इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, २२ फेब्रुवारी, २०२३

बेरोजगार सहकारी संस्थानी कामासाठी ३ मार्च पर्यंत प्रस्ताव सादर करावेत


 

कोल्हापूर, दि. २२ (जिमाका) : बेरोजगार सेवा सहकारी संस्थांसाठी ११ महिन्यांच्या करारावर कामे प्राप्त झाली आहेत. सर्व कामे गगनबावडा व करवीर तालुक्यातील असल्याने तालुक्यातील इच्छुक व कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्र असणाऱ्या कार्यरत बेरोजगार सेवा सहकारी संस्थांनी इच्छापत्रासह दि. ३ मार्च 2023 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.

 

जिल्हा शल्य चिकित्सक, रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, सी.पी. आर. येथे १ सफाई कामगार रु. ६ हजार २५० मानधन प्रतिमहा, अभियंता, मध्यम प्रकल्प विभाग क्र. २ येथे २ वाहन चालक प्रतिमाह प्रत्येकी १३ हजार ३३० रु. मानधन, शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अंतर्गत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, गगनबावडा मंडल क्र. ३ (इयत्ता ६ वी ते ८ वी) येथे १ चौकीदार (पुरुष) व १ सहायक स्वयंपाकी (महिला) मानधन प्रत्येकी १० हजार ३९५ रु. प्रतिमाह, शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अंतर्गत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, गगनबावडा मॉडेल क्र. ४ (इयत्ता ९ वी ते १२ वी) येथे चौकीदार (महिला) १ व सहायक स्वयंपाकी (महिला) १ प्रत्येकी १० हजार ३९५ रु. मानधन प्रतिमाह व १ लेखापाल (महिला) प्रतिमाह १७ हजार ३२५ रु. मानधन व सहायक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे १ सफाई कामगार १९४.२५ रु. प्रति दिवस (सुट्टीचे दिवस वगळून) याप्रमाणे कामे प्राप्त झाली आहेत.

 

अटी व शर्ती -बेरोजगारांची स्थापन केलेली सहकारी सेवा सोसायटी यांची स्थापना ही ऑगस्ट २००० नंतर झालेली असावी. तसेच सहकार कायदा १९६० अन्वये नोंदणीकृत असावी. बेरोजगारांची सहकारी सेवा सोसायटी त्यांना देण्यात येणारे काम करण्यासाठी पात्र असावी. सहकारी सेवा सोसायटीस रु. ३ लाखापर्यंतची कामे मिळण्यासाठी त्यांनी यापूर्वी केलेल्या कामाचे अनुभव दाखले प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. सहकारी सेवा सोसायटी खाते सहकारी बँक/राष्ट्रीयकृत बँकेत काढलेले असावे. सहकारी सेवा सोसायटीच्या आर्थिक उलाढालीचे नियमीत वार्षिक लेखापरिक्षण केलेले असावे. सन २०१९-२०, २०२०-२१ व २०२१-२२ च्या लेखापरिक्षण अहवालाची प्रत सोबत जोडावी. सहकारी सेवा सोसायटी, लोकसेवा केंद्र यांनी सदस्यांना देणे आवश्यक असून ते क्रियाशील सदस्य असणे आवश्यक आहे. जे सदस्य क्रियाशील नसतील त्यांची नावे या सहकारी सेवा सोसायटीतून कमी करुन त्याठिकाणी नवीन सदस्य घेण्यात यावेत. कागदपत्रांच्या प्रती/प्रमाणपत्र मूळ प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. अर्ज/प्रस्तावासोबत उपविधीमध्ये नमूद असलेल्या कार्यक्षेत्राच्या पानाची साक्षांकीत प्रत जोडावी. संस्था अवसायानात निघाली असेल तर प्रस्ताव सादर करण्यात येऊ नये, असेही श्री. माळी यांनी कळविले आहे.

 

000000

 

उद्योजकांनी पर्यावरणपूरक कामाचा संकल्प करावा -उद्योग मंत्री उदय सामंत सामाजिक उत्तरदायित्व निधीचा वापर पर्यावरण रक्षणासाठीच्या उपाययोजनांसाठी करावा

 







 

कोल्हापूर दि.22 (जिमाका): उद्योजकांनी सामाजिक उत्तरदायित्व निधीचा वापर पर्यावरण रक्षणाच्या उपाययोजनांसाठी करण्याबरोबरच पर्यावरणपूरक कामाचा संकल्प करावा, यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.

 

       कोल्हापूरच्या कणेरी मठ येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान आयोजित ‘सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवा’निमित्त उद्योजकांसाठी विशेष परिषद घेण्यात आली. यावेळी राष्ट्रीय हरीत लवादाचे अध्यक्ष ए. के. गोयल, उत्तर प्रदेशचे आमदार सी.पी. चंद,  बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड, ट्रान्सग्नायझेशनचे संस्थापक रोहित अरोरा, अभिनेते संदीप कुलकर्णी, कागल औद्योगिक वसाहतीचे हरिश्चंद्र धोत्रे, पंजाबचे ओमेंद्र दत्त, सॅटर्डे क्लबचे नितीन देशपांडे, मठाचे विश्वस्त उदय सावंत, संतोष पाटील तसेच विविध उद्योग संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच कणेरी मठ संस्थानचे काडसिद्धेश्वर स्वामीजी, भैय्याजी जोशी प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उद्योग मंत्री श्री. सामंत यांनी प्लॅस्टिक पुनर्निर्मितीप्रकल्पाला भेट दिली. तसेच 'पंचमहाभूत बोध' प्रयोग पाहून यातून पंचतत्वांच्या संरक्षणाचा संदेश प्रभावीपणे दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

 

      उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, वायू आणि जल प्रदूषणापासून पृथ्वीला वाचविण्याची गरज आहे. उद्योगधंदे वाढले पाहिजेत, पण  उद्योग निर्मितीनंतर त्याचे दुष्परिणाम समाजातील अन्य घटकांवर होवू नयेत, यासाठी उद्योजकांनी स्वत: आचारसंहिता घालून घ्यावी. समाजासाठी काहीतरी देणं देण्याच्या हेतूने उद्योजकांनी सामाजिक उत्तरदायित्व निधी (सी.एस.आर.) चा उपयोग पृथ्वी वाचविण्यासाठी करावा.

 

कोल्हापूरच्या पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला असून पंचगंगेचे शुद्धीकरण करण्याचा संकल्प सर्वांनी करावा, असे आवाहन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले. तीस दिवसांत उद्योगांसाठी परवाना देणारा कायदा येत असल्यामुळे उद्योगवाढीला गती मिळेल. परंतू, उद्योगधंद्यांमुळे प्रदूषण होणार नाही, याची काळजी उद्योजकांनी घ्यायला हवी. भविष्यात जे काही करता येईल, ते पर्यावरणासाठी उपयुक्त असेल, अशी खूणगाठ  बांधून यासाठी उद्योजकांनी पुढे यावे.

 

      पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी महत्वपूर्ण काम करणारे कणेरी मठ नैसर्गिक आपत्तीत मदतीसाठी सर्वात पुढे राहिले आहे. माणसांप्रमाणेच पशुपक्ष्यांची व पर्यावरणाची काळजी घेण्याचा स्वामीजींचा संदेश सर्वांनी  आत्मसात करण्याची गरज आहे. अशा कार्यक्रमांना राज्य शासन निश्चतपणे मदत करेल, असे श्री. सामंत यांनी सांगितले.

 

जीवनात ध्येय निश्चत करा. तीव्र इच्छाशक्ती बाळगा, ध्येय पूर्ण करण्यासाठी खडतर परिश्रम करा, असे सांगून भारतीय आयुर्वेदात मोठमोठ्या आजारांवर मात करण्याची ताकद असून त्याचा प्रसार विदेशात करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे बीव्हीजी चे हणमंतराव गायकवाड यांनी सांगितले.

 

    पर्यावरण संवर्धन काळाची गरज आहे.  पंचमहाभूतांच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे विचार उपस्थित सर्व मान्यवरांनी व्यक्त केले.

 

प्रास्ताविकातून विश्वस्त संतोष पाटील यांनी या लोकोत्सवाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाला देशभरातील विविध क्षेत्रातील उद्योजक सहभागी झाले.

00000

 

शनिवार, ११ फेब्रुवारी, २०२३

सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात सर्वांनी मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभागी व्हावे -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 












 

*मुख्यमंत्र्यांकडून कणेरी मठ येथील पंचमहाभूतांवर आधारित विविध दालनाची पाहणी

*या लोकोत्सवात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाने पर्यावरण संरक्षणाचा संदेश घरोघरी पोहोचवावा

*श्री क्षेत्र सिद्धगिरी संस्थानच्या वतीने कणेरी मठावरील पर्यावरण पूरक सेंद्रिय शेतीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

*राज्य शासनाकडून सेंद्रिय शेतीसाठी सर्व प्रकारची मदत देण्यात येणार

 

            कोल्हापूर, दि.11 (जिमाका): जागतिक स्तरावर वातावरणीय बदलामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाच्या जबाबदारीची जाणीव सर्वसामान्य लोकांना होणे आवश्यक आहे. त्याच पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानच्या वतीने दिनांक 20 ते 26 फेब्रुवारी 2023 या कालावधीत कणेरी मठ येथे होत असलेल्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात पर्यावरण संवर्धनाचा जागर होत असून यामध्ये सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            कणेरी मठ येथे सिद्धगिरी संस्थानच्यावतीने  सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवांतर्गत उभारण्यात आलेल्या विविध दालनांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देवून कार्यक्रमाच्या तयारीची माहिती घेतली. यावेळी श्री काडसिध्देश्वर स्वामीजी, पालकमंत्री दीपक केसरकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबिटकर, खासदार संजय मंडलिक, विभागीय आयुक्त सौरभ राव, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, माजी आमदार अमल महाडिक, मठाचे विश्वस्त उदय सावंत, संतोष पाटील आदी उपस्थित होते.

               मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले की, सध्या जागतिक तापमान वाढ आणि बदलत्या हवामानामुळे होणाऱ्या दुष्परिणामांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर जल, वायू, ध्वनी प्रदूषणाचे गंभीर परिणाम होत आहेत. पंचमहाभूतांच्या संरक्षणाबद्दल जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे.  पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी कणेरी मठ येथे घेण्यात येणारा सुमंगलम पंचमहाभूत महोत्सव अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल व या ठिकाणी भेट देऊन जाणारा प्रत्येक नागरिक पुढील काळात पर्यावरण संरक्षणासाठी प्रयत्न करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            पर्यावरण पूरक असलेली सेंद्रिय शेती खूप उपयुक्त असून राज्य शासन ही सेंद्रिय शेतीसाठी प्राधान्य देत आहे. सेंद्रिय शेतीचे उत्पादन घेणाऱ्या बचत गटांना त्यांच्या मालाची विक्री करण्यासाठी जिल्हा स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगून सेंद्रिय शेतीमुळे शेती पिकांच्या उत्पादकतेत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे सांगितले. कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने कणेरी मठावर घेण्यात येत असलेल्या सेंद्रिय शेती पिकांची त्यांनी पाहणी केली. या महोत्सव कालावधीत येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी विशेषत: शेतकरी बांधवांनी येथील सेंद्रिय शेतीला भेट देऊन या पद्धतीची शेती आपण स्वतः करण्याबाबतचा निश्चय करावा, असे आवाहन त्यांनी केले. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना शासन सर्वोतपरी मदत करेल, अशी ग्वाही ही त्यांनी दिली.

            याठिकाणी उभारण्यात आलेल्या आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी ही पंचमहाभूते व आयुर्वेद यावर आधारित सहा दालनांची पाहणी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली. पंचमहाभूतांची निर्मिती, त्यांचे उपयोग, मानवाकडून पंचमहाभूतांचा होणारा दुरुपयोग आणि त्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांची माहिती येथील दालनांमध्ये देण्यात आली आहे. त्रिमिती मॉडेल, माहितीपत्रक, ध्वनी व प्रकाश व्यवस्थेच्या माध्यमातून  पंचमहाभूतांचे महत्त्व या ठिकाणी अत्यंत उत्कृष्टपणे दाखवण्यात येत असून या ठिकाणी भेट देणारा प्रत्येक नागरिक हा पर्यावरण संरक्षणाचा संदेश येथून घेऊन जाईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

            यावेळी श्री सिद्धगिरी मठ येथील महादेवाचे दर्शन घेतले. तसेच 1100 देशी गायींच्या गोशालेची पाहणी केली. तसेच सिद्धगिरी हॉस्पिटलची पाहणी करुन याठिकाणी देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवा सुविधांची माहिती घेतली.

यानंतर गुरुकुलला भेट देवून गुरुकुल शिक्षणपद्धतीची माहिती घेतली. येथील विद्यार्थी- विद्यार्थिनींनी सादर केलेल्या योगाची प्रात्यक्षिके, रोप योगा, बौद्धिक प्रात्यक्षिके, वैदिक गणित, आदी कलागुणांचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी भरभरुन कौतुक केले. तसेच देशाच्या उन्नतीसाठी हातभार लागेल असे नावीन्यपूर्ण उपक्रम गुरुकुल शिक्षण पध्दती आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून देण्यात येत आहेत, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

            श्री काडसिद्धेश्वर स्वामीजींनी मुख्यमंत्री महोदयांना सुमंगलम पंचमहाभूत महोत्सव अंतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच या ठिकाणी उभारण्यात आलेली गोशाला, गुरुकुल शिक्षण पद्धती, कृषी विज्ञान केंद्र, हॉस्पिटल सह आदींची माहिती दिली. या महोत्सवात शेकडो स्टॉल लावले जाणार आहेत. त्यामध्ये शासनाच्या विविध विभागांच्या महत्वपूर्ण लोककल्याणकारी योजनांची माहिती देणारे तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या अधिनस्त असलेल्या महिला बचत गटांचेही स्टॉल उभारले जाणार आहेत.

00000

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कोल्हापूर विमानतळ येथे आगमन

 



 

        कोल्हापूर, दि. 11 (जिमाका):- राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांचे कोल्हापूर विमानतळ येथे आगमन झाले.

      यावेळी  मुख्यमंत्री महोदय यांचे स्वागत पालकमंत्री दीपक केसरकर, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, आमदार सर्वश्री प्रकाश आबिटकर, प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, कोल्हापूर महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, मठाचे विश्वस्त उदय सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.

                ****

 

बुधवार, ८ फेब्रुवारी, २०२३

आपले सरकार सेवा केंद्र: प्राप्त अर्जातील त्रुटींची पुर्तता करण्यासाठी 17 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ


 

कोल्हापूर, दि. 8 (जिमाका): जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रासाठी जिल्ह्यातील एकूण 276 गावांसाठी जाहिरनामा प्रसिध्द करण्यात आला होता. त्यास अनुसरुन प्राप्त अर्जामध्ये अर्जांच्या छाननीअंती कागदपत्रांच्या त्रुटी आढळून आल्या आहेत. संबंधित अर्जदारांना त्रुटींची पुर्तता करण्यासाठी दि. 17 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुदत देण्यात येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी दिली आहे.

आपले सरकार सेवा केंद्रासाठी यापूर्वी ज्यांनी अर्ज दाखल केले आहेत त्यांच्या नावांची व अपूर्ण कागदपत्रे असणाऱ्या अर्जदारांची यादी जिल्ह्याच्या kolhapur.gov.in या संकेतस्थळावर दि. 7 फेब्रुवारी रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. संबंधित अर्जदार यांनी संकेतस्थळावर भेट देवून आपल्या अर्जामध्ये असणाऱ्या त्रुटी तपासाव्यात आणि त्रुटींची पुर्तता करावी. कागदपत्रांची पुर्तता न करणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असेही श्री. कांबळे यांनी कळविले आहे.

000000

श्री शाहू मार्केट यार्ड परिसरात कलम 144 लागू

 

 

कोल्हापूर, दि. 8 (जिमाका): माथाडी कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी, प्रतिनिधी, हमाल व सभासद यांच्या जिवीताला व सुरक्षिततेला संकट उत्पन्न होण्याची अथवा सार्वजनिक शांतता बिघडवण्याचा संभव असल्याने प्रतिबंध व्हावा, यासाठी करवीरच्या कार्यकारी दंडाधिकारी शितल मुळे-भामरे यांनी फौजदार प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम 144 अन्वये गुळ मार्केट मधील विष्णु शंकर रेडेकर, सुभाष बळवंत यादव, प्रकाश गुंगा खाडे, प्रकाश हरी पाटील, सुभाष तानाजी पाटील, युवराज सर्जेराव पाटील, रंगराव मारुती पाटील, मानसिंग गणपती आरंडे, मारुती बंडू पाटील, सुरेश माने, बाबुराव शंकर खोत तसेच संबंधित माथाडी कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी, प्रतिनिधी, हमाल व सभासद यांना दि. 8 फेब्रुवारी 2023 रोजी पहाटे 4 वाजल्यापासून ते दि. 15 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर, श्री शाहू मार्केट यार्ड कोल्हापूर व त्याच्या 200 मीटर परिसरात प्रवेश करण्यास सी. आर. पी. सी. 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंध करण्यात येत आहे.

श्री शाहू मार्केट यार्डमधील गुळ व्यापारी/ अडत दुकानात काम करणारे माथाडी कामगार, हमाल विष्णु शंकर रेडेकर, सुभाष बळवंत यादव, प्रकाश गुंगा खाडे, प्रकाश हरी पाटील, सुभाष तानाजी पाटील, युवराज सर्जेराव पाटील, रंगराव मारुती पाटील, मानसिंग गणपती आरंडे, मारुती बंडू पाटील, सुरेश माने, बाबुराव शंकर खोत तसेच माथाडी कामगार संघटनेचे पदाधिकारी व प्रतिनिधी गुळ मार्केट बंद ठेवून व्यापारी/ अडत दुकानदार व शेतकरी यांची अडवणूक करत आहेत, तसेच काम बंद केल्यामुळे व्यापारी / अडत दुकानदार व शेतकरी यांचे नुकसान होणार आहे. नुकसानीच्या अनुषंगाने काम चालू ठेवावे असे समितीने सांगूनही त्यांनी विनंती धुडकावून लावली आहे. तसेच जे माथाडी कामगार काम करण्यास तयार आहेत त्यांनाही काम करण्यास प्रतिबंध करीत आहेत. तसेच दि. 7 फेब्रुवारी 2023 रोजी श्री शाहू मार्केट यार्ड मधील समिती कार्यालयात बैठक घेवून गुळाचे नुकसान होत असल्याने काम चालू करण्याबाबत सांगितले असता संघटनेचे पदाधिकारी व प्रतिनिधीनींनी मान्य न करता बैठकीतून निघून गेले. या माथाडी कामगार संघटनेमुळे बाजार आवारात कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असून त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. ही वस्तुस्थिती अवलोकनी घेवून गुळाचे नुकसान होवू नये व व्यापारी / अडत दुकानदार व शेतकरी यांचे आर्थिक नुकसान होवू नये व मार्केट मध्ये असंतोष पसरुन गंभीर परिस्थिती निर्माण होवू नये यासाठी हा आदेश लागू करण्यात आला आहे.

000000

 

अग्निवीरच्या भरतीसाठी 11 मार्च पर्यंत ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन


कोल्हापूर, दि. 8 (जिमाका): अग्निपथ योजनेंतर्गत कोल्हापूर येथे 10 फेब्रुवारी ते 11 मार्च 2023 या कालावधीत वर्ष 2023-24 साठी अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर प्रवेशासाठी ऑनलाईन सीईईसह नवीन भरती प्रणाली राबविण्यात येणार आहे. या सामायिक प्रवेश परीक्षेसाठी पात्र अविवाहितांनी दि. 10 फेब्रुवारी ते 11 मार्च 2023 या कालावधीत (CEE) अर्जाची ऑनलाईन नोंदणी/सबमिशन करण्याचे आवाहन कर्नल आकाश मिश्रा यांनी केले आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्यांतील पात्र पुरुष तरुणांच्या नावनोंदणीसाठी सैन्य भरती रॅली आयोजित करण्यात आली आहे. (गोवा राज्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्हे) भारतीय सशस्त्र दलातील अग्निपथ योजना ही एक योजना आहे ज्यामध्ये निवडलेल्या उमेदवारांना संरक्षण मंत्रालयाने जून 2022 मध्ये घोषित केल्यानुसार चार वर्षांच्या कालावधीसाठी अग्निवीर म्हणून नोंदणी केली जाईल. चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यावर, अग्निवीर इतर क्षेत्रातील रोजगारासाठी समाज शिस्तबद्ध, गतिमान, प्रवृत्त आणि कुशल कार्यशक्ती म्हणून त्यांच्या आवडीच्या नोकरीत त्यांचे करिअर घडवू शकतो. अग्निवीरांनी त्यांचा 25 टक्के पर्यंतचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर सशस्त्र दलात नियमित केडर म्हणून नावनोंदणी होण्यासाठी अग्निवीरांची निवड केली जाईल.

भरती वर्ष 2023-24 साठी, भरती प्रक्रिया दोन टप्प्यात आयोजित केली जाईल, ज्यामध्ये ऑनलाईन सामायिक प्रवेश परीक्षा (CEE) रॅलीपूर्वी आयोजित केली जाईल. फेज-1 चा भाग म्हणून, अग्निपथ योजनेंतर्गत 2023-24 सालच्या भरतीसाठी सैन्यात अग्निवीर प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षेसाठी (CEE) अर्जाची ऑनलाईन नोंदणी/सबमिशन पात्र अविवाहितांसाठी 10 फेब्रुवारी ते 11 मार्च 2023 या कालावधीत सुरु होईल. राज्यातील कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील पुरुष उमेदवार आणि गोवा राज्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा. अर्ज भरताना उमेदवाराला पाच परीक्षा केंद्रे निवडावी लागतील जिथे तो ऑनलाईन CEE साठी बसू इच्छितो. नवीन भरती प्रणालीनुसार, ऑनलाईन नोंदणीनंतर, ऑनलाईन CEE 12 एप्रिल 2023 पासून सुरु होईल. सामायिक प्रवेश परीक्षा (CEE) मधील निवडलेल्या उमेदवारांची शारीरिक तंदुरुस्ती चाचणी (PFT), शारीरिक मापन चाचणी (PMT) आणि फेज-2 मधील वैद्यकीय परीक्षेसाठी चाचणी केली जाईल, जे जानेवारी 2024 मध्ये तात्पुरते नियोजित आहे, असेही श्री. मिश्रा यांनी कळविले आहे.

000000

 

 

शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०२३

कोल्हापूरचा 'कारभारी गोडवा' ब्रँड सर्वदूर पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

 




कोल्हापूरचा 'कारभारी गोडवा' ब्रँड सर्वदूर पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार

-जिल्हाधिकारी राहुल रेखावार

*कारभारवाडीला राज्यातील 'आदर्श वाडी' बनवणार

* शाश्वत विकासाचे स्वयंपूर्ण खेडे संकल्पना राबवण्यात येणार

 

कोल्हापूर, दि. 3 (जिमाका): महिलांच्या पुढाकारातून आणि ग्रामस्थांच्या सहभागाने गावाच्या शाश्वत विकासासाठी निर्माण होत असलेला कोल्हापूरचा 'कारभारी गोडवा' ब्रँड सर्वदूर पोहोचवून कारभारवाडी राज्यात 'आदर्श वाडी' बनवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी व्यक्त केला.

  करवीर तालुक्यातील कारभारवाडीला आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी भेट देवून गटशेती अंतर्गत कै. शिवा रामा पाटील कृषी शेतकरी स्वयंसहाय्यता गट  अंतर्गत तयार करण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांची पाहणी करुन येथील विद्यार्थिनी, महिला व ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देवून लाभ घेण्याचे ग्रामस्थांना आवाहन केले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, पणन विभागाचे उपसरव्यवस्थापक सुभाष घुले, तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील, कै. शिवा रामा पाटील शेतकरी स्वयंसहाय्यता गटाचे अध्यक्ष प्रा. डॉ. नेताजी पाटील, उपसरपंच तेजस्विनी पाटील, सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, सर्व ग्रामस्थांच्या सहभागातून कारभारवाडीची वाटचाल विकासाच्या दिशेने होत आहे. गावकऱ्यांनी नाविन्याचा ध्यास घेवून नवनवीन उपक्रम राबवून गावच्या शाश्वत विकासावर भर द्यावा. यासाठी प्रशासनाच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल. येथील विविध प्रकल्प महिलांच्या पुढाकाराने होत आहेत, ही बाब कौतुकास्पद आहे. कुक्कुटपालन सारख्या उद्योग निर्मितीलाही चालना द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी येथील सिंचन व्यवस्था, आधुनिक आरोग्यदायी गुळ प्रक्रिया युनिटला भेट देवून रसायन विरहित गुळ निर्मितीची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला. महिलांकडून चालवण्यात येणाऱ्या चटणी मशीन, शेवया मशीन, विविध मसाले तयार करणाऱ्या कृषी माल प्रक्रिया मशीनरींची पाहणी करुन महिलांना उद्योगधंद्यांसाठी आवश्यक कर्जपुरवठा होण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

कारभारवाडीमध्ये ठिबक सिंचनाने शेतीला पाणीपुरवठा, आंतरपिके, गांडूळ खत निर्मिती, ग्रीन हाऊस, सिंचन सुविधा, आधुनिक आरोग्यदायी गुळ प्रक्रिया युनिट, कृषीमाल प्रक्रिया मशिनरी आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत. तर महिला बचत गटाच्या माध्यमातून हळद, जिरे, धने पावडर, आकाशकंदील बनवणे, विविध प्रकारच्या चटण्या, खाद्यतेल, मसाले, शेवया, पापड तयार करुन बाजारात आणण्याची तयारी सुरु आहे. या सर्व उद्योगांच्या माध्यमातून कारभारवाडीमध्ये 'स्वयंपूर्ण खेडे' संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे गटाचे अध्यक्ष प्रा. डॉ. नेताजी पाटील यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासन, कृषी, पणन विभागासह शासनाच्या सर्व विभागांनी गावच्या विकासासाठी सहकार्य केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

0000