इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, २१ फेब्रुवारी, २०२२

 






 

को.प. बंधारा दुरुस्तीची कामे वेळेत करा

                            -पालकमंत्री सतेज पाटील

 

कोल्हापूर, दि. 21 (जिल्हा माहिती कार्यालय) :  जिल्ह्यातील सन 2021-22 या वर्षात मध्यम प्रकल्पांतंर्गत कोल्हापूर पध्दतीच्या 34 बंधारा दुरुस्तीची कामे नियोजित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण व्हावीत, असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले.

सिंचन भवन येथे कालवा सल्लागार समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता महेश सुर्वे, उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, दक्षिणच्या स्मिता माने, मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता एस.आर.पाटील उपस्थित होते.

सन 2021-22 वर्षातील रब्बी व उन्हाळी हंगामासाठी नियोजित पाणी वापराबाबतचा आढावा घेताना सिंचनासाठी उपलब्ध पाणी साठ्याचा वापर काटेकोपणे करावा, पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच मान्सूनपूर्व पाऊस व मान्सूनच्या अंदाजानंतर पूर नियंत्रणाबाबतही सुक्ष्म नियोजन करावे, अशी सूचना करुन, पालकमंत्र्यांनी यावेळी जिल्ह्यातील धामणी प्रकल्प, सर्फनाला, सोनुर्ले, उंचगी, नागणवाडी, मेघोली या प्रकल्पांचा आढावाही त्यांनी घेतला.

त्याचबरोबर विविध मध्यम प्रकल्पात उपलब्ध असलेल्या शिल्लक पाणीसाठ्याचे जिल्ह्यात उद्भावणाऱ्या संभाव्य पूर परिस्थितीच्या  अनुषंगाने गांभीर्यपूर्वक नियोजन करावे, अशी सूचना केली.

सन 2021-22, 22-23 व 23-24 या आर्थिक वर्षात टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील कोल्हापूर पध्दतीचा बंधारा दुरुस्तीची तसेच प्रलंबित धरणाची कामे कालबध्दरित्या पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती महेश सुर्वे यांनी दिली तर सन 21-22 च्या पाणी वापर नियोजनास तसेच 21-22 या वर्षात मध्यम प्रकल्पांतंर्गत येणाऱ्या 34 बंधाऱ्यांच्या दुरुस्तीस मान्यता मिळाली असल्याची माहिती श्री. बांदिवडेकर यांनी यावेळी दिली.

या आढावा बैठकीत कोल्हापूर उत्तर अंतर्गत 12 खोऱ्यातील सुमारे 122 कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांचा दीर्घ आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. या बैठकीसाठी जिल्हा परिषदेचे माजी  अध्यक्ष बजरंग पाटील, सर्वश्री संदीप दावणे, मिलिंद किटवाडकर, (सहा. अभि. श्रेणी 1) व उप कार्य. अभियंता टी.एस. धामणकर यांच्यासह जलसंपदा विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

000000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.