इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, ३१ जुलै, २०१९

पालकमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना विनामूल्य कार्ड नोंदणी सुरु




कोल्हापूर दि. 31 :- आयुष्यमान भारत - प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत निवड झालेल्या कोल्हापूर जिल्हयातील लाभार्थ्यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने कार्ड नोंदणी  उपक्रमांतर्गत लाभार्थी कार्ड - गोल्डन कार्ड विनाशुल्य देण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम पालकमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत राबविण्यात येत आहे. आतापर्यंत पाचशेहून अधिक जणांची नोंदणी करण्यात आली आहे.  या उपक्रमाचा जिल्हयातील पात्र लाभार्थ्यांनी लाााथ्लजनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांनी केले आहे.
आयुष्यमान भारत : प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत  प्रती कुटुंब आणि प्रती वर्ष पाच लाखापर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळणार आहेत. पालकमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत विनाशुल्क देण्यात येणाऱ्या लाभार्थी कार्ड – गोल्डन कार्ड नोंदणीसाठी शिधा पत्रिका, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा वाहन परवाना आणि प्रधानमंत्री कार्यालयाकडून प्राप्त पत्र ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
प्रधानमंत्री जनआरोग्य योजना म्हणजेच आयुष्यमान भारत या योजनेंतर्गत देशातील 10 कोटीपेक्षा अधिक कुटुंबांना म्हणजेच जवळपास 50 कोटीपेक्षा अधिक लोकसंख्येला या योजनेचा लाभ होणार आहे. या योजनेमुळे प्रति कुटुंब प्रती वर्ष कमाल मर्यादा 5 लाख रुपये आहे. लाभार्थ्यांना 5 लाखापर्यंतचे विमा संरक्षण मिळेल, ज्यामध्ये अनेक महत्वाचे उपचार लोकांना करता येणार आहेत.  या योजनेंतर्गत प्राप्त लाभार्थी विविध गंभीर आजारांवर 1300 उपचार पध्दती पैकी रुग्णालयात योजनेच्या नियमांनुसार उपलब्ध तज्ञ सुविधांवर आधारित उपचारांचा पूर्णपणे मोफत लाभ मिळेल. तसेच लाभार्थ्यांना रुग्णालयात प्राप्त होत असलेल्या लाभामध्ये रुग्णालयातील खाटा, सुश्रुषा व भोजन, एकवेळचा परतीचा प्रवास भत्ता, आवश्यक औषधोपचार व साधन सामुग्री, निदानसेवा, भूलसेवा व शस्त्रक्रिया यांचा समावेश असेल.
या योजनेसाठी सामाजिक आर्थिक जातीय जनगणना 2011 नुसार विशिष्ट निकषांनुसार निवडलेले ठराविक निवड लाभार्थी कुटुंबांच्या यादीत नाव असणे आवश्यक आहे. कुटुंबाचे नाव यादीत आहे किंवा नाही हे शोधण्यासाठी mera.pmjay.gov.in या संकेत स्थळाला भेट द्यावी अथवा पालकमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष, कावळा नाका, जुने गेस्ट  हाऊस, कोल्हापूर (संपर्क : 9307631325 ) येथे संपर्क साधावा, असे आवाहनही  श्री. यादव यांनी केले आहे.हा सर्व उपक्रम पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शना खाली सुरु असून विशेष कार्य अधिकारी विकास देशमुख आणि जिल्हा वैद्यकीय कक्षाचे समन्वयक अनिकेत मोरबाळे याचे नियंत्रण करीत आहेत.
००००००

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत रिलायन्स मॉलमध्ये झाले आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण




           
       कोल्हापूर, दि. 31 (जि.मा.का.) : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय रिलायन्स फौन्डेशन, रिलायन्स रिटेल व रिलायन्स जिओ यांच्या संयुक्त विद्यमाने रिलायन्स मॉलमधील अधिकारी, कर्मचारी व ग्राहकांसाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. 
            या प्रशिक्षणामध्ये  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, रिलायन्स फाउंडेशनचे राज्य, ‍व्यवस्थापक दीपक केकन, महाराष्ट्र रिलायन्स रिटेलचे आरोग्य व सुरक्षा प्रमुख वैभव खामकर, रिलायन्स फाउंडेशनचे अभिजीत ठाकरे रिलायन्स मॉल मधील अधिकारी व कर्मचारी व ग्राहकांसाठी आपत्ती व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले.  गर्दीच्या ठिकाणी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली तर नियंत्रण कसे करावे, तसेच स्वत:चा व दुसऱ्याचा जीव कसा वाचवावा,  महिला व मुले यांना सुरक्षीत ठिकाणी कसे पोहचवावे यावर  प्रशिक्षणामध्ये माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील एकूण 85 लोकांनी सहभाग घेतला होता.
             या कार्यक्रमासाठी  स्वप्निल मेटके, सुनील कदम, सुजित कांबळे, पुष्कराज जोशी, संजय यादव, रणजित काटकर, रिलायन्स फौंडेशनचे विभागीय व्यवस्थापक मारुती खडके, नवनाथ माने आदी उपस्थित होते.
00000

भूमिगत वाहनतळ निर्मितीबाबत प्रस्ताव द्या -जिल्हाधिकारी दौलत देसाई




       कोल्हापूर, दि. 31 (जि.मा.का.) : शिवाजी स्टेडीयम येथे उत्पन्न वाढीसाठी तसेच महालक्ष्मी मंदिरासाठी येणाऱ्या भाविकांची सोय म्हणून भूमिगत वाहनतळ करता येणे शक्य आहे का याबाबत तांत्रिक बाबी तपासून प्रस्ताव द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या.
       जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक आज झाली, त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे यांनी सुरूवातीला सर्वांचे स्वागत करून विषय वाचन केले.
          जिल्हा क्रीडा संकुल येथील असणाऱ्या जलतरण तलावाच्या दुरूस्तीबाबत जिल्हाधिकारी म्हणाले, जलतरण तलावाची दुरूस्ती करावी की नव्याने निर्मिती करावी याबाबत तीन आठवड्यामध्ये अहवाल सादर करावा. अत्यंत चांगल्या पध्दतीच्या सुविधा असणारा जलतरण तलाव करायला हवा. या ठिकाणी व्यायाम शाळा,स्टीम बाथ,सोना बाथ अशा सुविधा द्यायला हव्यात. त्याचबरोबर क्रीडा संकुल सौर उर्जेवर करण्याबाबत मेढाशी संपर्क साधावा.
          नवरात्रीच्या काळात क्रीडांगणाचा वापर वाहनतळ म्हणून केला जातो. याबाबत उत्पन्न वाढीसाठी विचार करून भूमिगत वाहनतळ होऊ शकते,असे सांगून जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, महालक्ष्मी मंदिरासाठी आणि स्टेडीयमसाठी याठिकाणी वाहनतळ करण्याबाबत प्रस्ताव सादर करा. त्याचबरोबर ज्या गाळेधारकांचा करार संपलेला आहे. त्यांच्यासोबत नवीन दराने करार करा. ज्या गाळेधारकांने पोट भाडेकरू ठेवला असेल त्याला काढून टाका, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
          आजच्या बैठकीमध्ये जिल्हा क्रीडा संकुलाकडे मानधनावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये 500 रूपयांनी वाढ करण्याचा तसेच रोजंदारीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये  1  हजार रूपयांची  वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला पोलीस उप अधीक्षक (गृह) अशोक पवार उपस्थित होते.
000000

राधानगरीतून 5684 क्युसेक्स विसर्ग नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा



`           कोल्हापूर, दि. 31 (जि.मा.का.) : राधानगरी धरण आज पूर्ण क्षमतेने भरले असून धरणाचे स्वयंचलित दरवाजा क्रमांक 3, 5, व 6 उघडले आहेत. त्यामधून 4284 व विद्युत विमोचकातून 1400 असा एकूण 5684 क्युसेक्स विसर्ग सुरू झाला आहे. नदीकाठच्या गावातील लोकांना दक्षतेचा इशारा पंचगंगा पाटबंधारे उपविभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस.एम.शिंदे यांनी दिला आहे.
00000


राधानगरीतून 2828 क्युसेक्स विसर्ग नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा







`           कोल्हापूर, दि. 31 (जि.मा.का.) : राधानगरी धरण आज सकाळी 11.30 वाजता पूर्ण क्षमतेने भरले असून धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्रमांक सहा उघडला आहे. त्यामधून 1428 व विद्युत विमोचकातून 1400 असा एकूण 2828 क्युसेक्स विसर्ग सुरू झाला आहे. स्वयंचलित दरवाजा क्रमांक तीनही उघडला आहे. नदीकाठच्या गावातील लोकांना दक्षतेचा इशारा पंचगंगा पाटबंधारे उपविभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस.एम.शिंदे यांनी दिला आहे.
00000


मंगळवार, ३० जुलै, २०१९

श्रावणषष्ठी यात्रा पावसाची परिस्थिती विचारात घेऊन आवश्यक उपाय योजना करा जिल्हाधिकारी दौलत देसाई



सर्व यंत्रणांनी  परस्पर समन्वयाव्दारे यात्रा सुरळीतपणे पार पडावी

-          
कोल्हापूर, दि. 30 :  श्री चोपडाईदेवी श्रावणषष्ठी यात्रा कालावधीत पासवासाची परिस्थिती विचारात घेऊन आवश्यक उपाय योजना करा तसेच यात्रा कालावधीत सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेऊन श्रावणषष्ठी यात्रा उत्साहपूर्ण वातावरणात सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.
 श्री वाडीरत्नागिरी येथील श्री चोपडाईदेवी श्रावणषष्ठी यात्रा- 2019 च्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जोतिबा डोंगर येथील एमटीडीसीच्या सभागृहात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस अतिरिक्त पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे, प्रांताधिकारी अमित माळी, पोलीस उपअधीक्षक प्रशांत अमृतकर, तहसिलदार रमेश शेंडगे, देवस्थान कमिटीच्या सदस्या संगीता खाडे, शिवाजी पाटील, सचिव विजय पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, उपसरपंच शिवाजी सांगळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
श्रावणषष्ठी यात्रा सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पडावी, यादृष्टीने सर्व यंत्रणांनी अधिक सज्ज आणि सतर्क रहावे, अशी सूचना करुन जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, पावसाळा आणि पावसाची परिस्थिती विचारात घेऊन संभाव्य काळात अचानकपणे उदभवणाऱ्या धोक्यांचा अभ्यास करुन यात्रा कालावधीत परस्पर समन्वय ठेवून कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांवर अधिक भर द्यावा. यामध्ये देवस्थान समिती, महसूल, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, विद्युत, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य आदि विभागांनी अधिक दक्षता घ्यावी. जेणे करुन श्रावण षष्ठी यात्रा उत्साहपूर्ण वातावरणात तसेच सुरळित आणि सुरक्षितपणे पार पडेल.
  यात्रा काळात भाविकांची गैरसोय होणार नाही तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच त्यांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यास प्राधान्य दिले असल्याचे सांगून जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, भाविकांसाठी चारचाकी तसेच दोन चाकीवाहनांसाठी स्वतंत्रपणे पार्किंग व्यवस्था करण्यात आली असून 14 ठिकाणी पार्किंग स्पॉट निश्चित केले आहेत. याबरोबरच  वाहतूक व्यवस्था, दर्शनरांग, बरॅकेटिंग, सुरक्षा व्यवस्था, पाणीपुरवठा स्वच्छता, आरोग्य व्यवस्था, विद्युत, रस्ते, हॉटेलमधील खाद्य पदार्थाची तपासणी  आदि सर्व व्यवस्थांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास प्राधान्य देण्याची सूचनाही त्यांनी केली. या सर्व कामात प्रशासकीय यंत्रणांना विविध स्वयंसेवी - सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून होत असलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
पावसाळा आरोग्य विभागाने सतर्कता बाळगावी
 सध्या पावसाचे अधिक प्रमाण असून पावसाळयातील आजाराबाबत प्रतिबंधक उपाययोजनांना अधिक प्राधान्य द्यावे, याबाबत  आरोग्य विभागाने सतर्क राहण्याची सूचना करुन जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, आरोग्य विभागाने साथीच्या आजाराबाबत आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, पुरेसा औषधांचा आणि लसींचा साठा उपलब्ध करण्याबरोबरच पाणी शुध्दीकरणास प्राधान्य द्यावे,  यात्रा कालावधीत टीसीएल, तुरटीही पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आवश्यक कार्यवाही करावी तसेच अन्न, औषध प्रशासन विभागाने हॉटेल्स, अन्न पदार्थांचे स्टॉल्स, दुकाने यांची तपासणी करावी, अशी सूचना त्यानी केली.
यात्रा कालावधीत आपत्ती व्यवस्थापण यंत्रणा अधिक दक्ष आणि सतर्क राहील, असे सांगून जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, श्रावण षष्ठी यात्रा कालावधीत सुरक्षा व्यवस्था चोख ठेवावी, याकामी पोलीस, गृहरक्षक दलाचे जवान तसेच सेवाभावी, स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकाची मदत घ्यावी, यासाठी पोलीस दलाने पुढाकार घेऊन सुरक्षिततेच्यादृष्टीने कराव्या लागणाऱ्या सर्व उपाययोजनांना प्राधान्य द्यावे.केले. सार्वजनिक‍ बांधकाम विभागाने पावसाळा विचारात घेऊन जोतिबाकडे येणाऱ्या सर्व मार्गावर आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, या विभागाने अधिक दक्ष राहून काम करण्याची सूचनाही त्यांनी दिली.
यात्रा काळात पुरेसा पोलीस बंदोबस्त : अतिरिक्त पोलीस अधीक्षक
जोतिबा येथील श्रावण षष्ठी यात्रा येत्या 5 व 6 ऑगस्टला होत असून भाविकांची सुरक्षा सर्वार्थाने महत्वाची असून यात्रा काळात पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात केल्याचे सांगून अतिरिक्त पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे म्हणाले, यात्रा कालावधीत पोलीस पथके, सीसीटीव्ही कॅमेरे, सुसज्ज व्हॅन, स्वतंत्रपणे नियंत्रण कक्ष याची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. भुरटे चोर, पाकिटमार  यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस विभाग सतर्क आहेच, भाविकांची कसल्याही प्रकारे फसवणूक होणार नाही, याचीही पोलीस दलामार्फत काळजी घेतली जाईल. याबरोबरच शहर वाहतूक शाखेच्यावतीनेही यात्रा कालावधीत पुरेसा प्रमाणात वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत.
श्रावण षष्ठी यात्रेनिमित्त पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने आवश्यक उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने यात्राकाळात तात्पुरी 70 शौचालये, 200 सुरक्षा रक्षक, 15 वॉकीटॉकी, 14 वाहनतळ, 32 सीसीटीव्ही कॅमेरे, मेटल डिटेक्टर, हॅलोजन, 40 एसटीबस, अग्निशमन यंत्रणा अशा सर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे. मंदीरातील वीज कनेक्शन  आणि वायरिंगची तपासणी करुन घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी केली.
या बैठकीत श्रावण षष्ठी यात्रेनिमित्त करावयाच्या उपाययोजनांचा विभाग निहाय आढावा घेण्यात आला. यावेळी सर्व विषयावर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. याबैठकीस सर्व विभागांचे अधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
0000000


प्रलंबित प्रकरणे पोलीसांनी तात्काळ मार्गी लावावीत - जिल्हाधिकारी दौलत देसाई



            कोल्हापूर, दि. 30 (जि.मा.का.) : तपासावरील प्रलंबित प्रकरणे पोलीसांनी तात्काळ मार्गी लावावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या.
       जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक काल जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. याबैठकीला समाज कल्याणचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत, शहर क्षयरोग अधिकारी ए.बी.परितेकर, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी नितीन मस्के, अप्पासाहेब पाळखे, अशासकीय सदस्य निरंजन कदम, राजू मालेकर, सहायक संचालक नसरीन मगरे, निमंत्रित एन.बी.आयरेकर आदी उपस्थित होते.
          सहायक आयुक्त श्री. कामत यांनी सर्वांचे स्वागत करुन विषय वाचन केले. त्यानंतर त्यांनी सविस्तर आढावा सांगितला. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती (अत्याचार प्रतिबंध 1989) ॲट्रॉसिटी अंतर्गत व नागरी हक्क संरक्षण अंतर्गत घडलेल्या गुन्ह्यांच्या सद्यस्थितीबाबत समावेश होता. जानेवारीमध्ये 10, फेब्रुवारीमध्ये 3, मार्चमध्ये 9, एप्रिलमध्ये 2, मेमध्ये 10 व जूनमध्ये 5 असे एकूण 39 गुन्हे घडलेले आहेत.  यामधील तपासावरील 26 प्रकरणे प्रलंबित आहेत.
          जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी या प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेतला. ते म्हणाले, उच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे वगळता प्रलंबित असणारी सर्व प्रकरणे लवकरात लवकर मार्गी लावावी. दोषारोप पत्र पाठवावे जेणेकरुन पीडितांना अर्थसहाय्य देता येईल. पोलीसांना जातीचे दाखले मिळवून देण्यासाठी समाज कल्याण विभागाने सहकार्य करावे, असेही ते म्हणाले.

राज्यात नाशिकनंतर कोल्हापूरमध्ये होणार आयएनसी केंद्र -उप प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारीस



            कोल्हापूर, दि. 30 (जिमाका) : येथील मोरेवाडी परिसरात वाहन निरीक्षण आणि परिक्षण केंद्र होणार असून राज्यात अशाप्रकारचे नाशिक येथे केंद्र आहे, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारीस यांनी आज दिली.
       डॉ. अल्वारीस पुढे म्हणाले, राज्य शासनाने मोरेवाडी येथील पाच एकर जागा यासाठी मंजूर केली आहे. या केंद्रासाठी अंदाजे 15 कोटीचा खर्च अपेक्षित आहे. याठिकाणी अवजड वाहनांसाठी दोन व हालक्या वाहनासाठी दोन अशा चार लेन्स असणार आहेत. याठिकाणी वाहनाचे स्वयंचलित निरीक्षण आणि परिक्षण होणार आहे. प्रामुख्याने ब्रेक, व्हील अलायमेंट, इंजिन तपासणी आदींचा समावेश असणार आहे. यामध्ये मानवी हस्तक्षेप अत्यंत नगण्य असणार आहे. वाहन निरीक्षण आणि परिक्षण केंद्राबरोबरच प्रशासकीय इमारत यंत्रसामुग्रीसह उभी राहणार आहे.
          पोलीस ठाणे, केएमटी कार्यशाळा, एसटी महामंडळ कार्यशाळा याठिकाणी विविध कारवाईतील गेल्या दोन वर्षांपासून पडून असणाऱ्या 174 बेवारस वाहनांचा लिलाव टप्या टप्याने होणार असून याला जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच मान्यता दिली आहे. या लिलावामधून पडू असणारी जागा रिकामी होईल. त्याचबरोबर होणाऱ्या लिलावातून शासनाकडे महसूल जमा होईल. ट्रक, रिक्षा, बसेस, छोटी वाहने आदींचा या बेवारस वाहनांमध्ये समावेश असे डॉ. अल्वारीस म्हणाले.
           
000000

पंचगंगा वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज - पर्यावरण तज्ज्ञ बुधाजीराव मुळीक




कोल्हापूर, दि. 30 (जि.मा.का.) : पाण्यामध्ये 40 प्रकारचे शेवाळ असतात ते प्रदूषणाला प्रतिकार करतात. ही पाण्याची स्वत:ची शुध्दीकरण प्रक्रिया आहे. परंतु प्रदूषणामुळे पंचगंगेतील पाणी मरत आहे. तिला प्रदूषणमुक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज आहे. त्याची सुरुवात स्वत:पासून करा, असे आवाहन पर्यावरण तज्ज्ञ बुधाजीराव मुळीक यांनी केले.
       महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या विद्यमाने पंचगंगा नदी व परिसर प्रदूषण निर्मूलनासाठी जनजागृती अभियान येथील शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात घेण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कल्लशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड, उप वनसंरक्षक हणमंत धुमाळ आदी उपस्थित होते.
            देशातील ज्या प्रमुख 20 नद्या प्रदुषित आहेत त्यामध्ये पंचगंगेचा समावेश आहे, असे सांगून श्री. मुळीक यांनी संगणकीय सादरीकरण केले. पुढे ते म्हणाले, पाण्याला जीवन म्हणतात परंतु पंचगंगेचे पाणी आज मरतय हे लक्षात ठेवा. नदीमध्ये येणारा नायट्रोजन आणि फॉस्फरसचा स्त्रोत बंद केला पाहिजे. नदीच्या पाण्यात पडणाऱ्या राखेमुळे सूर्यप्रकाश येत नाही आणि पाण्यातील सुक्ष्मजीव मरतात.
            पूर्वीच्या काळी हिंगणमिट्याने कपडे धुत होतो. मीठाच्या खड्याने दात घासत होतो. सहजच पाटाचं पाणी पित होतो. पण आता असं होत नाही. याचं आत्मपरिक्षण करावं लागेल. दात साफ करणारं फ्लोराईड पोट देखील साफ करतं. शेतकऱ्याने किमान 30 टक्के रासायनिक खतं देणं बंद करायला हवं. पाण्यापासून 30 प्रकारचे रोग होतात. आपणाला दवाखाना चालवायचा का? हे ठरवावं लागेल. पंचगंगा नदी कायम प्रवाही नसून ती हंगामी प्रवाही आहे. तीच्यावर आठ बंधारे आहेत तीला प्रदूषण मुक्त करण्यासाठी स्वत:पासून सुरुवात करा. विशेषत: विद्यार्थ्यांचे प्रबोधन करुन त्यांना जनजागृती दूत बनवा. या  मोठ्या चळवळीत प्रत्येकाने सहभागी व्हा,असेही श्री. मुळीक म्हणाले.
            पर्यावरण तज्ज्ञ श्री. गायकवाड यांनीही संगणकीय सादरीकरण करुन पंचगंगा प्रदूषण मुक्त करण्यासाठी विविध माहिती दिली आणि पंचगंगा पदूषणमुक्तीसाठी आवाहन केले. 19 जुलै रोजीच्या शासन निर्णयाचे अनुपालन केल्यास ग्रामपंचायती स्वच्छ होतील. त्याचबरोबर प्रदूषण रोखण्यास मदत होईल असे श्री. मित्तल यांनी सांगितले. जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी प्रदूषणास कारणीभूत असणाऱ्या घटकांचा सविस्तर आढावा सांगितला. महानगरपालिका, नगरपालिका, औद्योगिक वसाहती या सर्वांचा प्रदूषणामध्ये असणारा हिस्सा आणि त्यावरील ठोस उपाययोजना करण्यासाठी कृती आराखडा तयार करा. जनमाणसात प्रदूषण कमी करण्यासाठी जनभावना निर्माण व्हायला हवी. त्यासाठी प्रत्येकाने स्वत:पासून सुरुवात करावी, असे आवाहन त्यांनी केले.
            डॉ. कल्लशेट्टी यावेळी म्हणाले, रि-ड्यूस, रि- युज, रि-सायकल यांच्या जोडीला रि-फ्युज करायला हवे. प्रदूषण होणार असेल, तर अशा गोष्टींना नाही म्हणायला शिकलं पाहिजे. ट्रिटमेंट केलेलं पाणी आपण वाया घालवतो त्यामुळे मागितल्याशिवाय येणाऱ्यांना पाणी द्यायचं नाही. प्रत्येक गावाने पर्यावरण विकास आराखडा बनवावा. विद्यार्थ्यांना स्वच्छता दूत म्हणून जनजागृती चळवळ वाढवावी लागेल. जिथे जिथे शक्य आहे तेथे पर्यावरण पुरक वस्तुंचा वापर करा.
            उप प्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी जिल्हा पर्यावरण समितीचे सदस्य, विविध अधिकारी, पदाधिकारी आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
0 0 0 0 0 0 0

राधानगरीत 95 टक्के पाणीसाठा नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे



कोल्हापूर, दि. 30 (जि.मा.का.) : राधानगरी धरण आज दुपारी 4 वाजता 95 टक्के भरले आहे. कोणत्याही क्षणी विसर्ग होण्याची शक्यता असून नदीकाठच्या गावातील लोकांनी सतर्क रहावे, असा दक्षतेचा इशारा पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी यांनी दिला आहे.
       पावसाचा जोर कायम राहिल्यास येत्या काही तासात राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरून धरणाचे स्वंयचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठी व सखल भागात राहणाऱ्या लोकांनी सतर्क रहावे, असा दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
0000


चोपडाई देवी श्रावणषष्ठी यात्रेत नोंदणी दाखला घेऊनच स्टॉल लावावेत - सहाय्यक आयुक्त मो.शं. केंबळकर



कोल्हापूर, दि. 30 (जि.मा.का.) : श्रीक्षेत्र वाडीरत्नागिरी येथील चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा दिनांक 5 ते 6 ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणात साजरी होणार आहे. भाविकांना भेसळविरहित खाद्यपदार्थ, अन्नपदार्थ पुरविण्यासाठी अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानदे कायदा, 2006 अंतर्गत अन्नपरवाना, नोंदणी दाखला घेऊनच स्टॉल लावावेत. अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त मो.शं. केंबळकर यांनी दिला आहे.
       अन्न व्यावसायिकांनी खाद्यपदार्थ तयार करताना त्यांच्या आजुबाजुचा परिसर स्वच्छ असल्याची खातरजमा करावी. खाद्य पदार्थासाठी लागणारे पाणी व गिऱ्हाईकांना देण्यात येणारे पाणी  पिण्यायोग्य असल्याची खातरजमा करावी. खाद्यपदार्थामध्ये बर्फाचा वापर करावयाचा झाल्यास परवानाधारक बर्फ उत्पादकाकडूनच खरेदी करून त्याबाबत बिल जपून ठेवावे. ज्या अन्न व्यावसायिकांकडे बर्फाची  खरेदी बिलं आढळून येणार नाहीत त्यांच्याकडील बर्फाचा साठा हा अखाद्य दर्जाचा समजून तो जागीच नष्ट करण्यात येईल. खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या व्यावसायिकांनी त्यांच्याकडील कर्मचारी वर्गाची वैद्यकीय तपासणी करून घेऊन प्रमाणपत्रे तसेच अन्नपरवाने, नोंदणी दाखले, कच्च्या अन्नपदार्थांची खरेदी बिले तपासणीकरिता उपलब्ध ठेवावीत.
          भजी, वडे यासारखे खाद्यपदार्थ  तयार करणाऱ्या व्यावसायिकांनी तळण्यासाठी खाद्यतेलाचा पुर्नवापर 3 पेक्षा जास्तवेळा करू नये. पिण्याचे, खाद्यपदार्थ तयार करण्याकरिता जे पाणी उपयोगात आणण्यात येईल ते स्वच्छ भांड्यामध्ये व्यवस्थित झाकून ठेवलेले असावे. कोणत्याही परिस्थितीत शिळे,जास्त वेळ राहिलेले खाद्यपदार्थ, दुग्धजन्य पदार्थ गिऱ्हाईकांना सेवनास देऊ नये. अशा शिळ्या राहिलेल्या अन्नपदार्थामुळे अन्न विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तयार खाद्यपदार्थ नियमित झाकून ठेवावेत जेणेकरून ते माश्या, धूळ यापासून दूषित होणार नाहीत. शिळे अन्नपदार्थ वेळीच नष्ट करावेत,असे आवाहनही त्यांनी केले आहे.
000000

दीनदयाळ स्पर्श योजनेसाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करा



            कोल्हापूर, दि. 30 (जि.मा.का.) : विद्यार्थ्यांच्या छंदाला चालना देण्यासह त्यांना इतिहासाची माहिती करून देण्यासाठी दीनदयाळ स्पर्श योजना राबविली जात आहे. इयत्ता 6 वी ते 9 वी च्या शालेय विद्यार्थ्यांसाठी टपाल तिकिट संग्रह खाते योजना सुरू केली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन वरिष्ठ अधिक्षक ईश्वर पाटील यांनी केले आहे.
       फिलॅटेली एक छंद म्हणून जोपासण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला चालना देण्यासाठी अखिल भारतीय स्तरावर 920 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. प्रत्येक सर्कलव्दारे इयत्ता 6 वी ते 9 वी तील जास्तीत-जास्त 40 विद्यार्थ्यांना प्रतिमाह 600 रूपये च्या दराने प्रतिवर्ष 6 हजार इतकी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. मान्यताप्राप्त शाळेचा विद्यार्थी असावा. त्याला वार्षिक परीक्षेत कमीत-कमी 60 टक्के गुण (अजा. व अज. यांना 55 टक्के) असावेत. त्या शाळेचा फिलॅटेली क्लब असावा. तो विद्यार्थी त्या क्लबचा सदस्य असावा. जर शाळेचा फिलॅटेली क्लब नसेल तर त्या संबंधित विद्यार्थ्याचे स्वतंत्र टपाल तिकिट संग्रह खाते असावे.
          या योजनेत विद्यार्थ्यांची निवड ही फिलॅटेली प्रकल्प कार्यावरील मुल्यांकनावर किंवा सर्कल ऑफिसकडून आयोजित प्रश्न मंजुषा स्पर्धेतील कामगिरीवर केली जाईल. सर्कल स्तरावर स्थापन करण्यात आलेली एक समिती ज्यामध्ये टपाल पदाधिकारी आणि प्रसिध्द फिलॅटेलिस्ट असतील. ज्यांच्याकडून उमेदवाराने सादर केलेल्या प्रकल्पाच्या कामाचे मूल्यमापन केले जाईल. ज्या विषयावर प्रकल्प कार्य करायचे आहे त्या विषयाची सूची सर्कल ऑफिसव्दारे अधिसूचना जारी करतेवेळी जाहीर केली जाईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आपल्या पालकांसोबत पोस्ट ऑफिस बचत बँक किंवा इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे संयुक्त खाते उघडावे लागेल. प्रत्येक पोस्टल सर्कल पारितोषिकांची निवड करेल आणि लाभार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम देण्यासाठी POSB /IPPB ला सूचना देईल.
00000





एचआयव्ही संसर्गीतांना विविध योजनांचे लाभ मिळवून द्या -जिल्हाधिकारी दौलत देसाई





            कोल्हापूर, दि. 30 (जि.मा.का.): अद्यापही काही एचआयव्ही संसर्गीत शासनाच्या विविध लाभापासून वंचित आहेत. त्यांच्यापर्यंत पोहचून त्यांचे प्रबोधन करून त्यांना लाभ  मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर रक्त संकलनातील ज्या व्यक्ती एचआयव्ही पॉझिटिव्ह असतील अशांवर लवकरात-लवकर उपचार सुरू व्हावेत यासाठी रक्त पेढयांनी याची तात्काळ माहिती जिल्हा एड्स नियंत्रण पथकाकडे द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई  यांनी दिले.  
जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण समितीची बैठक काल झाली.  या बैठकीस सहाय्यक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.  विलास देशमुख, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. ए.बी.परितेकर, डीटीसीच्या मेडीकल ऑफिसर डॉ. रूपाली भाटे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दिपा शिपुरकर, जिल्हा पर्यवेक्षक निरंजन देशपांडे, संग्राम संस्थेच्या मिना शेषू आदी उपस्थित होते.
जिल्हा पर्यवेक्षक श्री. देशपांडे आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीमती शिपुरकर यांनी संगणकीय सादरीकरण करून गेल्या तीन महिन्यातील जिल्ह्याचा आढावा दिला. 1 हजार 790 जणांनी मोफत एसटी पासचा लाभ घेतला आहे. संजय गांधी निराधार योजनेचा 1 हजार 472 जणांनी लाभ घेतला आहे. याच धर्तीवर केएमटीचा लाभही यांना मिळावा, अशी मागणी श्रीमती शिपुरकर यांनी केली.
            जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, केएमटीच्या बसचा लाभ मिळवून देण्यासाठी महापालिका आयुक्तांना पत्र दिले जाईल. या लाभासह अद्यापही काही प्रकरणे प्रलंबित असतील तर ती मार्गी लावावीत. एचआयव्ही संसर्गीतांच्या कोणत्याही गोपनियतेचा भंग होणार नाही याची जबाबदारी संबंधित यंत्रणेने घ्यावी. आवश्यक त्या ठिकाणी पोस्टाने पत्रव्यवहार करून सूचना द्यावी. संसर्गीतांसाठी आवश्यक असणाऱ्या तपासणी प्रयोगशाळेसाठी साधन-सामग्री, संगणक यासाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार करून द्यावा.
            एड्स प्रतिबंधक उपाययोजनेबरोबरच जनजागृतीचे काम जिल्ह्यात प्रभावीपणे होत आहे. त्यामुळे संसर्गीतांच्या संख्येत घट दिसून येत आहे. तृतीयपंथी, वेश्या व्यवसाय करणाऱ्यांना आवश्यक सामाजिक सुविधा मिळाव्यात यासाठी विशेष प्रयत्न करावेत,असेही ते म्हणाले.
             यावेळी क्षयरोग निर्मुलन कार्यक्रमावरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
00000


सोमवार, २९ जुलै, २०१९

प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी पुन:श्च मुदतवाढ



कोल्हापूर, दि. 29 (जिमाका) : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी दिनांक 31 जुलै पर्यंत मुदतवाढ करण्यात आली असल्याचे कृषि विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
       शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी व त्यांना पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगामामध्ये सहभागी होण्यासाठी 29 जुलै पासून दिनांक 31 जुलै पर्यंत पुन:श्च मुदतवाढ देण्यात येत आहे.
        योजनेत सहभागी होण्यासाठी बँक व आपले सरकार सेवा केंद्रामार्फत बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे विमा अर्ज स्विकारण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा संरक्षण मिळण्यासाठी विहीत मुदतीपूर्वी नजिकच्या बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्त्यासह तसेच आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर करावा.
          अधिक माहिसाठी विभागीय कृषि सह संचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी तसेच बँक, आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क साधावा.
00000

शेतकऱ्यांनी आपल्याच शेतात बिजोत्पादन करावे - विभागीय बीज प्रमाणिकरण अधिकारी



कोल्हापूर, दि. 29 (जिमाका) : प्रत्येक हंगामात सुधारित व अधिक उत्पादन देणाऱ्या नवीन वाणाचे बियाणे खरेदी करणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्याच शेतात बिजोत्पादन करावे. त्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी व आघारकर संशोधन केंद्र, पुणे व कृषी विज्ञान केंद्र बारामती, पुणे संस्थेकडे तसेच जिल्ह्यातील महाबीज कार्यालयाकडे सुधारीत व अधिक उत्पादन देणाऱ्या पिकाचे बियाणे उपलब्ध आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी, शेतकरी गटांनी, बीजोत्पादक संस्थांनी हा बीजोत्पादनाचा कार्यक्रम राबवावा. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्हा बीज प्रमाणिकरण अधिकारी कार्यालयाशी अथवा महाबीज कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय बीज प्रमाणिकरण अधिकारी वाय.सी. कोरडे यांनी केले आहे.
       पेरणीपूर्वी बियाण्याची पडताळणी महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणिकरण यंत्रणेकडून करून घ्यावी व पेरणीनंतर संबंधित जिल्हा बीज प्रमाणिकरण अधिकारी कार्यालयाकडे त्याची नोंदणी करावी. पीक निहाय क्षेत्र नोंदणीची मुदत खाली नमुद केल्याप्रमाणे आहे. मूग,उडीद नोंदणीची अंतिम तारीख 25 जुलै व शुल्क भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै, सोयाबीन,ज्वारी बाजरी, भुईमूग, तूर, ज्युट व कापूस नोंदणीची तारीख 31 जुलै व शुल्क भरण्याची 6 ऑगस्ट, धान पीकासाठी नोंदणीची तारीख 20 ऑगस्ट व शुल्क भरण्याची 26 ऑगस्ट, सूर्यफुल व इतर खरीप पिकांसाठी नोंदणीची तारीख 31 ऑगस्ट व शुल्क तारीख 6 सप्टेंबर अशी राहिल.
           बिजोत्पादक संस्थांनी बिजोत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर घ्यावयाच्या बिजोत्पादन कार्यक्रमाचे क्षेत्र नोंदणी प्रस्ताव बीज प्रमाणिकरण यंत्रणेकडे विहीत मुदतीत सादर करणे आवश्यक आहे. बिजोत्पादन क्षेत्र नोंदणीसाठी आवश्यक दस्ताऐवज पुढीलप्रमाणे (बीजोत्पादक संस्थेने सादर करणे आवश्यक) बिजोत्पादक संस्थेचा नोंदणी व बियाणे विक्री परवाना, बिजोत्पादक संस्थेच्या प्रतिनिधीचे अधिकारपत्र, 500 रूपयाचा विहीत नमुन्यातील करारनामा, स्त्रोत बियाणे खरेदी बील, स्त्रोत पडताळणी अहवाल (जिल्हा निहाय नियोजनासह), बिजोत्पादकांच्या स्वाक्षरीचा विहीत नमुन्यातील अर्ज, बिजोत्पादकांचे महसुली 7/12, 8 अ दस्तावेज, बिजोत्पादकाचे आधार क्रमांक व बँक खाते क्रमांक, संस्था व बिजोत्पादकामधील व्दिपक्षीय करारनामा, पैदासकार प्रमाणपत्र ,मुळ मुक्तता अहवाल.
          संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक-जिल्हा बीज प्रमाणिकरण अधिकारी अहमदनगर-0241-2470796, जिल्हा बीज प्रमाणिकरण अधिकारी पुणे- 020-26122887, (सोलापूर,रायगड व पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी) जिल्हा बीज प्रमाणिकरण अधिकारी सातारा- 02162-237024, (सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी) आघारकर संशोधन केंद्र पुणे, श्री चव्हाण-7767988870, श्री.गीते- 9404214912, श्री. इढोळ - 9767573184, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी - 02426-243355.
00000

प्रगणक म्हणून स्थानिकांना संधी द्या -जिल्हाधिकारी दौलत देसाई






कोल्हापूर, दि. 29 (जिमाका) : 7 व्या राष्ट्रव्यापी आर्थिक गणनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये गणना करण्यासाठी प्रगणक नेमताना स्थानिकांना संधी द्या. त्यासाठी विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, स्थानिक स्वराज्य संस्था यांची मदत घ्या, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या.
       7 व्या राष्ट्रव्यापी गणनेअंतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक आज घेण्यात आली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी सरीता यादव, शिवाजी विद्यापीठाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ज्ञानदेव तळुले, संख्याशास्त्र विभाग प्रमुख हेमांगी कुलकर्णी, इचलकरंजीचे मुध्याधिकारी दिपक पाटील आदी उपस्थित होते.
          जिल्हा सांख्यिकी अधिकारी भूषण देशपांडे यांनी सुरवातीला सर्वांचे स्वागत करून संगणकीय सादरीकरण केले. 6 व्या आर्थिक गणनेमध्ये जिल्ह्यामध्ये 5 लाख 71 हजार अस्थापनांची नोंद करून राज्यात जिल्हा प्रथम क्रमांकावर आलेला आहे. अस्थापनांमधील रोजगारांच्याबाबतीतही जिल्हा राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे. हस्तव्यवसाय, हातमाग  क्षेत्रात तिसऱ्या क्रमांकाचा वाटा जिल्ह्याचा आहे. कृषी क्षेत्रावर आधारीत आस्थापनांमधील रोजगाराबाबत राज्यात सर्वाधिक वाटा जिल्ह्याचा आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
          7 वी आर्थिक गणना स्थानिक स्तरावर नियोजन करण्यासाठी गाव, प्रभाग पातळीपर्यंत कार्यरत असणाऱ्या अस्थापनांचे भौगोलिक स्थान जोडून यादी तयार करण्यात येणार आहे. ही आर्थिक गणना सप्टेंबर अखेर पूर्ण करण्यात येईल. यासाठी प्रथम स्तर पर्यवेक्षक त्यांच्या अधीन असतात. 2 ते 3 व्यक्ती प्रगणक म्हणून प्रत्यक्ष माहिती गोळा करतील. केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय नमुना पाहणी संघटनेकडून 2 टक्के व राज्य शासनाच्या अर्थ व सांखिकी संचालनालयामार्फत 8 टक्के प्रगणकांचे व्दितीयस्तर पर्यवेक्षण केले जाईल.
          जिल्हाधिकारी श्री. देसाई यावेळी म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्था, महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्याशी संपर्क साधून मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे. राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, संख्याशास्त्र विषयाचे विद्यार्थी, संगणकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी यांचा या कामासाठी समन्वयाने उपयोग करून घ्या. स्थानिकांना  प्रगणक म्हणून संधी द्यावी जेणेकरून हे काम योग्य रीतीने पूर्ण होईल,असेही ते म्हणाले.
00000