** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, August 4, 2021

“छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिग्रंथ” चे सारथीतर्फे 50 हजार प्रतींची छपाई व विनामुल्य वितरण

 


कोल्हापूर, दि. 4 (जिल्हा माहिती कार्यालय): छत्रपती शिवाजी महाराज यांची विचारधारा समाजातील तळागळामध्ये रुजवण्यासाठी  छपत्रती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे  यांच्याकडून डॉ.जयसिंगराव पवार यांनी सोळा लेखांचे संकलन केलेला ‘छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिग्रंथ’ या पुस्तकाच्या 50  हजार प्रतींचे छपाई महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) पुणे यांच्याकडून करुन घेऊन त्या प्रतींचे मोफत वाटप करण्याबाबत सारथीच्या संचालक मंडळाने ठराव केला आहे.

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार संपादित या ग्रंथामध्ये शिवाजी महाराजांचे शिक्षण, राज्यकारभार, व्यक्तिमत्त्व, नेतृत्व, गुण, हिंदवी स्वराज्य स्थापना, कामगिरी, अर्थनीती, धर्मनिरपेक्षता, संरक्षण व लष्करी व्यवस्था, किल्ले आदी विषयांवरील अभ्यासपूर्ण लेख समाविष्ट आहेत. डॉ.आ.ह.साळुंखे, डॉ.आप्पासाहेब पवार, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, गो. स. सरदेसाई, कृष्णराव केळूसकर, सर जदुनाथ सरकार, डॉ. बाळकृष्ण, त्र्यंबक शंकर शेजवलकर, वा.सी. बेंद्रे, श्री. सेतुमाधवराव पगडी, डॉ. अ. रा. कुलकर्णी, प्रा.नरहर कुरुंदकर, ले. कर्नल म.ग.अभ्यंकर, डॉ. भा.कृ.आपटे, श्री. गो. नि. दांडेकरप्रा. ग. ह. खरे या  प्रख्यात इतिहास संशोधकांनी शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व व राजनीती यांचे विविध पैलू उलगडले आहेत. त्यामुळे हा महत्त्वाचा संदर्भ ग्रंथ झाला आहे.

‘छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिग्रंथ या पुस्तकाचे बालभारती, पुणे या संस्थेकडून एका महिन्यात छपाई पूर्ण करून,  सारथीमार्फत विविध शासकीय संस्था, शासकीय व निमशासकीय ग्रंथालये, ग्रामपंचायती व स्थानिक स्वराज्य संस्थांना विनामुल्य वितरण करण्यात येणार असल्याची माहिती सारथीच्यावतीने देण्यात आली.            

0000000

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.