** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, October 1, 2021

पर्यटक आपला अतिथी समजून त्याचे आदरातिथ्य करा - उपविभागीय अधिकारी वसुंधरा बारवे





 


कोल्हापूर, दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय): तालुक्यात येणाऱ्या पर्यटकाला आपला अतिथी समजून त्याचे आदरातिथ्य करावे. येणाऱ्या पर्यटकांमध्ये आणि स्थानिक लोकांमध्ये आपलेपणा निर्माण व्हावा, असे मत आजरा- भुदरगड विभागाच्या उपविभागीय अधिकारी वसुंधरा बारवे यांनी भुदरगड येथे हेरिटेज वॉक  प्रसंगी व्यक्त केले.

यावेळी तहसिलदार अश्‍विनी वरुटे यांच्या हस्ते आणि सरपंच सुरेखा देऊलकर, उपसरपंच राजाराम सुतार, मधुकर देऊलकर यांच्यासह स्थानिकांच्या उपस्थितीत गडपूजन करण्यात आले. पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड यांनी कोल्हापूर जिल्हा पर्यटन सप्ताहाचा उद्देश विशद केला.

         भुदरगडनंतर किल्ले सामानगडाला भेट दिली. दुर्गवीर प्रतिष्ठानचे कैलास परीट यांनी सामानगडाच्या संवर्धनासाठी लोकवर्गणीतून केलेल्या कामांची माहिती दिली. यावेळी तहसिलदार दिनेश पारगे यांनी पर्यटन सप्ताहाच्या माध्यमातून सुरु झालेल्या उपक्रमांमधून जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळेल असा विश्‍वास व्यक्त केला जिल्हा परिषद सदस्या राणी खमलेहट्टी, पंचायत समिती सदस्य विद्याधर गुरबे, सुनील शिंत्रे, गटविकास अधिकारी शरद मगर, चिंचेवाडीच्या सरपंच राजश्री घेवडे यांच्यासह गडप्रेमी उपस्थित होते.

       सामानगडानंतर नेसरीला भेट देऊन सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यासह सात मावळ्यांच्या बलिदानाचं स्मरण करण्यात आलं. बाळासाहेब कुपेकर यांनी सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या स्मारकाच्या उभारणीची माहिती दिली. यानंतर नरवीर तानाजी मालुसरेंच्या वशंजांचा रहिवास असलेल्या किल्ले पारगडला भेट देण्यात आली. तहसिलदार अनंत कांबळे यांनी पर्यटन सप्ताहाच्या माध्यमातून तयार होणाऱ्या पर्यटन विकासाच्या उपक्रमांतून चंदगड तालुक्याला पर्यटन विकासाच्या संधी उपलब्ध होतील असा विश्‍वास व्यक्त केला. स्थानिक तरुण प्रवीण चिरमुरे यांनी पारगड वरील बहुसंख्य रहिवाशी रोजगारासाठी मुंबईमध्ये राहत असून स्थानिक पातळीवर त्यांना रोजगार उपलब्ध होण्याची गरज असल्याचे सांगितले.

      यावेळी पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांसह महसूल आणि वन विभागाचे अधिकारी आणि स्थानिक उपस्थित होते. या दिवसभराच्या भेटीमध्ये पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, वन्यजीव मंडळाचे सदस्य सुहास वायंगणकर, वन्यजीव अभ्यासक आशिष पिलानी, साहसी पर्यटनतज्ञ विनोद कांबोज, ऋषीकेश केसकर, प्रमोद पाटील, यांच्यासह माध्यम प्रतिनिधींचा सहभाग होता. या भेटी दरम्यान प्रबोधनपर गीतं शौर्यगीतं आणि पोवाडे सादर करत शाहीर विशारद डॉ.आझाद नायकवडी यांनी रंगत आणली.

000000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.