इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, ३० जुलै, २०२०

गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालय पूर्ण वेळ विलगीकरण रूग्णालय जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश


कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय): गडहिंग्लज येथील उपजिल्हा रूग्णालय व रूग्णालयासाठी कार्यरत सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सेवेसहित आजपासून पुढील आदेशापर्यंत पूर्ण वेळ विलगीकरण रूग्णालय म्हणून कार्यान्वित करण्यात यावे. या रूग्णालयात कोरोना विषाणू संशयित रूग्ण तपासणी व औषधोपचार वगळता इतर सर्व आजारांचे बाह्य रूग्ण, आंतररूग्ण तसेच तातडीच्या रूग्णसेवा बंद राहतील. पंरतु, या रूग्णालयातील बाह्य रूग्णसेवा याच ठिकाणी स्वतंत्र कक्षात पुढील आदेशापर्यंत सुरू ठेवावी, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी आज दिले.

जिल्ह्यातील गडहिंग्लज व नजिकच्या परिसरामध्ये कोरोना विषाणू संसर्ग बाधित रूग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. विशेष करून गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील गावामध्ये रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येत आहे. तसेच हे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाधित झालेल्या व होऊ शकतील अशा सर्व रूग्णांना एकत्रित विलगीकरण सुविधेमध्ये उपचार देणे अत्यावश्यक असणार आहे.

गडहिंग्लज, आजरा व चंदगड  तालुक्यामधील गावांमध्ये आढळून येणाऱ्या रूग्णांवर तातडीने उपचार होणे आवश्यक आहे. कोव्हिड-19 आजाराची लक्षणे असलेल्या रूग्णांच्या उपचारासाठी पूर्ण वेळ विलगीकरण रूग्णालय असणे अत्यंत आवश्यक आहे.

          उपजिल्हा रूग्णालय, गडहिंग्लज व रूग्णालयासाठी कार्यरत सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवेसहित हे रूग्णालय पूर्ण वेळ विलगीकरण रूग्णालय म्हणून कार्यान्वित करण्यात यावे. या रूग्णालयात पुढील आदेश होईपर्यंत कोरोना विषाणू संशयित रूग्ण तपासणी व औषधोपचार वगळता इतर सर्व आजाराचे बाह्य रूग्ण, आंतररूग्ण तसेच तातडीचे वैद्यकीय सेवा बंद राहिल. परंतु, या रूग्णालयामधील बाह्य रूग्णसेवा याच ठिकाणी स्वतंत्र कक्षात पुढील आदेशापर्यंत सुरू ठेवावी. त्याचप्रमाणे इतर रूग्णालये, ग्रामीण रूग्णालय नेसरी/ महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मान्यता प्राप्त खासगी रूग्णालय व BPT Act 1950 अंतर्गत धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या धर्मादाय रूग्णालयाकडे स्थलांतरीत करावी व येणाऱ्या सर्व रूग्णांवर संबंधित योजनेतील खासगी/ धर्मादाय रूग्णालयांनी मोफत उपचार करावयाचे आहेत. तसेच श्वानदंश, विंचूदंश, सर्पदंशाकरिता लागणारी सर्व औषधे उपजिल्हा रूग्णालय, गडहिंग्लज यांनी रूग्ण उपचार घेत असलेल्या योजनेतील खासगी/धर्मादाय रूग्णालय यांना उपलब्ध करून द्यायची आहेत.

त्याचबरोबर न्यायवैद्यकीय प्रकरणातील रूग्णांच्या तपासणी व उपचार ग्रामीण रूग्णालय नेसरी येथे करायचे आहे. याबाबत स्थानिक पोलीस प्रशासनाने नोंद घेवून आवश्यक ती कार्यवाही करावयाची आहे. त्याचप्रमाणे उपजिल्हा रूग्णालय, गडहिंग्लज येथे मृतदेहावरील न्याय वैद्यकीय पोस्ट मार्टम सेवा, औषध विक्री सेवा व इतर लॅब्स नेहमी प्रमाणे सुरू राहतील.

याबाबतचे सर्व नियोजन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी संबंधित वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रूग्णालय, गडहिंग्लज यांना नेमून करावयाचे आहे. त्याचबरोबर सद्यस्थितीत उपजिल्हा रूग्णालयातील आंतररूग्ण विभागातील व तातडीचे वैद्यकीय सेवा घेणाऱ्या रूग्णांची व्यवस्था उपजिल्हा रूग्णालयाच्या प्रशासनाने करावयाची आहे. कोव्हिड रूग्णालयास आवश्यक विशेषज्ञ  व इतर वैद्यकीय अधिकारी/कर्मचारी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी त्यांचे अधिनस्त इतर रूग्णालयामधून पाळी-पाळीने उपलब्ध करून घ्यावेत. त्याचप्रमाणे खासगीरित्या ही तात्पुरत्या स्वरूपात अशा विशेषज्ञांची व वैद्यकीय अधिकारी यांची सेवा उपलब्ध करून घेण्यात यावी.

त्याचप्रमाणे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी गडहिंग्लज, आजरा व चंदगड परिसरातील खासगी/धर्मादाय रूग्णालय व वैद्यकीय व्यावसायिक संघटना यांच्यासमवेत बैठक आयोजित करून सर्वोतोपरी नियोजन करावयाचे आहे.

0000000

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.