कोल्हापूर, दि. 4 (जि.मा.का.) : राज्य शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील
मद्य विक्रीची दुकाने सकाळी 10 ते सायं. 6 या वेळेतच सुरू राहतील, असे निर्देश उत्पादन
शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी काल दिले आहेत.
किरकोळ
मद्यविक्री दुकाने सुरू करण्यास शासनाने काही अटींवर अनुमती दिली असून यामध्ये
फक्त सीलबंद मद्यविक्री करण्यास परवानगी राहील. ग्रामीण भागातील मॉल्स व्यतिरिक्त
सर्व दुकाने सुरू करता येतील. तर शहरी भागात महानगरपालिका व नगरपरिषद हद्दीमधील
मॉल्स, बाजार संकुल व बाजारातील मद्यविक्री दुकाने चालु करता येणार नाहीत.
त्याचप्रमाणे कंटेनमेंट झोन वगळून शहरी भागातील सर्व प्रकारची स्वतंत्र किरकोळ
मद्यविक्रीची दुकाने, कॉलनी दुकाने व निवासी संकुलातील उक्त अनुज्ञप्ती सुरू करता
येतील.
यामध्ये प्रामुख्याने 1) सीलबंद मद्य विक्री करणाऱ्या
दुकानांसमोर 5 पेक्षा अधिक ग्राहक एकावेळी असता कामा नयेत व दोन ग्राहकांमध्ये
किमान 6 फूट अंतर असणे अनिवार्य राहील. त्याकरिता दुकानासमोर प्रत्येक सहा फूटांवर वर्तुळ आखून घ्यावीत. 2) संबंधित
अनुज्ञप्तीधारकाने सर्व नोकरांची/ ग्राहकांची थर्मल स्कॅनिंग करावे व ज्या नोकरास,
ग्राहकास सर्दी, खोकला व ताप यासारखी लक्षणे आहेत अशा व्यक्तींना दुकानात प्रवेश
देवू नये. 3) दुकान सभोवतालचा परिसर दर दोन तासांनी निर्जंतूकीकरण करणे आवश्यक
राहील. दुकानात येणाऱ्या ग्राहकांसाठी हॅण्ड सॅनिटायझर मुबलक प्रमाणात उपलब्ध करून
देण्याची जबाबदारी विक्रेत्यांना पाळणे आवश्यक राहील. 4) संदर्भीय आदेश क्र. 1
मधील परिशिष्ट -1 मधील कामाच्या ठिकाणी पाळण्याची मार्गदर्शक तत्वे किरकोळ
विक्रेत्यांना पाळणे आवश्यक राहील. 5) किरकोळ मद्यविक्री दुकानांमध्ये
लॉकडाऊनबाबतची मार्गदर्शक तत्वे पाळण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ नेमण्याची जबाबदारी
संबंधित अनुज्ञप्तीधारकाची असेल.6) वर नमुद किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती सीलबंद मद्यविक्रीसाठी सकाळी 10 ते
सायं. 6 वाजेपर्यंत कार्यरत राहतील. 7) मुंबई विदेशी मद्य नियम, 1953 च्या नियम 70
(डी) अन्वये विहीत केलेली मद्य बाळगणे/ खरेदी करणे याच्या क्षमतेचा भंग होणार नाही
याची संबंधित मद्यविक्रेत्याने आवश्यक काळजी घ्यावी. 8) कोणत्याही परिस्थितीत
उघडलेल्या मद्य विक्रीच्या आस्थापनांमध्ये मद्यप्राशन होणार नाही याची दक्षता
घ्यावी व अशी बाब आढळल्यास कायद्यातील तरतूदीनुसार कडक कारवाई करण्यात यावी. 9)
अशा कोणत्याही दुकानाने या मार्गदर्शक तत्वांचा भंग केल्यास त्यांचे दुकान बंद
करून त्यांच्याविरूध्द कारवाई केली जाईल. 10) प्रत्येक सीलबंद किरकोळ मद्यविक्री
करणाऱ्या दुकानाच्या प्रवेशव्दारावर दर्शनी भागात पुढीलप्रमाणे फलक लावणे आवश्यक
आहे. यामध्ये दुकानाच्या कामकाजाच्या सुधारित वेळा, एकावेळी दुकानासमोर पाचपेक्षा
अधिक व्यक्ती असू नयेत, सोशल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर अनिवार्य, ग्राहकांचे
थर्मल स्कॅनिंग केले जाईल, ज्या ग्राहकास सर्दी, खोकला व तापासारखी लक्षणे आहेत
त्यांनी दुकानात येवू नये. दुकानात मद्य प्राशन करता येणार नाही, परिसरात
थुंकण्यास सक्त मनाई आहे आणि दुकानदाराकडून व ग्राहकाकडून नियमभंग झाल्यास
त्यांच्याविरूध्द कायद्यान्वये कारवाई केली जाईल.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.