** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, October 1, 2021

पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराची साखळी निर्माण होऊन ग्रामीण भागात नवी अर्थव्यवस्था उदयास येईल - पालकमंत्री सतेज पाटील

 










कोल्हापूर, दि.1 (जिमाका): कोल्हापुरातील पर्यटन स्थळांची नावे, राज्य, देश आणि जगाच्या नकाशात यावीत यासाठी प्रयत्न केले जात असून पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्यात रोजगाराचे व उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. पर्यटनाच्या व्यवस्थेतून रोजगाराची साखळी निर्माण झाल्यास स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊन ग्रामीण भागात नवी अर्थव्यवस्था उदयास येईल,असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज व्यक्त केले.

 जिल्ह्यात जागतिक पर्यटन दिन व सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने  पन्हाळा तालुक्यातील जेऊर येथील व्हर्टीकल ॲडव्हेंचर पार्क या सहाशी पर्यटन केंद्रास पालकमंत्री श्री. पाटील यांनी भेट दिली. याप्रसंगी खासदार धैर्यशील माने, पन्हाळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा रुपाली धडेल, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, उपविभागीय अधिकारी अमित माळी, तहसिलदार रमेश शेंडगे, जेऊरच्या सरपंच संजिवनी दाभोळकर, व्हर्टीकल ॲडव्हेंचर पार्कचे सदस्य विनोद कांबोज, ऋषिकेश केसकर, प्रमोद पाटील, उदय गायकवाड यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, ग्रामस्थ आणि पर्यटक उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, कोल्हापूरचे वैभव, येथील ऐतिहासिक वारसा याबरोबरच निसर्ग पर्यटन, गड किल्ले हे कोल्हापूर वेगळेपण जगाच्या नकाशावर यावे यासाठी पर्यटन सप्ताह साजरा केला जात आहे. पर्यटनाच्या वृद्धीसाठी राबविण्यात येणारे उपक्रम नियमित सुरु राहणार आहेत. पर्यटनातून रोजगार निर्मिती करण्यावर भर राहणार असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, येत्या काही वर्षात पर्यटन केंद्रांच्या माध्यतून दोन-तीन लाख लोकांना रोजगार उपलब्ध होईल.

श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्यातील पर्यटनाच्या वाढीसाठी जिल्हा वार्षिक योजतून कायमस्वरुपी निधीची तरतुद करण्याचा मानस आहे. सर्वांना विश्वासात घेऊन पर्यटनामध्ये चांगले उपक्रम राबविले जातील.  मसाई पठारावर  नवनवीन उपक्रम राबविण्याबाबत संबंधित विभागाकडून माहिती घेतली जाईल. या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यतून रोजगार निर्मिती करण्यावर भर राहील. जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी जिल्हाधिकारी राहूल रेखावार घेत असलेला पुढाकार गौरवास्पद असल्याचे ते म्हणाले.

सहाशी पर्यटनात व्हर्टीकल ॲडव्हेंचर पार्क माईल स्टोन ठरेल

सहाशी पर्यटनाला चालना देण्यासाठी जेऊर येथे विकसित करण्यात आलेला व्हर्टीकल ॲडव्हेंचर पार्क

सहाशी पर्यटनात माईल स्टोन ठरेल, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. पालकमंत्री श्री. पाटील यांनी झीप लाईन या सहाशी उपक्रमाचा आनंद घेतला. खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनीही या उपक्रमांचा आनंद घेतला. जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी तद्नंतर हाय रोप कोर्स आणि बंजी इजक्शन या सहाशी उपक्रमांचाही आनंद घेतला. 

            खासदार श्री. माने म्हणाले, झीप लाईन या सहाशी उपक्रमाचा आनंद मी आज प्रथमच घेतला. निसर्गाशी एकरुप होण्याची संधी मिळाली.जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी पालकमंत्री सतेज पाटील आणि जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी यामध्ये घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. यातून जिल्ह्यातील पर्यटन स्थळे जगाच्या नकाशावर पोहचतील. जेऊर येथील व्हर्टीकल ॲडव्हेंचर पार्कमुळे आता कोल्हापूर सहाशी पर्यटनामध्येही अग्रही राहील.

            जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, कोल्हापूरला सर्व क्षेत्रात वेगळी ओळख आहे. आता पर्यटनामध्ये जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण करण्याचा मानस आहे.  कोल्हापूरला लाभलेला संपन्न, समृद्ध वारसा सर्वांसमोर आणायचा आहे. पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्यात रोजगार निर्मितीची साखळी निर्माण करण्यात येणार असून गावकऱ्यांनी यामध्ये आपले योगदान द्यावे.

            सिनेअभिनेते भरत जाधव म्हणाले, कोल्हापूर पर्यटनामध्ये पुढे जातेय हे पाहून मी कोल्हापूरकर असल्याचा अभिमान वाटतो. पर्यटनामध्ये जिल्ह्याचे नाव पुढे आण्यासाठी प्रशासनामार्फत सुरु असलेले प्रयत्नांमध्ये आपण नेहीमीच सहभागी होऊ.

            प्रारंभी विनोद कांबोज यांनी व्हर्टीकल ॲडव्हेंचर पार्क बद्दल व येथे सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

            यावेळी पालकमंत्री श्री. पाटील व मान्यवरांच्या हस्ते व्हर्टीकल ॲडव्हेंचर पार्क येथील कॅम्पर व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले.

000000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.