कोल्हापूर, दि. 29 (जिमाका): दीपावली-दिवाळी
हा दिव्यांचा सण. जगभरच्या प्राचीन संस्कृतींमध्ये दिवा हे प्रकाशाचे,
सकारात्मकतेचे, आशेचे प्रतीक मानले गेले आहे. भारतीय संस्कृतीत दिवाळीच्या सणाला
जितके अनन्य महत्त्व आहे; तितकेच भारतीय निवडणुकांमध्ये विशेष संक्षिप्त पुनरीक्षण
कार्यक्रमाला, अन् ओघाने मतदार यादीला. यंदाच्या नोव्हेंबरमध्ये दिवाळी आहे आणि
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमसुद्धा. हे औचित्य साधून मुख्य निवडणूक
अधिकारी कार्यालयाने यंदा ‘लोकशाही दीपावली’ स्पर्धा आयोजित केली आहे.
मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी आणि मतदार नोंदणीचा नवीन अर्हता दिनांक
जाहीर करण्यासाठी भारत निवडणूक आयोग दरवर्षी पुनरीक्षण कार्यक्रम राबवत असते. यंदा
हा कार्यक्रम १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत राबवला जाणार आहे. १
नोव्हेंबर २०२१ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये
प्रारूप मतदार यादी जाहीर केली जाईल. या कार्यक्रमांतर्गत १ जानेवारी २०२२ रोजी १८
किंवा अधिक वय असलेले नागरिक मतदार यादीत आपलेनाव नोंदवू शकतील. विशेष संक्षिप्त
पुनरीक्षण कार्यक्रमाची अधिक माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या
संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सक्षम लोकशाहीची पहिली पायरी ही मतदार नोंदणी असते, हे लक्षात घेऊन आकाशदिवा
तयार करताना आणि रांगोळी काढताना, नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदवावे. यासाठी
आकाशदिवा आणि रांगोळी यांमध्ये लोकशाही, निवडणूक, मतदान यासंबंधीच्या विविध
प्रतीकांचा वापर करता येईल. उदा. डाव्या हाताचे अंगठ्याच्या बाजूचे शाई लावलेले
बोट, मतदान केंद्र, मतदान पत्रिका, ईव्हीएम मशीन
इ. वापरता येईल. शिवाय, मतदार नोंदणी; नाव वगळणी; तसेच, मतदारांनी त्यांचे नाव, पत्ता,
जन्मदिनांक, वय, लिंग, मतदार ओळखपत्र इत्यादी तपशिल अचूक आहेत हे
मतदार यादीत पाहावे. चुकीच्या तपशिलांत दुरुस्त्या कराव्यात, याकरता मतदारांना आवाहन करण्यासाठी
आकर्षक घोषवाक्यांचा वापर करता येईल.
बऱ्याच मतदारांना असे वाटते की, आपल्याकडे मतदार ओळखपत्र आहे म्हणजे आपण मतदान
करू शकतो. पण तसे नाही, मतदान करण्यासाठी मतदार यादीत नाव असणे अत्यंत आवश्यक आहे.
तेव्हा सर्व मतदारांनी मतदार यादीत आपले नाव आणि इतर तपशील तपासावेत, तपशिलात बदल
असतील तर संबंधित अर्ज भरावेत, १८ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन आकाशदिवा आणि रांगोळी यांच्या माध्यमातून करता येईल.
स्पर्धा सर्वांसाठी खुली असून, स्पर्धकांनी स्पर्धेचे साहित्य १५ नोव्हेंबर
२०२१ पर्यंत https://forms.gle/hHf11MvySTVUmccZ6 या
दुव्यावर पाठवावे. आकाशदिवा आणि रांगोळी या दोन्ही स्पर्धांसाठी प्रत्येकी अकरा हजार रुपये (प्रथम क्रमांक), सात हजार
रुपये (द्वितीय क्रमांक), पाच हजार रुपये (तृतीय क्रमांक) आणि दोन्ही स्पर्धांसाठी
प्रत्येकी एक हजार रुपयांची दहा उत्तेजनार्थ पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी ८६६९०५८३२५ (प्रणव सलगरकर) या व्हॉट्सअॅप क्रमांकावर
संदेश पाठवून संपर्क साधावा. स्पर्धेची आणि विशेष संक्षिप्त पुनरीक्षण
कार्यक्रमाची अधिक माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर पाहता
येईल. अधिकाधिक स्पर्धकांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन यंदाची दिवाळी लोकशाहीमय
करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.
स्पर्धेची नियमावली :
१. स्पर्धा
सर्वांसाठी खुल्या आहेत.
२. स्पर्धकाला
आकाशदिवा आणि रांगोळी यांपैकी एका किंवा दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घेता येईल.
दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी दोन्हींचे साहित्य गुगल अर्जामध्ये
उल्लेख केल्याप्रमाणे स्वतंत्र विभागात पाठवावे.
३. आकाशदिवा
(आकाशकंदील) स्पर्धा :-
अ. आकाशदिवा तयार करण्यासाठी पर्यावरणपूरक साहित्य
वापरलेले असावे.
आ.
लोकशाही, मतदार नोंदणी, मताधिकार
याविषयांना अनुसरून तयार केलेल्या आकाशदिव्याचे विविध कोनांतून काढलेले तीन फोटो
पाठवावेत.
इ.
प्रत्येक फोटो हा जास्तीत-जास्त ५ MB साइजचा व JPG फॉरमॅटमध्येच असावा. तीनही फोटोंची एकत्रित साइज १५ MB पेक्षा जास्त असू नये.
ई. फोटोवर कोणाचेही नाव, लोगो, चित्र, फ्रेम, डिजाइन, असे अधिकचे काही जोडू नये.
उ. आकाशदिवा
स्पर्धेसाठी टांगलेल्या आकाशदिव्याची चित्रफीत पाठवावी, जेणेकरून आकाशदिव्याची
सजावट चहुबाजूंनी दिसू शकेल. ही चित्रफीत कमीत-कमी ३० सेकंदांची आणि जास्तीत-जास्त
एक मिनिटाचीअसावी.
ऊ. आकाशदिव्याच्या चित्रफितीची (व्हिडिओची) साइज जास्तीत-जास्त ३०० MB असावी.
तसेच, ही ध्वनिचित्रफीत mp4 फॉरमॅटमध्ये असावी.
ऋ. आकाशदिव्याची चित्रफीत (व्हिडिओ) अपलोड करताना,चित्रफितीत कोणाचेही नाव, लोगो, चित्र, फ्रेम, डिजाइन, असे अधिकचे काही जोडू नये. चित्रिकरण करताना सजावटीचे वर्णन करतानाचा आवाज मुद्रित (रेकॉर्ड) केल्यास
चालेल.
ऌ. आकाशदिवा
स्पर्धेंसाठी निश्चित केलेल्या लोकशाही, मतदार नोंदणी, मताधिकार या विषयांशी
संबंधित आकाशदिव्याचे तीन फोटो आणि चित्रफीत पाठवणाऱ्या स्पर्धकाचाच अर्ज
ग्राह्य धरला जाईल.
४. रांगोळी स्पर्धा :-
अ. लोकशाही,
मतदार नोंदणी, मताधिकार या विषयांशी संबंधित रांगोळीचे
विविध कोनांतून काढलेले तीन फोटो पाठवावेत.
आ.
प्रत्येक फोटो हा जास्तीत-जास्त ५MB साइजचा व JPG फॉरमॅटमध्येच असावा. तीनही फोटोंची एकत्रित साइज १५ MB पेक्षा जास्त असू नये.
इ. फोटोवर कोणाचेही नाव, लोगो, चित्र, फ्रेम, डिजाइन, असे अधिकचे काही जोडू नये.
ई. रांगोळी
स्पर्धेसाठी निश्चित केलेल्या लोकशाही, मतदार नोंदणी, मताधिकार या विषयांशी
संबंधित रांगोळीचे तीन फोटो पाठवणाऱ्या स्पर्धकाचाच अर्ज ग्राह्य धरला जाईल.
५. आकाशदिवा आणि रांगोळी यांमध्ये घोषवाक्यांचा वापर
केला असेल तर गुगल अर्जामध्ये ती घोषवाक्ये लेखी स्वरूपातही पाठवावीत.
६. आपले
फोटो आणि चित्रफीत https://forms.gle/hHf11MvySTVUmccZ6 या गुगल अर्जावरील माहिती
भरून त्यावर पाठवावेत.
७. स्पर्धेविषयी
अधिक माहितीसाठी ८६६९०५८३२५ (प्रणव सलगरकर) या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश
(मेसेज) पाठवून संपर्क साधावा.
८. दिनांक
२५ ऑक्टोबर २०२१ ते१५ नोव्हेंबर २०२१ या काळात आलेले साहित्यच स्पर्धेसाठी
ग्राह्य धरले जाईल.
9. आकाशदिवा आणि रांगोळी या दोन्ही स्पर्धांच्या
बक्षिसांचे स्वरूप प्रत्येकीपुढीलप्रमाणे असेल प्रथम क्रमांक ११ हजार रु.,
द्वितीय क्रमांक ७ हजार रु., तृतीय क्रमांक ५ हजार रु. व उत्तेजनार्थ १ हजार रुपयांची एकूण दहा बक्षिसे.
१०. लोकशाही, मतदार नोंदणी, मताधिकार या
विषयाशी संबंधित साहित्य पाठवणाऱ्या सर्व
स्पर्धकांना
प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच, विजेत्यांना प्रमाणपत्र आणि
मानचिन्ह देण्यात येईल.
११.
आलेल्या साहित्यामधून सर्वोत्तम साहित्य निवडण्याचा अंतिम निर्णय परीक्षक आणि
आयोजक यांच्याकडे राहील.
१२. स्पर्धकाने पाठवलेल्या साहित्यावर अन्य
कुणी स्वामित्व हक्क सांगितल्यास त्याची पडताळणी करण्याची जबाबदारी स्पर्धकाची असेल.
१३. स्पर्धेतील उत्कृष्ट साहित्य मुख्य
निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाजमाध्यमांवर
प्रसारित
केले जाईल.
१४. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या
कार्यक्रमांमध्ये आकाशदिवा स्पर्धकांचे साहित्य
प्रसारित केले जाईल. तेव्हा उत्कृष्ट
आकाशदिवा स्पर्धकांनी आपले साहित्य जपून ठेवावे.
त्यासाठी कार्यालय आपल्याशी स्वतंत्रपणे
संपर्क साधेल.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.