इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, २७ सप्टेंबर, २०१७

स्वच्छ भारत मिशनमधील कोल्हापूर जिल्ह्याच्या कामगिरीबद्दल अभिमान -पालकमंत्री चंद्रकात पाटील


                     कोल्हापूर दि. 27 : देश स्वच्छ रहावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वर्षापूर्वी स्वच्छ भारत अभियान सुरू केले. यामध्ये उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्यांना गुणांकनाच्या आधारे राष्ट्रीय स्तरावरील पारीतोषिके देऊन गौरविण्यात येत आहे. यामध्ये यावर्षी कोल्हापूर जिल्ह्याने नेत्रदिपक कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळविला. जिल्ह्याचे हे यश अत्यंत अभिमानास्पद व आनंददायी आहे. अशा भावना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्या.
                      2 ऑक्टोबर,2017 या महात्मा गांधी जयंती निमित्ताने केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयामार्फत स्वच्छता दर्पण पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत होणा-या कामांवर आधारित याचे गुणांकन केले गेले असून यामध्ये कोल्हापूर जिल्हा देशात प्रथम स्थानावर आहे. 2 ऑक्टोबर रोजी स्वच्छता दर्पण पुरस्काराने कोल्हापूरसह  महाराष्ट्रातील 5 तर देशातील 47 जिल्ह्यांना यावेळी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
                      पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कोल्हापूर जिल्हा प्रथम स्थानी आहे. यामध्ये जिल्ह्यातील नागरिक आणि प्रशासन यांचा महत्वाचा वाटा आहे. स्वच्छता या विषयामध्ये कोल्हापूर राष्ट्रीय पातळीवर सातत्याने अधोरेखीत होत आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या लोगो निर्मितीच्या स्पर्धेतही कोल्हापूरचे सुपूत्र अनंत खासबागदार यांनी निर्माण केलेला महात्मा गांधीजींचा चष्मा असणारा लोगो स्वच्छ भारत अभियानाचा लोगो म्हणून निवडला गेला आणि आता तर त्याला नोटेवरही स्थान मिळाल्याने तो प्रत्येकाच्या हातात गेला आहे. या जिल्ह्यात प्रचंड कल्पकता आणि समर्पण आहे. नकारात्मकता बाजूला ठेवून करवीर निवासीनी अंबाबाईच्या या जिल्ह्यात सर्वांनी मिळून एकत्र येवून कार्य केल्यास जिल्हा सर्वार्थाने प्रथम क्रामांकावर राहील. दरडोई उत्पन्नामध्ये देशात चंदीगड अग्रेसर आहे. कोल्हापूर गेली पाच वर्ष सातत्याने दुसऱ्या क्रमांकावर आहे. सर्वानी मिळून एकत्र येवून काम केल्यास आपण प्रथम क्रमांकावर येवू शकतो, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

00000

मंगळवार, २६ सप्टेंबर, २०१७

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कोल्हापूर जिल्हा देशात प्रथम



                     कोल्हापूर दि. 26 : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कोल्हापूर जिल्हयाचे उल्लेखणीय काम झाले असून             स्वच्छतेवर आधारित देलेल्या गुणांकनानुसार कोल्हापूर जिल्हा देशात प्रथम स्थानावर आला आहे. येत्या 2 ऑक्टेाबर रोजी  राष्ट्रीय स्तरावर होणा-या कार्यक्रमात स्वच्छता दर्पण पुरस्काराने कोल्हापूर जिल्हयास गौरविले जाणार आहे.
                          2 ऑक्टोबर,2017 या महात्मा गांधी जयंती निमित्ताने केंद्र शासनाच्या पेयजल  व स्वच्छता मंत्रालयामार्फत स्वच्छता दर्पण पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत होणा-या कामांवर आधारित याचे गुणांकन केले गेले असून यामध्ये कोल्हापूर जिल्हा देशात प्रथम स्थानावर आहे.              
                          स्वच्छतेवर आधारित देलेल्या गुणांकनानुसार जिल्हयाला 90 % इतके गुण मिळाले आहेत.दि.25 सप्टेंबर,2017 रोजी पर्यंत झालेल्या कामगिरीवर हे गुणांकन ठरले आहे. केंद्र शासनाकडून या स्पर्धेसाठी कामगिरी, शाश्वत्ता आणि पारदर्शकता या तीन घटकांवर आधारित जिल्हयांचे गुणांकन केले आहे. कोल्हापूर जिल्हयाला कामगिरीमध्ये 50 पैकी 50 गुण मिळाले आहेत तसेच शाश्वत्ता या घटकासाठी 25 पैकी 15 गुण मिळाले आहेत तसेच पारदर्शकतेसाठी 25 पैकी 25 गुण मिळाले आहेत.
                          स्वच्छता दर्पण पुरस्कारासाठी पुणे विभागातील कोल्हापूर,सांगली व सातारा हे तीन ही जिल्हे प्रथम क्रमांकावर आहेत.या उत्कृष्ट काम केलेल्या जिल्हयांचा 2 ऑक्टेाबर,2017 रोजी राष्ट्रीय स्तरावर होणा-या कार्यक्रमावेळी गौरव केला जाणार आहे.
                          कोल्हापूर जिल्हा प्रथम स्थानावर येण्यासाठी जिल्हास्तरावर पाणी व स्वच्छता विभाग, तालुकास्तर गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (ग्रा.पं),गटसंसाधन केंद्रातील कर्मचारी, आणि ग्राम पंचायत स्तरावर ग्रामसेवक आणि ग्राम पंचायत कर्मचा-यांनी मेहनत घेतली. या कामगिरीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांचे मार्गदर्शन लाभले. तर काम वेळेत पुर्ण करून घेण्यासाठी उपमुख्य  कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई, व या विभागातील तज्ञ व सल्लागार यांनी विशेष परिश्रम घेतले.

000000

गुरुवार, २१ सप्टेंबर, २०१७

मंदिरावरील रोषणाई भाविकांचे आकर्षण ठरेल - पालकमंत्री चंद्रकांत पाटील






                कोल्हापूर, दि. 21 : सर्व धार्मिक स्थळांचा विकास करुन पर्यटन विकासासाठी शासन प्रयत्नशिल आहे. करवीर निवासनी श्री अंबाबाई मंदिरास केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे मंदिर परिसरातील वातावरणाची प्रसन्नता वाढून पर्यटकांचा ओघ वाढेल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
            श्री करवीर निवासनी अंबाबाई मंदिरास पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्‍यवस्थापन समिती व जिल्हा नियोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमनातून करण्यात आलेल्या अर्किटेक्चरल इल्युमिनेशन कामाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमंत छत्रपती शाहू महाराज होते. यावेळी महापौर हसिना फरास, खासदार धनंजय महाडिक, आमदार चंद्रदिप नरके, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, कोषाध्यक्ष वैशाली क्षिरसागर, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
            पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, श्री अंबाबाई मंदिर परिसराच्या विकासासाठी 78 कोटी रुपयांचा विकासा आराखडा मंजुरीच्या अंतिम टप्यात आहे. यामध्ये दर्शन मंडप, भक्त निवास पार्किंग, सुरक्षा आदी सुविधा देण्यात येणार आहेत. मंदिरावर करण्यात आलेल्या आकर्षक रोषणाईमुळे मंदिर परिसरातील वातावरणाची प्रसन्नता अधिक वाढणार असून देवीला ज्या रंगाची साडी नेसवली जाईल त्याच रंगाची रोषणाई राहणार आहे. पर्यटक व भाविकांसाठी हे चांगले आकर्षण ठरणार असून त्यामुळे भाविकांचा ओघही वाढेल असे विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
            श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून भाविकांना अधिक दर्जेदार सुविधा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. देवस्थान समितीच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवावेत. परिसरात सदैव स्वच्छता रहावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
            खासदार धनंजय महाडिक यांनी अलिकडच्या काळात मंदिरातील वातावरण अधिकाधिक समाधानकारक होत असल्याने भाविक व पर्यटक समाधानी होत आहेत. त्यामुळे देश विदेशातील पर्यटकांचा व भाविकांचा     ओघही वाढणार आहे, असे सांगून सुवर्ण पालखीसाठी सर्वस्तरातील भाविकांनी दान दिल्याने 8 कोटी रुपयांची सुवर्ण पालखी तयार झाल्याचेही यावेळी ते म्हणाले.
            देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी मंदिरातील पाच शिखरे व सर्व कमाने या ठिकाणी एलईडी झळकणार असून त्यासाठी सुमारे 2 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. त्यातील 50 टक्के रक्कम जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देण्यात आल्याचे सांगून शारदीय नवरात्र उत्सव अत्यंत उत्साहात, शांततेत व नेटकेपणाने पार पाडण्यात येईल, असे सांगितले. नवरात्र उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दररोज रात्री 9.30 वाजता पालखीची मिरवणूक निघेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
            या कार्यक्रमात आकर्षक रोषणाई बद्दल बजाज इलेक्ट्रीकल्स लि.चे अधिकारी व कर्मचारी व सुवर्ण पालखीबद्दल खासदार धनंजय महाडिक यांचा सत्कार करण्यात आला.  यावेळी देवस्थान व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, भाविक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

 0 0 0 0 0 0 0 0

राजर्षी शाहूंचे निर्णय आजही राज्याला दिशादर्शक - पालकमंत्री चंद्रकांत पाटील




कोल्हापूर, दि. 21 :  राजर्षी शाहू महाराजांनी अत्यंत क्रांतीकारक असा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा 100 वर्षांपूर्वी केला. त्यांचे सर्व निर्णय आजही कल्याणकारी राज्यांसाठी दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
            राजर्षी शाहू शिक्षण क्रांतीदिन 2017 शताब्दी समारंभ विविध कार्यक्रमांद्वारे साजरा करण्यात येत आहे. यामध्ये राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टद्वारे प्रकाशित व डॉ. जयसिंगराव पवार संपादित राजर्षी शाहू छत्रपतींचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा या पुस्तिकेचे प्रकाशन शाहू स्मारक भवन येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित समारंभात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार होते.  यावेळी महापौर हसिना फरास, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, ज्येष्ठ इतिहास तज्ञ डॉ. जयसिंगराव पवार, महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, शिवाजी विद्यापीठाचे प्र.कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के, ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. अशोक चौसाळकर, राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे सचिव व जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
            पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कोणताही कायदा कसा डिझायिन करावा याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे राजर्षी शाहू महाराजांनी केलेले कायदे होत. मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्याच्या समाधानकारक अंमलबजावणीपर्यंत आपण आजही पोहोचू शकलो नाही. पण राजर्षी शाहू महाराजांनी 100 वर्षापूर्वी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला होता. केवळ कायदे करुनच चालत नाही तर त्याच्या यशस्वीतेसाठी वाटचालीतील अडथळे दुर करण्यासाठीही त्यांनी उपाय योजना केल्या होत्या. अशा द्रष्ट्या राजाचे आपण वारस आहोत हे अत्यंत अभिमानास्पद आहे. असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, आजही केरळ सारखे एखादेच राज्य 100 टक्के साक्षर आहे. महाराष्ट्रात एकूण बजेटच्या 30 टक्के म्हणजे जवळपास 47 हजार कोटी रुपये शिक्षणावर खर्च करुनही आपण 100 टक्के साक्षर होऊ शकलो नाही. याबाबतचे या निमित्ताने चिंतन होणेही आवश्यक असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
            डॉ. जयसिंगराव पवार यांनी विद्येचा महिमा पहिल्यांदा महाराष्ट्राला सांगणारे महापुरुष म्हणजे महात्मा फुले होय तर शिक्षणाची मक्तेदारी मोडून काढून शिक्षणा शिवाय तरणोपाय नाही हे सांगून बहुजनांचे उध्दार करणारे दुसरे महात्मा म्हणजे राजर्षी शाहू महाराज असे सांगून ते म्हणाले, शिक्षण हे सुसंस्कृत राष्ट्राच्या गरजा भागवते या विचारातून 97 टक्के जनसमुदायासाठी राजर्षी शाहूनी शिक्षणाची दारे खुली केली. 1917 ला संस्थांनचे उत्पन्न 15 लाख रुपये होते त्यावेळी प्राथमिक शिक्षणासाठी 1 लाख रुपये खर्च केला. त्यामुळेच 1922 पर्यंत 22 हजार विद्यार्थी प्राथमिक शिक्षण घेत होते. 1922 ला महाराजांनी प्राथमिक शिक्षणासाठी 3 लाख रुपये खर्च केले होते. राजर्षी शाहू महाराजांनी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी रात्र शाळा चालू केल्या. त्यांनी केलेला मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा हा माणसाला मनुष्यत्व प्रदान करणारा कायदा आहे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
            यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शैक्षणिक विकासासाठी करण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली तसेच अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये जनतेने हिरहिरीने सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
            जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी राजर्षी शाहू महाराजांची शिक्षणाबद्दलची सकारात्मक जाण व त्याद्वारे समाजातील सर्व घटकांमध्ये एकोपा निर्माण करण्याचे पर्यत्न हे अद्वितीय होते असे सांगून शिक्षणातून जनकल्याणाचा हेतु साध्य करण्यासाठी शिक्षणाच्या गुणवत्तेवर अधिक भर देण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी त्यांनी सर्व शाळा व ग्रामपंचायतींमध्ये राजर्षी शाहूंचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा या पुस्तिकेचे वितरण करण्यात येणार असल्याचे सांगून प्रशासन व जनसहभाग यांच्याद्वारे राजर्षी शाहूंचे कार्य आणि विचार लोकांपर्यंत अधिक व्यापक पध्दतीने पोहोचविण्यासाठी वर्षभर असे कार्यक्रम सुरु राहतील असे सांगितले.
            महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी महपालिकेतर्फे सुरु करण्यात आलेल्या राजर्षी शाहू शिष्यवृत्ती व अन्य उपक्रमांबद्दल माहिती दिली.
            यावेळी विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. आभार विवेक आगवणे यांनी मानले. सुत्रसंचालन पंडित कंदले यांनी केले.


0000000

नवऊर्जा उत्सवातून जनतेस ऊर्जा मिळेल जिल्ह्यातील जनतेने लाभ घ्यावा -पालकमंत्री चंद्रकांत पाटील





नवऊर्जा उत्सवाचा शानदार शुभारंभ: भाविक व पर्यटकांना धार्मिक व सांस्कृतिक पर्वणी

          कोल्हापूर दि. 21 :- नवऊर्जा उत्सवातून कोल्हापूरवासियांना निश्चितपणे सकारात्मक ऊर्जा मिळेल, असा विश्वास व्यक्त करुन या नवऊर्जा उत्सवास जिल्ह्यातील जनतेने भेट घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्राचे महसूल तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलतांना केले.
            कै. भालचंद्र चिक्कोडे ग्रंथालयाच्यावतीने येथील निर्माण चौकामध्ये नऊ दिवसांसाठी आयोजित केलेल्या नवऊर्जा उत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, महापौर हसिना फरास, दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शेळके, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधिक्षक संजय मोहिते, प्रसिध्द कलादिग्दर्शक नितिन चंद्रकांत देसाई, सौ. अंजली चंद्रकांत पाटील, दैनिक पुढारीचे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव, गोकुळचे संचालक बाबा देसाई, संदिप देसाई यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
            नवऊर्जा उत्सवामध्ये अतिभव्य अशा एकाच छताखाली कोल्हापुरातील नवदुर्गासह एकूण 13 देवतांचे एकत्रित दर्शन नागरिकांना होणार असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, या नवऊर्जा उत्सवाचे खास वैशिष्टे म्हणजे, श्री अंबाबाईचा मळवट भरलेल्या चेहऱ्याचे आकर्षक आणि भव्य प्रवेशव्दार, मोठमोठ्या हत्तींच्या मूर्ती, प्रवेशव्दारावर भव्य मंगलकलश, दीपमाळा आणि प्राचीन मंदिराच्या भव्य भिंत्ती हे आकर्षण आहे. नवऊर्जा उत्सवांतर्गत एकाच छताखाली कोल्हापुरच्या नवदुर्गासह त्र्यंबोली, कात्यायनी, तुळजाभवानी आणि श्री अंबाबाईचे अनोखे दर्शन होणार आहे. यापैकी पाच देवतांच्या मुर्तीचे दर्शन हायड्रोलिक तंत्राने केले जात आहे, हे सर्वांर्थाने खास आकर्षण आहे. याबरोबरच आदिशक्ती श्री अंबाबाईचे महात्म्य सांगणारे बॅले नृत्य आणि 32 हजार चौरस फुटांचा भव्य सेट तसेच मान्यवर सेलेब्रिटींच्या उपस्थितीत होणाऱ्या या उत्सवास कोल्हापूर जिल्ह्यासह नजीकच्या जिल्हयातील जनतेने तसेच पर्यटकांनी भेट देऊन नवदुर्गा दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले..
            नवऊर्जा उत्सवानिमित्त उद्योग, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखणीय योगदान दिलेल्या 27 कर्तुत्ववान महिलांचा सन्मान केला जाणार असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, दररोज तीन महिलांचा या उत्सवामध्ये सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार असून नवऊर्जा उत्सवाच्या आजच्या पहिल्या दिवशी सुवर्णपदक विजेती नेमबाज पट्टू अनुष्का रविंद्र पाटील, स्वयंसिध्दा संस्थेच्या सौम्या तिरोडकर आणि प्रसिध्द उद्योजिका ग्यानी बठेजा यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच नवऊर्जा उत्सवाची संकल्पना आणि मांडणी-उभारणी करणारे प्रसिध्द कलादिग्दर्शक नितिन चंद्रकांत देसाई यांचा सत्कारही पालकमंत्री चंद्रकांत पाटील हातातील घडयाळ तर सौ. अंजली पाटील यांनी गळयातील चेन देऊन केला. पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन श्री. देसाई यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
            प्रसिध्द कलादिग्दर्शक नितिन चंद्रकांत देसाई आपल्या भावना व्यक्त करतांना म्हणाले की, श्री अंबाबाई देवीची सेवा करण्याची संधी नवऊर्जा उत्सवानिमित्त मला मिळाली असून कोल्हापुरकरांनी दिलेली ही सेवीची संधी आणि भेट आयुष्यभर जतन करु.
            याप्रसंगी सुप्रसिध्द गायिका श्रावणी रविंद्र यांनी सरस्वती स्तवन गाऊन श्री अंबाबाईच्या चरणी आपली सेवा अर्पण केली. तसेच टीव्हीवरील नावाजलेल्या काही मालिकामधील टायटल शाँग गाऊन प्रेक्षकाकडून दाद मिळविली. गायिका श्रावणी रविंद्र यांचा सत्कार सौ. अंजली चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
            प्रारंभी कै. भालचंद्र चिक्कोडे ग्रंथालयाचे अध्यक्ष राहूल चिक्कोडे यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात नवऊर्जा उत्सवाची संकल्पना विषद केली. या नवऊर्जा उत्सवाचा जिल्हयातील तसेच नजीकच्या जिल्हयातील जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन केले. या समारंभास माजी आमदार बजरंग देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, नगरसेवक सत्यजीत कदम, नगरसेवक किरण नकाते, आनंत खासबागदार यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका आणि नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बी न्युजचे संपादक चारुदत्त जोशी यांनी केले.

0000000

राजर्षी शाहू शिक्षण क्रांतीदिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरी व चित्ररथाने शहर दुमदुमले राजर्षी शाहूंच्या पुतळ्यास पालकमंत्र्यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करुन रॅलीची सुरुवात








        कोल्हापूर, दि. 21 : 21 सप्टेंबर या राजर्षी शाहू शिक्षण क्रांती दिनानिमित्त आज शहरातून शालेय मुला मुलींची प्रभात फेरी आणि विविध शाळांनी काढलेल्या सजीव चित्ररथांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले. सामाजिक परिवर्तनासाठी केवळ शिक्षण ! समाज सुधारक राजा शाहू महाराज! शिक्षण कार्य हेच महान कार्य! शिकलेला माणूस कधीही कमजोर नसतो अशा विविध घोषवाक्यांनी, हालगी आणि लेझिम पथक, झांज पथक, पोलीस बँडने सारा परिसर दुमदुमून गेला.
            राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने 21 सप्टेंबर या राजर्षी शाहू शिक्षण क्रांती दिनानिमित्त काढण्यात आलेल्या चित्ररथ व प्रभात फेरीचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्याहस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दसरा चौकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, डॉ. जयसिंगराव पवार, अशोक चौसाळकर, शिवाजी विद्यापीठाचे सह कुलसचिव विलास नांदवडेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, निवासी उप जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
            21 सप्टेंबर 2017 रोजी राजर्षी शाहू शिक्षण क्रांती दिनास 100 वर्षपूर्ण होत असून यानिमित्त राजर्षी शाहूंचे कार्य आणि विचार जनतेपर्यंत पोहोचावे म्हणून राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट व शाहू संशोधन केंद्र, शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने 21 ते 23 सप्टेंबर या तीन दिवसांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. आज या कार्यक्रमास विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीने आणि चित्ररथ रॅलीने सुरुवात करण्यात आली.    
            दसरा चौकातून सुरु झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीस, चित्ररथ रॅलीत जिल्ह्यातील विविध शाळा, हायस्कुलमधील विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शालेय मुलींनी सादर केलेल्या लेझिम खेळांने उपस्थितांच्या नजरा खिळवून ठेवल्या. पोलीस बँड हे या रॅलीतील मुख्य आकर्षण होते. शालेय झांज पथकाने परिसर दुमदुमून टाकला. ही प्रभात फेरी व चित्ररथ रॅली आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, शिवाजी पुतळा, महापालिका, सीपीआर हॉस्पिटल मार्गे जावून या रॅलीचा शाहू स्मारक भवन येथे समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये शालेय मुला मुलींची राजर्षी शाहू महाराज यांनी सक्तीच्या व मोफत शिक्षणासाठी केलेल्या कायद्यास 100 वर्ष होत असून त्या निमित्त शिक्षणाचे महत्व आणि राजर्षी शाहूंचे शिक्षणाचा कायदा या अनुषंगाने विविध घोषवाक्याचे फलक हे एक वेगळे आकर्षण होते.
            राजर्षी शाहू शिक्षण क्रांती दिनानिमित्त दसरा चौक येथून निघालेल्या प्रभात फेरी व चित्ररथ रॅलीमध्ये शहर व जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी, विद्यार्थींनी आणि मान्यवरांचा सहभाग लक्षणीय होता. आजच्या प्रभात फेरी व चित्ररथ रॅलीमध्ये प्रामुख्याने शालेय विद्यार्थ्यांचे सजीव चित्ररथ सहभागी झाले होते. यामध्ये वि.स.खांडेकर  प्रशालेने शाहू महाराजांचे शिक्षण‍ विचार, मुस्लिम हायस्कुलने शाहू महाराजांचे शिक्षण, प्रायव्हेट हायस्कुलच्या चित्ररथामध्ये शिक्षणाचे सार्वत्रिकरण, राजाराम हायस्कुलच्या चित्ररथामध्ये शाहूंचे जन्मस्थळ, महाराष्ट्र हायस्कुलने लेक वाचवा, देश वाचवा चित्ररथ, उषा राजे हायस्कुलने लोक शिक्षण गरजेचे, साई हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजने प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे, स.म. लोहिया हायस्कुलने शाहू महाराजांच्या कार्यावर आधारी चित्ररथ, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कुलने कुस्ती तसेच देशभुषण हायस्कुलने शिक्षणाची गंगा प्रत्येकाच्या घरी या विषयावर सजीव चित्ररथ तयार केले होते. या सजीव चित्ररथांना पाहण्यासाठी नागरीकांनी जागो जागी गर्दी करुन चौका चौकात त्यांचे स्वागत केले.
            या शालेय मुलांच्या प्रभात फेरी व चित्ररथ रॅलीच्या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक डॉ. हरिष जगताप, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले, माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, शाहू स्मारक भवनचे कृष्णाजी हारुगडे, वसंतराव मुळीक, मुस्लिम बोर्डींगचे गणी आजरेकर, कादर मलबारी यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी, शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी- विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

00 0 0 0 0

बुधवार, २० सप्टेंबर, २०१७

महसूल कार्यालयांचा कार्पोरेट लूक होणार विभागातील नगरपालिकांमध्ये झिरो पेंडन्सी उपक्रम राबविणार - महसूल आयुक्त चंद्रकांत दळवी झिरो पेंडन्सीमधील उत्कृष्‍ट कार्याबद्दल कोल्हापूरचे कौतुक




            
कोल्हापूर, दि. 20 :  झिरो पेंडन्सीच्या यशस्वी वाटचाली पाठोपाठ आता पुणे महसूल विभागातील सर्व महसूल कार्यालयांना कार्पोरेट लूक देण्याबरोबरच विभागातील 60 नगरपालिकांमध्ये  झिरो पेंडन्सी उपक्रम सुरु करण्याचा मानस पुणे विभागाचे महसूल आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केला.
            कोल्हापूर जिल्हा महसूल प्रशासनाने राबविलेल्या झिरो पेंडन्सी उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत महसूल आयुक्त चंद्रकांत दळवी बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी,अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.
            झिरो पेंडन्सी पाठोपाठ आता महसूल कार्यालयांना कार्पोरेट लूक देण्याचा प्रयत्न असून सर्व अधिकाऱ्यांनी येत्या मार्च अखेर सर्व कार्यालये कार्पोरेट बनविण्याच्या दृष्टीने नियोजन करुन कार्यवाही हाती घ्यावी अशी सूचनाही महसूल आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी केली. यामध्ये कार्यालयांतर्गंत पुर्नबांधणी, उत्तम फर्निचर, अभ्यागतांसाठी बैठक व्यवस्था या सर्व प्रक्रियेतून सामान्य माणसाचे काम सुसह्य कसे होईल यावर अधिक लक्ष द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
            पुणे विभागातील सर्व महसूल कार्यालयांमध्ये 1 जूनपासून हाती घेतलेल्या झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल अभियानास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून कोल्हापूर जिल्ह्याने 86.41 टक्के झिरो पेंडन्सी केल्याबद्दल जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार आणि कोल्हापूर महसूल प्रशासनाचे कौतुक करुन महसूल आयुक्त चंद्रकांत दळवी म्हणाले, या अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्याने जिल्हाधिकारी कार्यालयासह उपविभागीय कार्यालये, तहसील कार्यालयतील सर्व दप्तरे सहा गठ्ठा पध्दतीने लावली आहेत.  सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त रोज दोन तास जादा वेळ देऊन झिरो पेंडन्सी उपक्रम यशस्वी करुन दाखविल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.
            यापुढील काळात झिरो पेंडन्सीमुळे सामान्य माणसाला दिलासा मिळेल असा विश्वास व्यक्त करुन चंद्रकांत दळवी म्हणाले, झिरो पेंडन्सीचे उत्तम काम झाल्याने जनमाणसाचा प्रशासनाबाबतचा दृष्टीकोन निश्चितपणे बदलेल, यापुढील काळात लोकांची कामे तात्काळ निर्गती लागतील. झिरो पेंडन्सी कामांतर्गत मंडल निहाय आढावा घेऊन प्रलंबित प्रकरणांची तात्काळ निर्गती करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिली.
            पुणे विभागातील 60 नगरपालिकांमध्ये झिरो पेंडन्सी उपक्रम राबविण्याचा प्रयत्न असून यासाठी विभागातील नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांची कार्यशाळा येत्या 23 सप्टेंबर रोजी घेण्याचे निश्चित केले आहे. या उपक्रमांतर्गंत नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
            जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी कोल्हापूर जिल्ह्याने हाती घेतलेल्या झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल अभियानाची सविस्तर माहिती दिली, ते म्हणाले या अभियानांतर्गंत कोल्हापूर जिल्ह्यात 13 लाख 29 हजार 297 अभिलेखे अद्ययावत करण्यात आले. तर 5 लाख 45 हजार 647 इतक्या फाइल्स अभिलेख कक्षाकडे पाठविण्यात आल्या तर 7 लाख 83 हजार 650 फाइल्स अद्ययावत करण्यात आल्या आहेत.  30 वर्षाच्यावरील 8 लाख 24 हजार 458 फाइल्स नष्ट करण्यात आल्या आहेत. नष्ट केलेल्या कागदपत्राचे वजन 31 टन 3664 किलो भरले. ही कागदपत्रे नष्ट करण्यात आली आहे. तसेच शुन्य प्रलंबितता आणि दैनंदिन निर्गत प्रकरणांच्या दिनांक 31 मे 2017 रोजी प्रलंबित असणाऱ्या संख्या 45509 निश्चित करण्यात आलेली होती. त्यापैकी दिनांक 16 सप्टेंबर 2017 अखेर 41200 प्रकरणे निर्गत करण्यात आलेल्याचेही  जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सांगितले.
            याबैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, पुनर्वसन उपजिल्हाधिकारी अशोक पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल) अरविंद लाटकर, भुसंपादन अधिकारी श्री. हादगळ, जिल्हा प्रशासन अधिकारी नितीन देसाई, विधी अधिकारी वैभव इनामदार यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
महापालिकेच्या विशेष निधीमधील कामांना मान्यता
            कोल्हापूर महानगरपालिकेस राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या विशेष निधीतील कामांना यावेळी मान्यता देण्यात आली. यमाध्ये सागरमाळ येथील क्रिकेट मैदानातील सुविधांसाठीच्या प्रस्तावावर यावेळी सविस्तर चर्चा करुन मान्यता देण्यात आली. केशवराव भोसले नाट्यगृह व खासबाग मैदानाच्या करण्यात आलेल्या सुशोभिकरणाच्या कामाबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एस.पाटील, जिल्हा प्रशासन अधिकारी नितीन देसाई यांच्यासह सर्वसंबंधित अधिकारी उपस्थित होते.

0  0 0 0 0  0

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०१७

डॉल्बीमुक्त मिरवणूक महाराष्ट्रात इतिहास घडवेल - पालकमंत्री चंद्रकांत पाटील









प्रथम मानाचा गणपती श्री तुकाराम माळी तालीम मंडळाच्या
श्रींच्या पालखी पुजनाने पालकमंत्र्यांच्या हस्ते विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ


कोल्हापूर दि. 5 :- कोल्हापूरच्या प्रथम मानाचा गणपती श्री तुकाराम माळी तालीम मंडळाच्या श्रींच्या पालखीचे पुजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्रींची आरती होऊन कोल्हापूर गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला.
25 ऑगस्टपासून जिल्ह्यात गणेशोत्सवाची धामधुम सुरु असून आज अंनत चतुदशीच्या दिवशी विसर्जन मिरवणूकीस खासबाग मैदानापासून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालखी घेऊन सुरुवात केली. यावेळी महापौर हसिना फरास, आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधिक्षक संजय मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, श्री तुकाराम माळी तालीम गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष शिवाजी पोवार आदी मान्यवर उपस्थित होते.
फुलांनी सजविलेल्या आकर्षक पालखीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते पुजन झाल्यानंतर पोलीस बँडसह श्रीमंत प्रतिष्ठानच्या ढोल- ताशा पथकांनी परिसर दणाणून गेला.  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह मान्यवरांनी मिरजकर तिकटीपर्यंत पालखी आणली. पालखी सोहळ्याची मिरवणूक डोळ्याचे पारणे फेडणारी अशीच होती. गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मिरवणुकीचा जल्लोष दिसत होता. ढोल आणि ताशा पथकाचे सुत्रबध्द वाद्य तसेच मंडळांची केलेली विद्युत रोषणाई हे विसर्जन  मिरवणुकीचे आकर्षण होते.  
 यावर्षीच्या गणेशोत्सवानिमित्त श्री तुकाराम माळी तालीम मंडळाच्यावतीने कोल्हापूर वैभववाडी या रेल्वे मार्गावरील अंबाबाई एक्सप्रेसचा केलेला देखावा मिरवणुकीत असल्याने एकूण विसर्जन मिरवणुकीचे अंबाबाई एक्सप्रेस हा देखावा नागरीकांचे आणि भाविकांचे मुख्य आकर्षण ठरले. या मिरवणुकीत श्रीमंत प्रतिष्ठानच्या ढोल ताशा पथकामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होवून ढोल वाजवून ताल धरला. उपस्थितींनी उत्स्फुर्तपणे दाद दिली.
डॉल्बीमुक्त मिरवणुक महाराष्ट्रात इतिहास घडवेल - पालकमंत्री चंद्रकांत पाटील
यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पुरक आणि डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात गणेश मंडळानी घेतलेल्या पुढाकाराबद्दल समाधान व्यक्त करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील  म्हणाले, डॉल्बीही आरोग्यास घातक असून डॉल्बीमुक्त गणपती विसर्जन मिरवणूक  काढून  कोल्हापुरची जनता महाराष्ट्रात इतिहास घडवेल. डॉल्बीला फाटा देवून पारंपारित वाद्याचा मनमुराद आनंद घेतल्याबद्दल समस्त कोल्हापुरकरांचे विशेषत: मंडळांचे आणि गणेश भक्तांचे त्यांनी आभार मानले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले,  गेल्या बारा दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात तसेच डॉल्बीमुक्त साजरा केला हिच परंपरा विसर्जन मिरवणुकीतही जोपासून डॉल्बीमुक्त विसर्जन मिरवणुकीतून कोल्हापूर महाराष्ट्रात इतिहास घडवेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गणेशमंडळांनी आणि नागरिकांनी गणेशोत्सव उत्सवात आणि शांततेत पार पाडून प्रशासनास केलेल्या सहकार्यबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
श्री तुकाराम माळी तालीम मंडळाच्यावतीने कोल्हापूर-वैभववाडी या रेल्वे मार्गावरील अंबाबाई एक्सप्रेसचा केलेला देखावा मिरवणुकीतील आकर्षण असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कोल्हापूर कोकण रेल्वेला जोडण्याच्या कामास गती आली असून या कामाचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. आवश्यक निधी उपलब्ध झाला असून  येत्या एक दोन महिन्यात काम सुरु होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पर्यावरणपूरक आणि डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात पुढाकार घेतल्याबदल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरच्या प्रथम मानाचा गणपती श्री तुकाराम माळी तालीम मंडळाचे तसेच शहर आणि जिल्ह्यातील सर्व मंडळांचे आभार मानले. 
याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रांताधिकारी सचिन इथापे, पोलीस उपअधिक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, सुरज गुरव, तहसिलदार उत्तम दिघे, श्री तुकाराम माळी तालीम मंडळाचे उपाध्यक्ष संदिप चौगुले,  उत्सव कमिटीचे अध्यक्ष स्वप्नील पाटील, सचिव विकास पायमल, ॲड. धनजंय पठाडे, आर. के. पोवार, विजय देवणे, डॉ. उदय गायकवाड, दिलीप देसाई यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका विविध मंडळाचे पदाधिकारी, गणेशभक्त आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000