** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, August 31, 2021

गटई कामगारांना लोखंडी पत्र्याचे स्टॉल वाटप योजना

 


कोल्हापूर, दि. 31 (जिल्हा माहिती कार्यालय) : सामाजिक न्याय विभागामार्फत 100 टक्के शासकीय अनुदानावर गटई कामगारांना लोखंडी पत्र्याचे स्टॉल पुरविणे योजना ग्रामपंचायत व अ,ब,क वर्ग नगरपालिका आणि छावणी क्षेत्र व महानगरपालिका क्षेत्रात योजना राबविण्याचा निर्णय सन 2007-08 पासून शासनाने घेतलेला आहे. या योजनेंतर्गत गटई कामगारांना 100 टक्के अनुदानावर मोफत पत्र्याचा स्टॉल व 500 रू. चे अनुदान दिले जाते.

या योजनेसाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे-

अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी व अनुसूचित जातीचा असावा. अर्जदाराच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न हे ग्रामीण भागात 40 हजार रू. व शहरी भागात 50 हजार रू. पेक्षा अधिक नसावे. अर्जदाराचे वय 18 पेक्षा कमी नसावे. अर्जदार ज्या जागेत गटई स्टॉल मागत असेल ती जागा ग्रामपंचायत, नगरपालिका, छावणी बोर्ड किंवा महानगरपालिका यांनी त्यास भाड्याने, कराराने, खरेदीने अगर मोफत परंतू अधिकृतरित्या ताब्यात दिलेली असावी किंवा ती त्यांची स्वमालकीची जागा असावी. एखाद्या लाभार्थ्यांना स्टॉलचा ताबा दिल्यानंतर त्या स्टॉलची देखभाल दुरुस्ती लाभार्थ्यांने स्वत: करणे आवश्यक राहील. गटई पत्र्याचे स्टॉल हे एका घरात एकाच व्यक्तीला दिले जाईल. स्टॉल वाटपाबाबतचे पत्र लाभार्थ्यांच्या फोटोसह स्टॉलमध्ये प्रथमदर्शनी भागावर लावणे बंधनकारक राहील. एकदा गटई स्टॉलचे वाटप झाल्यानंतर या स्टॉलची विक्री करता येणार नाही तसेच भाडे तत्वावर देता येणार नाही तसेच स्टॉलचे हस्तांतरण करता येणार नाही.

यापूर्वी ज्या कुटूंबाने या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांनी अर्ज करू नयेत. अधिक माहिती व अर्जासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, कोल्हापूर या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.