** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, June 12, 2020

खातेदार शेतकरी आणि कुटुंबातील एका सदस्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना लागू -जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे



कोल्हापूर,दि. 12 (जिल्हा माहिती कार्यालय): सन 2019-20 मध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती वाढवून राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या कोणताही एक सदस्य (आई-वडील, शेतकऱ्याचा पती/पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यापैकी एक सदस्य) असे 10 ते 75 वयोगटातील एकूण 2 जणांना विमा योजना राबविण्यास मान्यता दिली आहे.
अपघातग्रस्त कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता सुमारे 1.52 कोटी वहिती खातेदार शेतकरी व वहिती खातेदार म्हणून नोंद नसलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियातील एका सदस्याचा देखील विमा योजनेत समावेश करून एकूण 3.04 कोटी जणांना व्यापक व सर्वसमावेश करण्यात आलेली आहे. खातेदार शेतकऱ्यांकरीता शासन स्वत: विमा हप्ता भरते.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना दिनांक 10 डिसेंबर 2019 ते 9 डिसेंबर 2020 या कालावधीकरिता आहे. या योजनेमध्ये अपघाती मृत्यू झाल्यास अथवा दोन अवयव निकामी झाल्यास रू. 2 लाख व एक अवयव निकामी झाल्यास रू. 1 लाख नुकसान भरपाई देण्यात येते. या योजनेचा शासन निर्णय व मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जिल्ह्यातील सर्व सरपंच, कामगार तलाठी व पोलिस पाटील यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील एखाद्या वहितीधारक शेतकऱ्याचा अथवा त्याच्या कुटुंबातील सदस्याचा अपघातामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास या योजनेची माहिती द्यावी. योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक किंवा ग्रामस्तरावरील कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही केले आहे.
0000000


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.