** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, May 4, 2020

इचलकरंजीत कोरोना बाधित रुग्ण; नियमांचे पालन न झाल्यास लॉकडाऊन अधिक तीव्र - जिल्हाधिकारी दौलत देसाई





कोल्हापूर, दि. 4 (जिल्हा माहिती कार्यालय)  : इचलकरंजीमध्ये एक रुग्ण कोरोना बाधित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भीती अधिक वाढली आहे. काही प्रमाणात सूट दिल्याने मोठ्या प्रमाणात अनावश्यक हालचाल वाढली आहे. यामुळे आपली सुरक्षितता धोक्यात आणत आहोत. लॉकडाऊनच्या नियमांचे पालन न झाल्यास लॉकडाऊन अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला.
लॉकडाऊनचे नियम पाळावेत, अनावश्यक घरातून बाहेर पडू नये, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. देसाई पुढे म्हणाले, इचलकरंजीमध्ये आज एक रुग्ण सापडल्याने भीती पुन्हा वाढली आहे. उद्योगधंदे सुरु  करण्यासाठी काही प्रमाणात सूट दिली आहे. त्यामुळे नागरिकांची फार मोठ्या प्रमाणात घराबाहेर हालचाल वाढल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी संयम ठेवून घरातच रहावे. अनावश्यक हालचालीने आपण सुरक्षितता धोक्यात आणत आहोत. नागरिकांनी लॉकडाऊनचे सर्व नियम पाळावेत. पुढील कालावधीत चांगल्या पध्दतीने लॉकडाऊन पाळू शकतो.
 जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या लिंकवर जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी 22 हजार 78 जणांनी तर जिल्ह्यामध्ये येण्यासाठी 15 हजार 754 जणांनी अशा एकूण 37 हजार 832 जणांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. याबाबत जिल्हा प्रशासनाने कार्यवाही सुरु केली आहे. पहिल्या टप्यात जिल्ह्यातील निवारा केंद्रामध्ये अडकून पडलेल्या लोकांना त्या त्या जिल्ह्यामध्ये, त्या त्या राज्यामध्ये पाठविण्याचे काम सुरु केले आहे. याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून त्यांची संमती विचारली आहे. दोन-तीन दिवसात या सर्वांना त्यांच्या जिल्ह्यात पाठविण्याची प्रक्रिया सुरु होईल.
 त्याचप्रमाणे जिल्ह्यात अडकून पडलेल्या लोकांची तालुकावार याद्या करुन त्या त्या तहसिलदारांकडे पाठविण्यात आल्या आहेत. तहसिलदार या सर्व याद्यांची तपासणी करतील. अनावश्यक कोणी बाहेर जातय का? अनावश्यक कोणी आत येतय का? याची तपासणी करतील. जे पात्र असतील त्यांची वैद्यकीय तपासणी करुन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवतील. त्यानंतर त्या त्या जिल्ह्यांकडे ती माहिती पाठवून त्यांची संमती घेण्यात येईल.   
000000


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.