कोल्हापूर,
दि. १० (जिल्हा माहिती कार्यालय)- कोव्हीड-१९ मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा
गैरफायदा घेवून उत्पादन मूल्य किंवा प्रचलित बाजार भावापेक्षा जास्त दराने निविदा
मान्य करुन शासनाची फसवणूक करणाऱ्या पुरवठादारांची चौकशी करुन फौजदारी गुन्हे
दाखल करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी आज याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना पत्र पाठवले आहे.
जिल्ह्यामध्ये
कोव्हिड-१९ रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात लागणारे
साहित्य, औषधे व उपकरणे, तपासणी किट इत्यादीची खरेदी करण्यात आलेली आहे. १२ मार्च
रोजीच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य
चिकित्सक, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता
यांना आवश्यकतेनुसार औषधे, उपकरणे इत्यादी बाबींची प्रापण (Procurement) प्रक्रिया
पार पाडून उपलब्ध करण्यासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे. दि. २७ मार्च रेाजीच्या
आदेशानुसार साहित्य, औषधे, व उपकरणे, तपासण किट इत्यादीची खरेदी करण्यासाठी
खरेदी/पुरवठा अधिकारी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात
आलेली आहे.
खरेदीची
सर्व प्रक्रिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावर
प्रामुख्याने पार पाडण्यात आली आहे. सर्व खरेदी प्रक्रिया पुरवठा प्रक्रिया
प्रचलित शासकीय नियमाप्रमाणे व पारदर्शक पध्दतीने राबविणे बंधनकारक होते.
कोव्हिड-१९ प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी जिल्हा परिषदेस उपलब्ध करुन दिलेल्या,
जिल्हा नियोजन समिती व एस डी आर एफ निधीमधून तसेच एन आर एच एम निधीमधून साहित्य,
औषधे व उपकरणे खरेदी करण्यात आलेली आहेत. त्याचा पुरवठा शासकीय कोव्हिड
रुग्णालयांना करण्यात आलेला आहे.
विविध
संघटना, नागरिकांकडून निवेदन तसेच तक्रारी या खरेदी प्रक्रियेबाबत प्राप्त
झालेल्या आहेत. त्याचबरोबर स्थानिक वृत्तपत्रातून बातम्या प्रसिध्द झालेल्या आहेत.
या
प्रक्रियेमध्ये काही पुरवठादारांनी मोठया प्रमाणात दर आकारुन निविदा मान्य करून
घेतलेल्या आहेत, अशा स्वरूपाच्या तक्रारीदेखील प्राप्त झालेल्या आहेत. एन-९५ मास्क
चे प्रत्यक्ष उत्पादन मूल्य, बाजारातील दर व पुरवठादारास मान्य केलेला दर (निविदा
प्रक्रियेव्दारे) यामध्ये फार मोठी तफावत दिसून येत आहे. हे सर्व साहित्य, उपकरणे,
औषधे यांच्या खरेदीमध्ये अशा प्रकारे तफावत आहे, अगर कसे? याबाबत आवश्यक ती तपासणी
करण्यात यावी. त्याचप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत अनावश्यक बाबी किंवा अनावश्यक
खरेदी झालेली नाही, याबाबतही तपासणी करण्यात यावी, उत्पादन मूल्य किंवा प्रचलित
बाजारभाव यांच्यापेक्षा जास्त दराच्या निविदा मान्य झाल्या असल्यास ही बाब
कोव्हिड-१९ मुळे निर्माण झालेल्या परिस्थिताचा गैरफायदा घेण्यासाठी केलेली
असल्याने (Unfair -Trade Practices या भाग आहे. त्याचप्रमाणे ग्राहक संरक्षण कायदा
तसेच औषधे किंमत नियंत्रण आदेश १९९५ अंतर्गत NPPA या प्राधिकरणाने निश्चित
केलेल्या दरापेक्षा जास्त दर घेता येत नसल्याने त्या अंतर्गत तपासणी होऊन कारवाई
होणे आवश्यक आहे.
या
खरेदीबाबत आवश्यक ती तपासणी व चौकशी करून पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
1) विविध साहित्य
पुरवठादारांनी मान्य करून घेतलेल्या दराची तुलना खुल्या बाजारातील दर व उत्पादन
मुल्यांशी करुन यामध्ये तफावत असल्यास संबंधीत पुरवठादारास कोणत्याही परिस्थितीत
देयके अदा करण्यात येऊ नयेत. याबाबत आवश्यक ती खात्री करून योग्य दर निश्चित करावा
व त्याप्रमाणात देयके अदा करण्याची कार्यवाही करावी.
2) काही पुरवठादारांना अंशत:
देयके अदा केली असल्यास, त्यांचे उर्वरित देयक अदा करण्यापूर्वी योग्य दर निश्चित
केल्यानंतर त्या प्रमाणे पुरवठ्याचे प्रमाणात त्या बाबीचे किंवा त्यांच्याकडून
खरेदी केलेल्या इतर बाबीचाही विचार करुन तपासणी अंती योग्य देयक अदा करावे. परंतु,
पुरवठ्याचे एकूण मूल्य, योग्य दराने परिगणीत केल्यानंतर शिल्लक रक्कम रहात असल्यास
तेवढीच रक्कम अदा करावी. परंतु, अशा पुरवठादारांना त्यांनी पुरवठा केलेल्या सर्व
बाबीची संपूर्ण देयक यापूर्वीच अदा केली गेली असल्यास अतिरिक्त रक्कम
त्यांच्याकडून नियमानुसार सक्तीचे उपायाने वसूल करावी.
3) ज्या पुरवठादारांनी अशा
प्रकार शासनाची फसवणूक केली आहे, असे निदर्शनास आल्यास, त्यांचे विरुद्ध
फसवणुकीसाठी फौजदारी गुन्हे दाखल करावेत या पुरवठादारांना काळया यादीमध्ये
समाविष्ठ करण्याची कार्यवाही करुन सर्व संबंधीतांना कळविण्यात यावे.
4) विविध साहित्य / उपकरणे
याची अनावश्यक रित्या जादा दराने खरेदी करून ठेवली असल्यास त्याबाबत जबाबदारी
निश्चित करावी. त्याप्रमाण विविध कोव्हिड रुग्णालयांना वितरित केलेले साहित्याचा
आढावा घऊन त्याचा विनियोग योग्य रित्या व शासकीय नियमाप्रमाणे झाला असल्याचे
संबंधित रुग्णालयाच्या प्रमुखांकडून प्रमाणित करून घ्यावे.
साहित्याचा विनियोग योग्य रित्या झालेला नाही, असे निदर्शनास आल्यास
त्याबाबतही जबाबदारी निश्चित करावी, असे नमूद केले आहे.
0 0 0 0 0
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.