शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२५



मराठीचा प्रसार आणि प्रचार ही सर्वांची जबाबदारी - जिल्हाधिकारी अमोल येडगे

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन

 

कोल्हापूर, दि. २७ : मराठी भाषा गौरव दिवस हा केवळ एका दिवसापुरता साजरा न करता वर्षातील सर्वच दिवशी मराठी भाषेचा वापर दैनंदिन व्यवहारात करत मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे ही काळाची गरज आहे,अशी भूमिका शाळांतून आणि सर्वच कार्यालयातून झाली तर निश्चितच मराठी भाषेचा खऱ्या अर्थाने गौरव होईल असे विचार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मांडले. ते कोल्हापूर जिल्हा मराठी भाषा समिती, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, माध्यमिक शिक्षण विभाग कोल्हापूर व श्री आचार्यरत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धाच्या बक्षीस वितरण समारंभात कार्यक्रम अध्यक्ष म्हणून बोलत होते.यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील तालुकास्तरावर घेण्यात आलेल्या वक्तृत्व, निबंध, कथाकथन, अभिवाचन व कथालेखन या स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा ग्रंथ भेट देऊन त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

    मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त तालुकास्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धामधून  यशस्वी विद्यार्थ्यांच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जिल्हास्तरावर स्पर्धा घेण्यात आल्या.

 

जिल्हास्तरावर स्पर्धा निकाल -

 

वक्तृत्व स्पर्धेत

 

प्रथम - चार्वी रविंद्र कुंभार, जागृती हायस्कूल गडहिंग्लज

द्वितीय - सुहानी सदाशिव –हाटवळ , व. ज. देशमुख हायस्कूल , कोल्हापूर

तृतीय - वेदांत उमेश चव्हाण , आदर्श गुरुकुल, पेठ वडगांव

 

निबंध स्पर्धा

प्रथम – अक्षरा संदीप चौगुले , आ. ब. सरनोबत हायस्कूल , पन्हाळा

द्वितीय – हर्षदा अण्णा सोले  , उषाराजे हायस्कूल , कोल्हापूर

तृतीय – रेणु रावसो पाटील , शांती  गुरुकुल, बाचणी

 

कथाकथन स्पर्धा -                                                                                  

प्रथम – रिया बाजीराव पाटील , श्री. संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय , घुंगुर

द्वितीय – वेदिका दयानंद भोसले , विद्या मंदिर बेलवडे  हायस्कूल , बेलवडे 

तृतीय – साक्षी राजाराम माने , हनुमान हायस्कूल ,केर्ले

 

कथालेखन स्पर्धा -

प्रथम – आदित्य विजय पोवार , कुमार भवन पुष्पनगर , भूदरगड

द्वितीय – साक्षी प्रविण माने , उषाराजे हायस्कूल , कोल्हापूर

तृतीय – मनाली रमेश पाटील , यशवंतराव पाटील माध्यमिक विद्यालय , सोळांकूर

 

अभिवाचन स्पर्धा –                                                                               

प्रथम – स्नेहल सुनील क्षीरसागर , ताराबाई नरदे हायस्कूल , नांदणी 

द्वितीय – श्रेया बबन कांबळे , राधानगरी विद्यालय , राधानगरी

तृतीय – सुहानी सदाशिव –हाटवळ , व. ज. देशमुख हायस्कूल , कोल्हापूर

     

याप्रसंगी प्रमुख पाहुणे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक रिंगाणकार कृष्णात खोत यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी कुसुमाग्रज यांच्या जीवनकार्याचा आढावा घेताना मराठी भाषिकांसाठी त्यांचे कार्य प्रेरणादायी व मार्गदर्शक असल्याचे सांगितले. मोबाईलच्या जमान्यात वाचन संस्कृती जोपसणे आवश्यक असून प्रत्येक कुटुंबात ग्रंथसंग्रह असावा ज्यामुळे नवी पिढी वाचनाकडे वळेल आणि त्यांना आपल्या समृद्ध साहित्याचा परिचय होईल असे आवाहन  केले.

 

कार्यक्रमासाठी श्री आचार्यरत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर चे सचिव मोहन गरगटे , शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. विश्वास सुतार, जिल्हा ग्रंथालय कार्यालयाचे तांत्रिक सहाय्यक उत्तम कारंडे यांचेसह शिक्षक , विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  तालुकस्तरीय स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाचे सहकार्य लाभले . तालुका व जिल्हास्तर स्पर्धा समन्वयक शशिकांत बैलकर, काकासो पाटील, एस.बी.पाटील, सचिन यादव,  सदाशिव –हाटवळ तसेच सर्व परीक्षक यांचा ग्रंथ भेट देऊन गौरव करण्यात आला.

 

जिल्हास्तरावर स्पर्धा व कार्यक्रमाचे संयोजन माध्यमिक शिक्षण विस्तार अधिकारी दगडू कुंभार आणि दादासाहेब अ मगदूम हायस्कूलचे  मुख्याध्यापक बसवराज वस्त्रद  यांनी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर  यांचे मार्गदर्शनाखाली केले.

००००००००


शुक्रवार, १० मे, २०२४

प्राणीगणनेसाठी 15 मे पर्यंत अर्ज करा - एस.एस.पवार


 

कोल्हापूर, दि. 10 (जिमाका): सालाबादप्रमाणे यावर्षीही कोल्हापूर वन्यजीव विभागाअंतर्गत दि. 22 व 23 मे 2024  रोजी बुध्द पौर्णिमेदिवशी प्राणी गणना करण्यात येणार आहे. ही प्राणी गणना राधानगरी अभयारण्य व सागरेश्वर अभयारण्य येथील जंगलातील विविध ठिकाणी होणार आहे. प्राणीगणनेमध्ये सहभागी होण्यास इच्छुक उमेदवारांनी कोल्हापूर वनविभागाच्या www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर प्राणीगणनेकरीता उपलब्ध अर्ज डाऊनलोड करुन भरुन या कार्यालयाच्या census2023wlkop@gmail.com या इमेल वर दि. 10 ते 15 मे 2024 अखेर आवश्यक कागदपत्रांसह PDF स्वरुपात पाठवावा. आपले अर्ज वरील कालावधीत असले पाहिजेत. ईमेल सोडून इतर कोणत्याही स्वरुपात अर्ज स्विकारले जाणार नाहीत. तसेच मचान मर्यादित असल्याने प्रथम ईमेल येणा-या उमेदवारांना प्रथम प्राधान्य दिले जाईल, असे आवाहन विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) एस.एस.पवार यांनी केले आहे.

कोल्हापूर वन्यजीव विभागामार्फत दरवर्षी मे महिन्यामध्ये बुध्द पौणिमेदिवशी रात्री चंद्राच्या लख्ख प्रकाशामध्ये राधानगरी अभयारण्य (कोल्हापूर जिल्हा) व सागरेश्वर अभयारण्य (सांगली जिल्हा) मध्ये प्राणीगणनेचा कार्यक्रम केला जातो. या प्राणी गणनेमध्ये निसर्गप्रेमींना एक दिवस जंगलात राहण्याचा तसेच प्राण्यांचे दर्शन, आवाज, वनसंपदा व जैवविविधतेचा अनुभव मिळतो. दरवर्षी प्राणीगणनेस उदंड प्रतिसाद मिळत असतो. यातून जनसामान्यांना वन्यप्राणी व जंगलामध्ये वनविभागामार्फत करण्यात येत असलेली कामे, वनसंपदा टिकविण्यासाठी वनविभागाकडून करण्यात येत असलेले प्रयत्न याची जवळून माहिती होते. त्यांच्यासाठी या एका दिवसाचा अनुभव कायम स्मरणात राहणारा असतो.

 

अर्ज भरण्याबाबत शंका असल्यास विभागीय वनअधिकारी (वन्यजीव) कोल्हापूर यांचे कार्यालय, विचारेमाळ, सदर बाजार, कोल्हापूर 416003,   ई मेल www.mahaforest.gov.incensus2023wikop@gmail.com व दूरध्वनी क्रमांक 0231-2669730 वर संपर्क साधावा, असेही श्री. पवार यांनी कळविले आहे