** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, June 4, 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बागेतील व खुल्या जागेतील उपकरणे, मैदानावरील स्विंग्‌ज व बार्स वापरण्यास प्रतिबंध -जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई



कोल्हापूर,दि. 4 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील बागेतील उपकरणे, खुल्या जागेतील व्यायाम करण्याची उपकरणे, खेळांच्या मैदानावरील स्विंग्‌ज तसेच बार्स यासारखे साहित्य वापरण्यास जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी एका आदेशान्वये प्रतिबंध केला आहे.
कोरोना विषाणू (कोव्हिड १९)चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ मधील तरतूदी आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणून शासनाने घोषित केले आहेत. सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत दिनांक ३० जून २०२० रोजी रात्री १२.०० वा. पर्यंत वाढविली आहे.
शासनाने आज जारी केलेल्या आदेशानुसार शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा यांचे कार्यालय / कर्मचारी केवळ शिक्षणेत्तर कामकाज करु शकतील. यात ई-सामग्री विकास, उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन आणि निकाल जाहीर करणे  यांचा समावेश असेल, असेही जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी स्पष्ट केले आहे.
यापूर्वीच्या आदेशातील प्रतिबंधित बाबी व सूट दिलेल्या बाबी कायम राहतील. या आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेवर कायद्यातील तरतुदीनुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही श्री. देसाई यांनी दिला आहे.
00000


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.