कोल्हापूर, दि. 8 (जि.मा.का.) : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणीसाठी
निरंतर पुनरिक्षण कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. ज्या पदवीधर व शिक्षक मतदारांनी नाव नोंदणी
केली नाही अशा मतदारांनी नाव नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रासह आपले अर्ज संबंधित
तालुक्याच्या पदनिर्देशित अधिकाऱ्यांकडे (संबंधित तहसिल कार्यालयातील निवडणूक शाखा/कोल्हापूर महानगरपालिका
क्षेत्रासाठी एल. बी. टी. शाखा,शिवाजी मार्केट) येथे जमा
करावेत, असे असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 नोव्हेंबर 2019 या अर्हता दिनांकावर आधारित पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने
मतदार नोंदणीचा कार्यक्रम घोषित केला होता. या कार्यक्रमांतर्गत दिनांक 30 डिसेंबर 2019 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द
करण्यात आली आहे. तद्नंतर दिनांक 1 जानेवारी 2020 पासून निरंतर पुणे विभाग पदवीधर
व शिक्षक मतदार संघ मतदार नोंदणीचा पुररिक्षण कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे.
जी व्यक्ती भारताची
नागरिक आहे, त्या मतदारसंघातील सर्वसाधारण रहिवाशी आहे आणि ती व्यक्ती दिनांक 1
नोव्हेंबर 2016 पूर्वी भारतातील विद्यापीठाचा पदवीधर असेल किंवा त्याच्याशी समकक्ष
असलेली अर्हता धारण करीत असेल, अशी प्रत्येक व्यक्ती पदवीधर मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी पात्र आहेत. फक्त पदवीधर
मतदारांच्या नोंदणीसाठी आयोगाने https://ceo.maharashtra.gov.in ह्या
संकेतस्थळावर पर्याय उपलब्ध करुन दिलेला असून यावरुन देखील पदवीधर मतदार नोंदणी
करता येईल.
जी व्यक्ती
भारताची नागरिक आहे, त्या मतदार संघातील सर्वसाधारण रहिवाशी आहे आणि ती दिनांक 01
नोव्हेंबर, 2019 च्या लगत पूर्वीच्या सहा वर्षामध्ये किमान तीन वर्ष इतक्या
कालावधीकरिता माध्यमिक शाळेच्या दर्जापेक्षा कमी दर्जाची अशी विनिर्दिष्ट केलेली
नसेल, अशा राज्यातील कोणत्याही शिक्षक संस्थेमध्ये अध्यापन करीत असेल, अशी
प्रत्येक व्यक्ती शिक्षक मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी पात्र आहेत.
पदवीधर
मतदार नोंदणीकरिता नमुना क्रमांक 18 मधील अर्ज, पासपोर्ट आकारातील रंगीत
छायाचित्र, मूळ पदवीची किंवा समकक्ष अर्हताची छायाकिंत प्रत व रहिवास पुराव्याची
छायांकित प्रत जी राजपत्रित अधिकारी यांनी प्रमाणित केलेली असावी. शिक्षक मतदार
म्हणून नोंदणीसाठी नमुना क्रमांक 19 मधील अर्ज, पासपोर्ट आकारातील रंगीत
छायाचित्र, रहिवास पुराव्याची छायांकीत प्रत जी राजपत्रित अधिकारी यांनी प्रमाणीत
केलेली असावी व संस्था प्रमुखाने किंवा संबंधित शाळेतील मुख्याध्यापकाने संबंधित
शिक्षक तीन वर्ष अध्यापन करीत असल्याबाबत प्रमाणित केलेले असावे.
तसेच
मतदारांनी आपले नांव मतदार यादीत सामाविष्ट असल्याबाबत खात्री करण्यासाठी
आयोगाच्या https://ceo.maharashtra.gov.in या
संकेत स्थळाला भेट
द्यावी, असे आवाहनही श्री. धुमाळ यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.