** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, May 4, 2020

विना मास्क, विना ग्लोव्हज 76 जणांना 20 हजार 350 रुपयांचा दंड ग्रीन झोनमध्ये जाण्यासाठी लॉकडाऊनचे काटेकोर पालन करा - डॉ. मल्लिनाथ कलशेटृी






        कोल्हापूर, दि. 4 (जिल्हा माहिती कार्यालय)- लॉकडाऊनमधून काही प्रमाणात सूट मिळालेल्या आजच्या पहिल्याच दिवशी महापालिका आयुक्त डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आणि त्यांच्या पथकाने शहरातीन विना मास्क, विना ग्लोव्हज असणाऱ्या नागरिक आणि व्यावसायिक अशा 76 जणांना 20 हजार 350 रुपयांचा दंड ठोठावला. ऑरेंज झोनमधून ग्रीन झोनमध्ये जाण्यासाठी पुढील 15 दिवस लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करा, असे आवाहन करतानाच अधिक तीव्रपणे पथकांना सक्रिय करुन कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.
 विभागीय आरोग्य निरीक्षक निखिल पाडळकर, आरोग्य निरीक्षक करण लाटवडे, महेश भोसले स्वप्नील उलपे, राहूल राजगोळकर, ऋषिकेश सरनाईक, जयवंत पवार, शिवाजी शिंदे, राजेश पाटील आणि गीता लाखन यांच्या पथकाने आज शहरात 76 जणांवर कारवाई केली. यामध्ये नागरिक, व्यावसायिक यांचा समावेश होता.
 अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी अजिबात घराबाहेर पडू नये, असे सांगून महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, आजपासून उद्योग व्यवसायासाठी काही प्रमाणात सूट दिली. याचा अर्थ कोरोना हद्दपार झाला असा नव्हे. पुढील 15 दिवस हे अत्यंत महत्वाचे आहेत. सूट मिळाल्याने अनावश्यक गर्दी वाढल्यास अधिकचा धोका वाढणार आहे. त्यामुळे आपला जिल्हा ग्रीन झोनमध्ये जाण्यासाठी नागरिकांनी रस्त्यांवर अजिबात विनाकारण गर्दी करु नये. उद्यापासून पथकांची संख्या वाढवून अधिक तीव्रपणे कारवाई करण्यात येईल. लॉकडाऊनचे नियम सक्तीने पाळावेत. मास्क, भाजी विक्रेत्यांनी हँड ग्लोव्हज याचा वापर करावा, सामाजिक अंतर पाळावे, असे आवाहनही डॉ. कलशेट्टी  यांनी केले.
116 वाहनांमधून महापालिकेतर्फे प्रबोधन
        कोल्हापूर महानगरपालिकेच्या 104 टिपर, 5 रिक्षा, 1 चित्ररथ आणि 6 जीप अशा 116 वाहनामधून कोव्हिड-19 बाबत घ्यावयाची काळजी, उपाययोजना याबाबत नागरिकांचे प्रबोधन करण्यात येत आहे, अशी माहिती डॉ. कलशेट्टी यांनी यावेळी दिली.


000000


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.