इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, २० जुलै, २०२३

वसंतराव नाईक महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा - जिल्हा व्यवस्थापक एस. आर. बडगुजर

 


कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील व्यक्तींना सवलतीच्या व विना व्याजदराने अर्थसहाय्य करुन त्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी वसंतराव नाईक वि.जा. व भ.ज. महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. इच्छुकांनी महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन वसंतराव नाईक विमुक्त जाती, भटक्या जमाती विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. आर. बडगुजर यांनी केले आहे.

महामंडळामार्फत सुरु असणाऱ्या योजना

बीज भांडवल योजना -प्रकल्प मर्यादा ५ लाखापर्यंत,  वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना - प्रकल्प मर्यादा-१० लाखापर्यंत,  गटकर्ज व्याज परतावा योजना - प्रकल्प मर्यादा ५० लाखापर्यंत व  थेट कर्ज (बिनव्याजी) योजना प्रकल्प मर्यादा १ लाखापर्यंत आहे.

अधिक माहितीसाठी सामाजिक न्याय भवन, तिसरा मजला, कावळा नाका, कोल्हापूर येथे व दूरध्वनी क्र. ०२३१-२६६२३१३ वर संपर्क साधावा.

00000

मंगळवार, ४ जुलै, २०२३

जिल्ह्याला सन 2023-24साठी 20 हजार 750 कोटींच्या वार्षिक पतपुरवठ्याचे उद्दिष्ट

 




 

2022-23 मध्ये 161 टक्के उद्दिष्टपूर्ती

 

योग्य नियोजन करुन उद्दिष्टपूर्ती करा

शासकीय योजनांतर्गत प्राप्त कर्ज प्रकरणे प्रलंबित ठेवू नका-

 जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या सूचना

 

कोल्हापूर दि.4 (जिमाका) : कोल्हापूर जिल्ह्याला सन 2023-24 साठी 20 हजार 750 कोटींच्या पतपुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले असल्याची माहिती देवून बँकांनी योग्य नियोजन करुन उद्दिष्टपूर्ती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या. कृषी क्षेत्रासाठी ५४०० कोटी रुपयांचे तसेच सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगासाठी ५३४५ कोटी रुपये तर पीक कर्जासाठी ३२९८ कोटी रुपयांचे उद्दिष्ट जिल्ह्याला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

      जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, बॅंक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक राजीव कुमार सिंग, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश गोडसे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक आशुतोष जाधव, जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे बी. पी. सावंत, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील, सीडबीचे सहाय्यक महाप्रबंधक राज कुमार सिंह तसेच विविध विभागांचे अधिकारी व बँकांचे व्यवस्थापक, प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी वार्षिक पत पुरवठा आराखडा पुस्तिकेचे तसेच आरसेटीच्या वार्षिक कृती आराखडा पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मागील वर्षी विविध शासकीय योजनांमध्ये उत्कृष्ट काम केलेल्या बँकांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, लाभार्थ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यात पीएम स्व-निधी योजना महत्वपूर्ण आहे. पीएम स्वनिधी, पीक कर्ज योजनेसह अन्य शासकीय योजनांतर्गत बँकांकडे प्राप्त कर्ज प्रकरणे वेळेत निकाली काढावीत. कोणत्याही परिस्थितीत लाभार्थ्यांची कर्ज प्रकरणे प्रलंबित ठेवू नका, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, शासनाच्या आणि महामंडळांच्या योजनांचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांना मिळवून द्यावा. यासाठी बँकांनी वार्षिक पतपुरवठा आराखड्याबरोबरच शासकीय व महामंडळांच्या योजनांची उद्दिष्टपूर्ती होण्यासाठी नियोजन करावे. तसेच कृषी व तत्सम क्षेत्र, लघु उद्योग क्षेत्र, प्राथमिक अप्राथमिक क्षेत्राची उद्दिष्टपूर्ती करावी. शासकीय योजनांच्या कर्ज प्रकरणांबाबत बँकर्समध्ये जागृती होण्यासाठी जिल्ह्यातील बँकांचे शाखा व्यवस्थापक व कर्ज वाटप अधिकाऱ्यांसाठी तालुकानिहाय कार्यशाळा घ्याव्यात. प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया योजनांमध्ये लाभार्थ्यांना भरघोस लाभ देण्यात येतो. त्याअंतर्गत जास्तीत जास्त प्रकरणे येण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा. तसेच याविषयी व्यापक जनजागृती करुन प्रस्ताव मंजूर करावेत, अशा सूचना त्यांनी केल्या. पीक कर्जाचे खरिपासहित वार्षिक उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करावे, असेही त्यांनी सांगितले.

     यावेळी ऑनलाइन ७/१२, खरीप पीक कर्ज उद्दिष्टपूर्ती, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासह विविध महामंडळांच्या योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, कृषी पायाभूत विकास निधी आदी विषयांचा आढावा जिल्हाधिकारी श्री.रेखावार यांनी घेतला.

  कोल्हापूर जिल्ह्यासाठी सन 2022-23 साठी 17 हजार 980 कोटी रुपयांचे वार्षिक पतपुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते, यात 28 हजार 956 कोटींची (161 टक्के) उद्दिष्टपूर्ती मार्च 2023 अखेर झाली आहे, याबद्दल सर्व बँकांच्या कामाचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कौतुक केले.

   जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, बँकांनी शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळवून द्यावा. बँका आणि महामंडळानी समन्वय ठेवून लाभार्थ्यांना लाभ द्यावा, असे त्यांनी सांगितले.

     जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश गोडसे यांनी जिल्हा वार्षिक पतपुरवठा आराखड्याच्या मार्च 2023 अखेरच्या प्रगती अहवालाची माहिती दिली. जिल्ह्यात सुरु असलेल्या जनसुरक्षा मोहीमेची माहिती देखील श्री. गोडसे यांनी दिली.

 यावेळी कृषी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, विविध महामंडळांचे जिल्हा समन्वयक, आरसेटी आदी विभागांसह बँक व्यवस्थापकांनी दिलेले उद्दिष्ट व उद्दिष्टपूर्ती याबाबत माहिती दिली.

      **