** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, October 2, 2021

अंबाबाईच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंगची सुविधा -पालकमंत्री सतेज पाटील

 




 

·        एका तासात अंदाजे पाचशे लोकांना दर्शनाची सुविधा उपलब्ध करणार

·        ऑनलाईन बुकिंगमुळे दर्शनासाठी भाविक स्लॉट प्रमाणे मंदिर परिसरात आल्यास गर्दीवर नियंत्रण

·        अंबाबाई मंदिराच्या परिसरातील रस्ते महापालिकेने त्वरित दुरुस्त करावेत

 

         कोल्हापूर, दि.2 (जिमाका):- नवरात्र महोत्सवास 7 ऑक्टोबर 2021 पासून सुरुवात होत आहे. त्या अनुषंगाने कोल्हापूर शहरात व अंबाबाई मंदिर परिसरात गर्दी होऊ नये. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस विभागाने योग्य ती दक्षता घ्यावी. तसेच भाविकांना अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी ऑनलाईन बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती राज्याचे गृह (शहरे), संसदीय कार्य, गृहनिर्माण, माहिती तंत्रज्ञान व माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

       जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित नवरात्र महोत्सव व कोल्हापूर शहरातील रस्त्यातील खड्ड्यांबाबत आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील बोलत होते. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडी यांच्यासह अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

      पालकमंत्री सतेज पाटील पुढे म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिर परिसरात सर्व भाविकांना ऑनलाईन बुकींग करून दर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात असून प्रत्येक तासाला अंदाजे पाचशे भाविकांना दर्शन मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दिनांक 5 ऑक्टोबर पासून ऑनलाईन बुकिंग करण्यास सुरुवात होणार आहे. सुरुवातीला दिनांक 7, 8 व 9 ऑक्टोबर 2021 अशा तीन दिवसाचे ऑनलाईन बुकिंग भाविकांना करता येणार आहे. त्यानंतर पुढील दिवसांचे बुकिंग करता येईल. ऑनलाईन बुकिंगसाठी लवकरच लिंक उपलब्ध करून देणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

       

अंबाबाईच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिल्याने भाविक त्यांना दिलेल्या स्लॉट प्रमाणे दर्शनासाठी मंदिरात येतील, त्यामुळे मंदिर परिसरात भाविकांची अधिक गर्दी होणार नाही. तसेच कोरोनाच्या नियमावलीचेही पालन करणे शक्य होणार आहे, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगून नवरात्र महोत्सवाच्या अनुषंगाने मंदिरात सर्व सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात. यामध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता सर्व संबंधित यंत्रणांनी घ्यावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

कोल्हापूर शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची कार्यवाही महापालिकेने त्वरित करावी

        कोल्हापूर शहरात सर्व प्रकारच्या रस्त्यांची एकूण लांबी 974 किलोमीटर असून अमृत योजनेअंतर्गत ड्रेनेज लाईन टाकणे, गॅस पाईपलाईन टाकणे व आमदार खासदार निधीतून करण्यात आलेली ड्रेनेज लाईनची कामे असे जवळपास पाचशे दोन किलोमीटरच्या रस्त्यावर खुदाई करण्यात आल्याचे दिसून येत आहे. तसेच शहरातील 44 रस्त्यांची कामे खराब झालेली असून ती कामे संबंधित ठेकेदाराकडून त्वरित दुरुस्त करून घ्यावीत, असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले तर उर्वरित रस्त्यांची कामे 15 ऑक्टोबरनंतर पूर्ण करावी. तसेच नवरात्र महोत्सवाच्या अनुषंगाने अंबाबाई मंदिर परिसरातील  रस्त्यांची कामे तात्काळ दुरुस्त करून घ्यावीत, असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले.

         यावेळी आमदार चंद्रकांत जाधव यांनीही आपल्या सूचना मांडल्या. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण पश्चिम महाराष्ट्र मंदिर समितीचे सचिव शिवराज नाईकवाडी यांनी पालकमंत्री महोदयांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे त्वरित कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.

000000

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.