इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, २७ जुलै, २०२०

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राला लाभलेले कार्यक्षम नेतृत्व - सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर कवठेगुलंद प्राथमिक आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका प्रदान




 

कोल्हापूर, दि. 27 (जिल्हा माहिती कार्यालय) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याला लाभलेले कार्यक्षम नेतृत्व आहे, असे गौरवोदगार राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी काढले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीमधून शिरोळ तालुक्यामधील कवठेगुलंद प्राथमिक आरोग्य केंद्रास सर्व सुविधांनी युक्त अशी रुग्णवाहिका प्रदान केली, कवठेगुलंद येथे झालेल्या या रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

            मागील सहा महिन्यांमध्ये कोरोनाची महामारी, निसर्ग चक्रीवादळ एकापाठोपाठ एक अशी अनेक संकटे आली पण आपल्या शांत संयमी आणि धिरोदत्त नेतृत्व गुणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांना सोबत आणि विश्वासात घेऊन या संकटांना समर्थपणे तोंड दिले. सर्वसामान्य माणसाला दिलासा देणारे निर्णय घेतले, त्यामुळेच राज्यासमोर अनेक अडचणी असतानासुद्धा राज्यातील जनतेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये असलेल्या या नेतृत्वगुणाची पाठराखण केली असे सांगून  राज्यमंत्री श्री. यड्रावकर यावेळी म्हणाले, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी क्षारपड जमीन सुधार योजना राबवण्यासाठी एकूण खर्चाच्या 80 टक्के इतकी रक्कम अनुदान म्हणून देण्याचा घेतलेला निर्णय शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारक असा आहे. मागील अनेक महिन्यापासून या प्रश्नासंदर्भात आम्ही सातत्याने पाठपुरावा केला होता.

             शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार असून जवळपास 14 हजार एकरावरील हजारो शेतकऱ्यांचे जीवन आणि त्यांची शेती समृद्ध होणार आहे. असे सांगून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन तातडीने क्षारपड जमीन सुधार योजना राबवावी, असे आवाहनही राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी यावेळी केले.

            स्वागत प्रकाश भेंडवडे यांनी केले. शिरोळ तालुका प्रमुख सतीश मलमे, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती स्वाती सासणे, प्रकाश पाटील टाकवडेकर यांनी मनोगत व्यक्त केले.  प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश साळे, जिल्हा परिषद सदस्य परवीन पटेल गटविकास अधिकारी शंकर कवितके, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दातार आलास, पंचायत समितीचे सदस्य मल्लाप्पा चौगुले, शिरोळ चे नगराध्यक्ष अमरसिंह माने -पाटील, देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष जयपाल कुंभोजे, कवठेगुलंदचे सरपंच सद्दाम हुसेन वाळवेकर आदी उपस्थित होते. आभार संतोष कांबळे यांनी मानले.

0 0 0 0 0 00


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.