड्या व शाळांच्या इमारतींची दुरुस्ती, प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील सोयी-सुविधा यासाठी अधिकाधिक निधी मिळवून देण्यात आल्याचे सांगितले. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेसह विविध योजनेंतर्गत झालेल्या कामांचा ऊहापोह केला.

         खासदार धैर्यशील माने म्हणाले, कोल्हापूर जिल्हा परिषद ही राज्यात उत्तम जिल्हा परिषद म्हणून आजवर असणारी परंपरा या पुढेही कायम राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा.

         जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील म्हणाले, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध योजना राबवून कोल्हापूरच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

         जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, अनेक चांगले उपक्रम राबवून कोल्हापूर जिल्हा परिषदेचे नाव राज्यासह देशभरात पोहोचले आहे. देशात सर्वात जास्त वेगाने प्रगती करणारा जिल्हा म्हणून नावलौकिक मिळवून देण्यासाठी प्रयत्न करुया अशी साद घालत यापुढेही सर्वांनी नागरिकांच्या हितासाठी आणि गावांच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी केले

       मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी प्रास्ताविकातून जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली.

****

जिल्हास्तरीय यशवंत ग्राम पंचायत पुरस्कार

     2019-20 प्रथम विभागून -कागल पंचायत समितीसाठी- पिराचीवाडी ग्रामपंचायत

               व आजरा पंचायत समितीसाठी-श्रृगांरवाडी ग्रामपंचायत,

               व्दितीय विभागून- करवीर पंचायत समितीसाठी - उचगांव व हिरवडे

               दुमाला ग्रामपंचायत

      2020-21 प्रथम -आजरा पंचायत समितीसाठी - मेंढोली-बोलकेवाडी ग्रामपंचायत

               व्दितीय -हातकणंगले पंचायत समितीसाठी -संभापूर ग्रामपंचायत.

      2021-22 प्रथम -आजरा पंचायत समिती साठी -वेळवट्टी ग्रामपंचायत

               व्दितीय- हातकणंगले पंचायत समितीसाठी – नरंदे ग्रामपंचायत

****

 

 

आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार

जिल्हास्तर सन 2021-22

 2021-22 प्रथम- हातकणंगले तालुक्यातील संभापूर ग्रामपंचायत

 2021-22 व्दितीय- भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव ग्रामपंचायत

 2021-22 तृतीय- आजरा तालुक्यातील वेळवट्टी ग्रामपंचायत

****

आर.आर. (आबा) पाटील तालुका सुंदर गाव पुरस्कार सन 2019-20 धनादेश वितरण

आजरा- मेंढोली

भुदरगड- मडीलगे खुर्द

चंदगड- धुमडेवाडी

गगनबावडा-कोदे बु.

गडहिंग्लज-इंचनाळ

 हातकणंगले- नरंदे

करवीर- उंचगाव

कागल- पिराचीवाडी

पन्हाळा- कोडोली

राधानगरी- येळवडे

शाहुवाडी- शिवारे

शिरोळ-हसूर

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.