** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, February 15, 2022

‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’साठी मार्गदर्शक सूचना

 


 

कोल्हापूर, दि. 15 (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त      दि. 19 फेब्रुवारी रोजी (शिवजयंती) हा उत्सव  नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करुन साजरा न करता आरोग्याच्या दृष्टीकोनातून काळजी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ उत्सव साजरा करण्यासाठी खालील प्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत :

          कोविड-19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा दि. 31 जानेवारी २०२२ रोजी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.  दिनांक १९ फेब्रुवारी, २०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती" (शिवजयंती साजरी करत असताना शिवज्योत वाहण्याकरिता २०० भाविकांना व शिवजयंती उत्सवाकरिता ५०० भाविकांना परवानगी देण्यात येत आहे. अनेक शिवप्रेमी, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेल्या शिवनेरी अथवा इतर गड़/किल्ल्यांवर जाऊन तारखेनुसार दिनांक 18 फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री 12 वाजता एकत्र येऊन "छत्रपती शिवाजी महाराज जयंती" साजरी करतात. परंतु यावर्षी कोविड- 19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता "छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करावा.

          दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करताना महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु, यावर्षी सांस्कृतीक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येऊ नये. त्या ऐवजी या कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाईन प्रक्षेपण करावे. प्रभात फेरी, बाईक रॅली अथवा मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्या ऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला/प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करून त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन "छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करावी.

          "छत्रपती शिवाजी महाराज जयंती' च्या दिवशी आरोग्य विषयक उपक्रम/शिबीरे (उदा.रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याव्दारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता या बाबत जनजागृती करण्यात यावी. आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे,

          कोवीड-19 च्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच या कार्यालयाकडून, महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करावे. या परिपत्रकानंतर प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सुचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, असेही आदेशात नमुद आहे.

000000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.