इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, २९ जुलै, २०२०

गृह विलगीकरणात कोरोना रूग्णांवर उपचार कोल्हापुरातील वडणगे ग्रामपंचायत अग्रेसर




कोव्हिड-19 चाचणी पॉझीटिव्ह आलेल्या अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या रूग्णांवर गृह विलगीकरणात उपचार करण्यात येणार आहेत. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी परिपत्रक पाठविले आहे. कोल्हापूर जवळील वडणगे ग्रामपंचायतीने यापूर्वीच याबाबत पत्रव्यवहार करून असे उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. असा निर्णय घेणारी वडणगे ग्रामपंचायत राज्यातील बहुधा पहिली ग्रामपंचायत असावी.

अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोव्हिड पॉझीटिव्ह रूग्णांना त्यांच्या घरामध्ये योग्य सुविधा उपलब्ध असतील तर त्यांच्या घरी विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून देताना मार्गदर्शक सूचना या परिपत्रकात देण्यात आल्या आहेत.

·        नोडल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रूग्ण पॉझीटिव्ह आल्यानंतर तपासून तो अति सौम्य व लक्षणे नसलेला आहे प्रमाणित करावे. वयोवृध्द रूग्ण (60 वर्षापेक्षा जास्त वय असलेले) इतर आजार, उच्च रक्तदाब, मधुमेय, ह्दयविकार, जुनाट यकृत,फुप्फूस, मूत्रपिंडाच्या रूग्णांच्या वैद्यकीय तपासणीनंतर परवानगी द्यावी.

·        ग्राम समितीने घरात स्वतंत्र व्यवस्था असल्याची खात्री करून प्रमाणित करावे.

·        प्रोटोकॉल प्रमाणे औषध गोळ्या रूग्णांच्या जबाबदार नातेवाईकांच्या ताब्यात देऊन आरोग्‍य शिक्षण देवून घरी पाठवावे.

·        रूग्णाच्या नातेवाईकाकडे नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील काळजी केंद्राचा संपर्क क्रमांक द्यावा.

·        वैद्यकीय अधिकारी यांनी स्वतंत्र नोंद वही ठेवून आवश्यक त्या वेळी तातडीने गंभीरता ओळखून रूग्ण सेवा द्यावी.

·        दिवसातून दोनवेळा दूरध्वनीव्दारे रूग्णाची माहिती घ्यावी. गृह भेट देणाऱ्या क्षेत्रीय कर्मचाऱ्याकडून पल्स ऑक्सिमीटरने तपासणी करून आरोग्य शिक्षण द्यावे.

·        वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार काळजीवाहू व्यक्ती व सर्व निकट संपर्कातील व्यक्तींनी प्रोटोकॉलनुसार हायड्रॉक्सी क्लोरोक्वीनची मात्रा घ्यावी.

रूग्णांची काळजी घेणाऱ्या व्यक्तींसाठी आणि रूग्णांसाठीही या परिपत्रकात  मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर गृह विलगीकरणासाठी अपात्रतेचे निकष त्याचबरोबर वैद्यकीय मदत कधीपर्यत घ्यावी, गृह विलगीकरण कधीपर्यंत करावे याबाबतही या परिपत्रकात सूचना देण्यात आल्या आहेत. हे परिपत्रक सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांना पाठवण्यात आले आहे.

कोल्हापूर जवळील वडणगे ग्रामपंचायतीने यापूर्वीच गावामध्ये बैठक घेवून अशा प्रकारची उपचार यंत्रणा घरच्या घरीच करण्याबाबत निर्णय घेतला आहे.

सचिन चौगुले (सरपंच वडणगे) – कोरोना रूग्णाला उपचारासाठी रूग्णालयात ठेवल्यानंतर त्याच्यावर एक प्रकारे मानसिक दबाव येतो. रूग्णाला घरीच उपचार मिळाल्यास हा दबाव आपोआप कमी होईल. हा विचार करून हा निर्णय घेण्यात आला. पल्स ऑक्सिमीटर, थर्मामीटर, मल्टिव्हिटॅमीन, व्हिटॅमीन सी, ड्रायफ्रुट, पनीर अशी सर्व प्रकारची मदत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

डॉ. संदिप पाटील- रूग्णाची दररोजची नोंद करण्यात येणार आहे. त्याचबरोबर योग्य आहार प्रणाली देण्यात येणार आहे. आरोग्य शिक्षणाबाबतही व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून संपर्क साधला जाईल.

डॉ. महादेव नरके - रूग्णाला घरी उपचार मिळत असल्यामुळे त्याला मानसिक आधार मिळून तो लवकर बरा होईल. या यंत्रणेमुळे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण निश्चित वाढेल. त्याचबरोबर या चांगल्या उपक्रमाला रूग्णालयांवर पडत असणारा ताण कमी होईल.

अशा प्रकारे घरच्या घरी रूग्णांवर उपचार करणारी कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे ग्रामपंचायत ही बहुधा राज्यातील पहिलीच ग्रामपंचायत असेल. या उपक्रमामुळे रूग्णाला मानसिक आधार मिळून बरे होण्याची संख्या निश्चित वाढणार आहे. त्याशिवाय रूग्णालयांवरील ताणही कमी होणार आहे. या उपक्रमाची प्रेरणा राज्यातील इतर गावांनी घेतल्यास कोरोना हद्दपार व्हायला निश्चित मदत मिळणार आहे.

 

                                                                      प्रशांत सातपुते

                                                                       जिल्हा माहिती अधिकारी

                                                                     कोल्हापूर

00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.