येत्या काळात कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनाला निश्चितच चालना मिळेल -श्रीमंत शाहू महाराज
◆ 'टाऊन हॉल ते पंचगंगा घाट' मार्गावर नियमितपणे
'हेरिटेज वॉक' सुरु राहण्यासाठी प्रयत्नशील- जिल्हाधिकारी राहुल रेखावार
◆ शिवकालीन युद्धकला व पोवाड्याचे सादरीकरण
◆ भर पावसात देखील 'हेरिटेज वॉक'ला मान्यवरांसह
उपस्थितांचा
उत्स्फूर्त प्रतिसाद
◆ पंचगंगा नदीच्या आरतीने सप्ताहाचा समारोप
कोल्हापूर, दि.3 (जिमाका): जिल्ह्यातील
निसर्ग, ऐतिहासिक वास्तू, हॉस्पिटल यांसह
इथली 'चांगली लोकं' या सर्वांमुळे येत्या काळात जिल्ह्याकडे पर्यटकांचा ओढा
वाढेल व येथील पर्यटनाला निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास श्रीमंत शाहू महाराज
यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर
जिल्ह्याची ओळख जागतिक पर्यटन स्थळ म्हणून होण्याच्या दृष्टीने पालकमंत्री सतेज
पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात दि.26
सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान जागतिक पर्यटन दिन सप्ताह राबविण्यात आला. आज
'हेरिटेज वॉक' उपक्रमानंतर पंचगंगा घाटावर पंचगंगा नदीच्या आरतीने या पर्यटन
सप्ताहाची सांगता झाली. यावेळी श्रीमंत शाहू महाराज, डी. वाय. पाटील ग्रुपचे
अध्यक्ष संजय डी. पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, विभागीय वन अधिकारी विशाल
माळी, अर्जुन पुरस्कार विजेत्या टेबल टेनिस पटू शैलजा साळुंखे, वास्तू विशारद
अमरजा निंबाळकर, मूर्ती अभ्यासक उमाकांत राणींगा, क्रेडाई चे अध्यक्ष विद्यानंद
बेडेकर, हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्वल नागेशकर, चेंबर ऑफ कॉमर्स चे आनंद माने,
व्ही.बी. पाटील, टाक चे अध्यक्ष बळीराम वराडे, हिल रायडर्स चे प्रमोद पाटील, विनोद
कांबोज, ऋषिकेश केसकर, शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचचे सूरज ढोली, शाहीर आझाद
नायकवडी, पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड यांच्यासह पर्यटन क्षेत्रात कार्यरत विविध
मान्यवर उपस्थित होते. यावेळी 'राधानगरी जंगल सफारी' गाडीचे श्रीमंत शाहू महाराज व संजय डी. पाटील यांच्या
हस्ते लोकार्पण करण्यात आले. शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचचे सूरज ढोली व
त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवकालीन युद्धकलांचे प्रात्यक्षिक सादर करुन इतिहासाच्या
आठवणी ताज्या केल्या. यानंतर टाऊन हॉल ते पंचगंगा घाट या मार्गावर हेरिटेज वॉक
करण्यात आला. हा वॉक टाऊन हॉल- सिपीआर रुग्णालय-जुने जिल्हा न्यायालय- चिमाजी
महाराज उद्यान- नर्सरी बाग(राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ)- श्रीकृष्ण
मंदिर- पंचगंगा घाट या मार्गाने श्रीमंत शाहू महाराज यांच्यासह मान्यवरांसह
हेरिटेज वॉक झाला. पंचगंगा घाटावर शाहीर आझाद नायकवडी यांनी पंचगंगा प्रदूषण
रोखण्याविषयी जनजागृतीपर पोवाडा सादर केला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पंचगंगा
नदीच्या आरतीने पर्यटन सप्ताहाची सांगता झाली.
जिल्ह्यात पर्यटन
सप्ताहाद्वारे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह सर्वजण विविध उपक्रम राबवून
पर्यटनाला चालना देत असल्याबद्दल श्रीमंत शाहू महाराज यांनी यावेळी
जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुक केले. श्रीमंत शाहू महाराज म्हणाले, जागतिक पर्यटन
स्थळाच्या दर्जाची अनेक ठिकाणे जिल्ह्यात आहेत.
कोरोना प्रादुर्भाव परिस्थिती जसजशी निवळेल, तसतसे नागरिक पर्यटनाच्या
हेतूने घराबाहेर पडतील. पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व बाबींनी कोल्हापूर
जिल्हा परिपूर्ण असल्यामुळे जिल्ह्याकडे पर्यटकांचा ओढा वाढून येथील पर्यटन वाढेल.
जिल्हाधिकारी
राहुल रेखावार म्हणाले, पर्यटन सप्ताहाच्या निमित्ताने जिल्ह्यातील ऐतिहासिक बाबींसह राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या
आठवणींना उजाळा देण्यात आला. 'टाऊन हॉल ते पंचगंगा घाट' या मार्गावर आज घेण्यात
आलेला 'हेरिटेज वॉक' उपक्रम यापुढेही नियमितपणे सुरु राहण्यासाठी प्रयत्न करण्यात
येतील, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, जिल्ह्यातील विविध
क्षेत्रातील उद्योजक, विविध सामाजिक संस्था व लोकसहभागातून चालवलेली ही मोहीम
यापुढेही पुढे सुरू राहण्यासाठी निश्चितच प्रयत्न करण्यात येतील.
डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय पाटील
म्हणाले, या सप्ताहात पर्यटन विकासाच्या दृष्टीने खूप चांगले उपक्रम राबविण्यासाठी
जिल्हा प्रशासनासह सर्वांनी खूप मेहनत घेतली आहे. अनेकविध चांगल्या बाबींचा समावेश
असणाऱ्या आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटन क्षेत्र विस्तारण्याच्या दृष्टीने
येथील विविध पर्यटन स्थळांची माहिती
सर्वांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. जिल्ह्यात अनेक पर्यटक येतात.
पर्यटकांना आवश्यक त्या सर्व सोयी- सुविधा देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल,
असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
उपस्थित
मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या उपस्थितीत हेरिटेज वॉक पार पडला.
कोल्हापूर जिल्हा पर्यटन सप्ताहात निसर्ग चित्र
शिल्प प्रात्यक्षिक, रांगणा, सामानगड, भुदरगड, पारगड आदी गड भ्रमंती, गगनबावडा
ग्राम भ्रमंती, सायकल रॅली, बाईक रॅली, राधानगरी, दाजीपूर जंगल सफारी आदी विविध
प्रकारचे ऐतिहासिक पर्यटन, निसर्ग पर्यटन, कृषी पर्यटन, वन पर्यटन, औद्योगिक
पर्यटन, साहसी क्रीडा पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविधांगी पर्यटनाची
माहिती सर्वदूर पोहोचवण्यात आली.
0000000





No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.