इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 


 

       कोल्हापूर, दि. 28 (जिमाका) : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सन 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षांच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी उद्योजकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.

योजनेंतंर्गत वैयक्तिक लाभार्थी व गट लाभार्थी जसे शेतकरी उत्पादक गट/ संस्था/ कंपनी / स्वयंसहायता गट व उत्पादक सहकारी संस्था यांना लाभ देय आहे. ही योजना एक जिल्हा एक उत्पादन यावर आधारित असून जिल्ह्याकरिता ऊस उत्पादन निवडण्यात आले आहे. योजनेतून शेतीमालाचे मूल्यवर्धन, पुरवठा साखळींशी जोडणी व त्याद्वारे संबंधितांचे जीवनमान उंचावले जाणार आहे.

योजना बँक कर्जाशी निगडीत असून वैयक्तिक लाभार्थ्यांना भांडवली गुंतवणुकीकरिता पात्र प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के व कमाल १० लाख मर्यादित व गट लाभार्थ्यांना सामाईक पायाभूत सुविधा व भांडवली गुंतवणूकीसाठी पात्र प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के अनुदान देय आहे. मार्केटींग व ब्रँडींगकरिता गट लाभार्थ्यांना पात्र प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के अनुदान देय आहे. लाभार्थी इच्छूक लाभार्थी चालू स्थितीतील अन्न प्रक्रिया उद्योगातील कुशल कामगार, एसएचजी, एफपीओ, एफपीसी व कॉ-ऑपरेटीव्ह मधील सदस्यांना मोफत जिल्हास्तरीय प्रशिक्षण दिले जाणार आहे.

आत्मनिर्भर भारत अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेतंर्गत शेतकरी उद्योजकांनी https://pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावयाची आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी / तालुका कृषि अधिकारी / उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधावा.

 

000000

सिध्दनेर्ली पूरग्रस्तांना स्वतंत्र मालकीपत्र द्या - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

 






       कोल्हापूर, दि. 28 (जिमाका) : सिध्दनेर्ली पूरग्रस्तांना स्वतंत्र मालकीपत्र द्या, अशा सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या.

       शासकीय विश्रामगृह येथे आज सिध्दनेर्ली येथील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या जागे संदर्भात बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रेखावार, प्रांताधिकारी सुशांत बनसोडे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुदाम जाधव, कागल तहसिलदार शिल्पा ठोकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव तसेच सिद्धीनेर्ली चे पूरग्रस्त उपस्थित होते.

          जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, पूरगस्तांना देण्यात आलेल्या या 38 आर जागेचे रेखांकन करुन घ्या. या जागेच्या स्वतंत्र मालकीपत्राचे दस्त करुन घ्यावेत, अशा सूचनाही श्री. रेखावार यांनी दिल्या.

          सन 1989 च्या महापूरात कागल तालुक्यातील मौजे सिध्दनेर्ली गावातील 22 कुटूंबांच्या घरात पाणी आल्यामुळे या कुटूंबांना गायरान जमिनीवर सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले होते. या 22 कुटूंबांना शासनाच्यावतीने मौजे सिध्दनेर्ली येथील गट क्रमांक 77 मधील 38 आर (गुंठे) जागा सप्टेंबर 1989 ला वाटप करण्यात आली व त्यांच्या नावे एकत्रित सातबारा पत्रकावर नोंद करण्यात आली. या जागेची सिटी सर्व्हेमध्ये नोंद होऊन प्रॉपर्टी कार्ड (मालमत्ता पत्रक) मिळावे, अशी मागणी या 22 कुटूंबांनी केली आहे.

पूरग्रस्तांच्या मागण्यांबाबत सरपंच दत्ता पाटील, कृष्णात मेटील, शाहीर सदाशिव निकम यांनी माहिती दिली.

000000

 

रविवार, २७ फेब्रुवारी, २०२२

जिल्ह्यातील 0 ते 5 वर्ष वयोगटातील एकही बालक पल्स पोलिओ मोहिमेपासून वंचित राहू नये याची दक्षता घ्यावी -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

 






 

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

 

       कोल्हापूर, दि. 27 (जिमाका) : जिल्ह्यातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला लस पाजण्यात यावी, एकही बालक पल्स पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेंतर्गत जिल्हास्तरीय लसीकरण मोहिमेचा शुभारंभ छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) येथे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते बालकांना पोलिओचा डोस पाजून करण्यात आला. यावेळी उपस्थित आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी सूचना केल्या.

प्रारंभी जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच याठिकाणी उपस्थित बालकांच्या मातांच्या हस्ते फित कापून पोलिओ लसीकरण मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते बालकास पल्स पोलिओचा डोस पाजण्यात आला. आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. दुर्गादास पांडे, अधिष्ठाता डॉ. दीक्षित, प्रभारी जिल्हा शिल्यचिकित्सक डॉ. विलास देखमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे  यांच्या हस्तेही बालकांना पल्स पोलिओचा डोस पाजण्यात आला.

जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, जिल्ह्यात पोलिओ मोहिमेंतर्गत 57 सत्रे राबविण्यात आली आहेत. जिल्ह्यात पोलिओचा शेवटचा रुग्ण 23 ऑगस्ट 1999 मध्ये शाहूवाडी तालुक्यातील करंजोशी गावात आढळला होता. सलग तीन वर्षे पोलिओ रुग्ण न आढळल्यामुळे मार्च 2014 मध्ये भारताला पोलिओ निर्मुलनाचे प्रमाणपत्र मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात असणाऱ्या वीटभट्ट्या, कामगार यांची माहिती घेऊन जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, जिल्ह्यातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांसोबत ऊसतोड, वीटभट्टीवर काम करणारे तसेच स्थलांतरित कामगारांची बालके लसीकरणापासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.  लसीकरण बूथ बरोबरच गृहभेटीद्वारेही बालकांना डोस देण्यात येणार असून आपल्या परिसरातील प्रत्येक बालकाला डोस मिळाल्याची खात्री सर्वांनी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. फारुक देसाई,  सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमेश कदम यांच्यासह छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) मधील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी उपस्थित होते.

            पल्स पोलिओ मोहिम नियोजन-

जिल्ह्यात 1 जानेवारी 2022 च्या सर्वेक्षित लोकसंख्या विचारात घेवून पल्स पोलिओ लसीकरण केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत. ग्रामीण भागात 0 ते 5 वयोटागतील 2 लाख 14 हजार 7 बालके आहे. 1 हजार 699 लसीकरण केंद्रे निश्चित केली असून 4 हजार 434 कर्मचाऱ्यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.नगरपालिका क्षेत्रामध्ये 45 हजार 948 बालके आहे. 228 लसीकरण केंद्र निश्चित केली असून 644 कर्मचाऱ्यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. महानगरपालिका क्षेत्रामध्ये  47 हजार 490 बालके आहेत. 442 लसीकरण केंद्रे असून 970 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहेत. असे एकूण‍ जिल्ह्यात 3 लाख 07 हजार 445 बालके आहेत. 2 हजार 369 लसीकरण केंद्रे निश्चित केली असून 6 हजार 48 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.

घरभेटी कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागामध्ये 6 लाख 48 हजार 709 घरांची संख्या असून 2 हजार 681 टीम तयार करण्यात आली आहे. 540 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.  नगरपालिका क्षेत्रामध्ये 1 लाख 10 हजार 982 घरांची संख्या असून 166 टीम तयार करण्यात आली आहे. 34 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. महानगरपालिका क्षेत्रामध्ये 1 लाख 71 हजार 491 घरांची संख्या असून 245 टीम तयार करण्यात आल्या आहेत. 51 पर्यवेक्षकांची निुयक्ती करण्यात आली आहे. ट्रान्झिट टीम 363 तर मोबाईल टीम 654 तयार करण्यात आल्या असून आहेत.

00000

शुक्रवार, २५ फेब्रुवारी, २०२२

सारथीच्या योजनांच्या व्यापक प्रसिद्धीस समाज माध्यांचाही वापर करा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सूचना

 






 

कोल्हापूर, दि. 25 (जिमाका): सारथीमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची व्यापक जनजागृती करण्यासाठी  सारथीने समाज माध्यमांचाही  वापर करावा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज येथे दिल्या.

सारथी योजनेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना व सुरु असलेल्या कामांबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज आढावा घेतला. यावेळी सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, निबंधक अशोक पाटील यांच्यासह वसंतराव मुळीक, ॲड. गुलाबराव घोरपडे, इंद्रजीत सावंत, हर्षल सुर्वे, अवधुत पाटील  उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, सारथीमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना समाज माध्यामांद्वारे पोहचविल्यास त्यास व्यापक प्रसिद्धी मिळेल व त्यांचा लाभ विद्यार्थींना, संबंधित लाभार्थीस घेता येईल.  सारथीच्या योजनांची माहिती पत्रके तयार करुन सारथीने द्यावीत. ही माहिती पत्रके शिक्षण विभागामार्फत शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वितरीत केली जातील.

कोल्हापूर येथे सुरु केलेल्या सारथीच्या उपकेंद्राचे काम गतीने व्हावे, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, सारथीच्या योजनांची माहिती देण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. या केंद्रात आठवड्यातून किमान दोन दिवस पुणे येथील अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. कोल्हापूर येथील सारथीच्या उपकेंद्राकडे येणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी दिला जाईल. यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक बाबींची पूर्तता करुन प्रस्ताव सादर करावा.

सारथीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. काकडे म्हणाले, सारथीमार्फत  समाज विकासाच्या  योजना  राबवण्यिासाठी आराखडा तयार करण्यात येणार असून यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे. आराखड्यामध्ये कोणत्या योजना असाव्यात याबाबत तज्ज्ञांकडून माहिती घेण्यात येत आहे.  मराठा समाजाने याबाबत योजना सुचविल्यास त्याचे स्वागतच केले जाईल.  कोल्हापूर येथील केंद्रात सारथीच्या योजनांची माहिती देण्यासाठी पुणे येथील अधिकारी गुरुवार व शुक्रवार या दोन दिवशी उपस्थित राहतील, असे त्यांनी सांगितले. सारथीमार्फत युपीएससी, एमपीएससी परीक्षेसाठी विद्यार्थ्याना मार्गदर्शन, पीएचडी करणाऱ्यांसाठी फेलोशीफ याबरोबच सन 2022 मध्ये होणाऱ्या युपीएससी परीक्षेसाठी विद्यार्थी निवड प्रक्रिया सुरु करण्यात आल्याचे सांगून सारथीमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना व उपक्रमांची त्यांनी माहिती  दिली.

कोल्हापूर येथील सारथीच्या उपकेंद्रामार्फत गतीने काम व्हावे, सारथीमार्फत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्यावरील ग्रंथ प्रकाशित करावेत, सारथीच्या योजनांची प्रसिद्धी करावी, अशी अपेक्षा उपस्थित पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली. 

 

00000

 

राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

  

 

 


              

       कोल्हापूर, दि. 25 (जिमाका): भारत निवडणूक आयोगाने दि. 25 जानेवारी  ते 15 मार्च 2022 या कालावधीमध्ये राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेचे आयोजन केले आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये व सरकारी विभागात राष्ट्रीय मतदार जागृतीसाठी प्रश्नमंजुषाव्हीडिओचित्रण, भित्तीचित्र (पोष्टर)गाण्याची स्पर्धाघोषवाक्य स्पर्धा अशा पाच प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले आहे. स्पर्धा सर्व वयोगटांसाठी खुल्या असून इच्छुकांनी स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावाअसे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी केले आहे.

         स्पर्धेमध्ये विविध श्रेणी आणि विविध पारितोषिके असून स्पर्धेची सविस्तर माहिती  http://ecisveep.nic.in/contest/  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

00000

सधन कुक्कुट विकास गट लाभासाठी अर्ज सादर करावेत

 


 

कोल्हापूर, दि. 25 (जिमाका): जिल्ह्यात सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्वावर सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना करणे ही योजना राबविण्यात येत आहे. ही योजना करवीर तालुका वगळता उर्वरित 11 तालुक्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. 2021-22 या वर्षात या योजनेच्या लाभासाठी कागल, हातकणंगले व शिरोळ तालुक्यातून इच्छुकांकडून अर्जाची मागणी तसेच गतवर्षी उद्दिष्ट पूर्ण करू न शकलेल्या पन्हाळा व चंदगड तालुक्यातूनही अर्ज मागणी करण्यात आली आहे. प्राप्त अर्जातून निवड प्रक्रिया राबवून योजनेचा लाभ दिला जाणार आहे. इच्छुकांनी 11 मार्चपर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वाय.ए.पठाण यांनी केले आहे.

योजनेचे लाभार्थी निवडीचे निकष / अटी व शर्ती-

सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व जनजाती क्षेत्र उपयोजनेतील जे लाभार्थी सध्यस्थितीत कुक्कुटपालन व्यवसाय करीत आहेत, ज्या लाभार्थींकडे लघु अंडी उबवणूक यंत्र आहे, अशा लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत प्राधान्य देण्यात येईल. कुक्कुट व्यवसायात स्वयंरोजगार निर्मितीची आवड असणारे नवउद्योजकही अर्ज करु शकतात. प्रकल्प कार्यान्वित करण्याकरिता आवश्यक असणारी साधने, सुविधा व व्यवहार्यता पडताळून लाभार्थी निवडण्यात येतील.

        मार्गदर्शक सूचना-

योजनेंतर्गत एकूण प्रकल्पाची किंमत 10 लाख 27 हजार 500 रु. पैकी सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना शासनाचे 50 टक्के अनुदान म्हणजेच 5  लाख 13 हजार 750 रु. देय असून उर्वरित 50 टक्के रक्कम लाभार्थी स्वतःचा हिस्सा किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊन उभा करु शकेल.

लाभार्थी / अर्जदाराची वयोमर्यादा 18/60 वर्ष राहील.

लाभार्थी निवडताना 30 टक्के महिला लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येईल. सन 2018-19 पासून टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणाऱ्या तरतुदीस अधीन राहून योजना राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 11 तालुक्यांसाठी प्रति तालुका एक प्रमाणे निवड करण्यात येणार आहे.

सन 2021-22 वर्षामध्ये तिसऱ्या टण्यातील 3 तालुक्यांकरिता (हातकणंगले, शिरोळ, कागल) व चंदगड, पन्हाळा तालुक्यातील लाभार्थी निवडीसाठी पात्र लाभार्थीकडून दि. 25 फेब्रुवारी ते 11 मार्चपर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज मागविण्यात येत आहेत.

लाभार्थीकडे 2500 चौ.फू. जागा स्वतःच्या मालकीची असावी. त्या ठिकाणी दळणवळणाची, पाण्याची व विद्युतीकरणाची सुविधा उपलब्ध असावी.

प्रकल्प कार्यान्वित करताना शासनाचे अनुदान एकदाच देय असून, त्यानंतर प्रकल्प सुरळितरित्या चालू ठेवून पुढील खर्च संपूर्णपणे लाभार्थीने करावयाचा आहे.

या योजनेंतर्गत प्रकल्प उभारणीसाठी लाभार्थींनी बँकेकडून कर्ज घेतल्यास कर्जाची परतफेड स्वतः लाभार्थीने करावयाची असून कर्ज परतफेडीची जबाबदारी शासनाची राहणार नाही.       

निवडलेल्या लाभार्थ्यांनी या योजनेअंतर्गत सधन कुक्कुट गटाच्या कामाचे व कुक्कुटपालनाचे पाच दिवशीय प्रशिक्षण नजिकच्या सधन कुक्कुट विकास प्रकल्पामार्फत घेणे बंधनकारक राहील.

पक्षीगृहाचा उपयोग कुक्कुटपालनासाठीच करणे बंधनकारक राहील.

कुक्कुट पक्षीगृहाच्या बांधकामासाठी प्रकल्प खर्चापेक्षा जास्त खर्च आल्यास तो लाभार्थ्यांनी स्वतः करावयाचा आहे.

लाभार्थीस हा व्यवसाय किमान तीन वर्ष करणे तसेच शासनास हमीपत्र देणे बंधनकारक राहील.

लाभार्थीस पक्षीगृह बांधकाम, लघु अंडी उबवणूक यंत्र एकदिवशीय पिलांची 20 आठवडे वयाचे अंड्यावरील पक्षी, उबवणुकीची अंडी यांची खरेदी तसेच इतर पायाभूत सुविधा शासनाच्या निकषाप्रमाणे करणे बंधनकारक राहील.

सर्व बाबींची व कागदपत्रांची पूर्तता करुन तसेच पडताळणी झाल्यानंतरच शासन निर्णयात नमूद संबंधित बाबींच्या देय अनुदानाची रक्कम जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्यामार्फत लाभार्थींच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येईल.

लाभार्थींनी विहित नमुन्यातील अर्ज संबंधित तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती यांचेकडून प्राप्त करुन घ्यावेत. पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांनी प्राप्त झालेले अर्ज जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यामार्फत लाभार्थी निवडीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्याकडे सादर करावेत.

फोटो आयडी / आधार कार्ड / ओळखपत्राची सत्यप्रत / बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, लाभधारकाकडील मालमत्ता 7/12 व 8-अ उतारा आणि ग्रामपंचायत नमुना नं. ४, कुक्कुट पालन व्यवसाय विषयक प्रशिक्षण घेतलेल्या प्रमाणपत्रांची छायांकित सत्यप्रत, अनु. जाती/जमातीच्या अर्जदाराकरिता जातीच्या दाखल्याची सत्यप्रत इ. कागदपत्रे अर्जासोबत जोडावयाची आहेत.

योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त तसेच तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा.

000000

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


खेळाडूंनी खिलाडूवृत्ती जोपासावी -ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

 






कोल्हापूर, दि. 25 (जिमाका): विविध क्रीडा स्पर्धांतून खेळाडूंच्या मानसिकतेचा कस लागतो. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर खेळाचे महत्व अनन्य साधारण आहे. खेळाडूंनी जय-पराजयाचा विचार न करता खिलाडूवृत्ती जोपासावी, असे आवाहन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

       कसबा बावडा येथील पोलीस क्रीडांगणावर जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धेस मुश्रीफ यांच्या हस्ते आज प्रारंभ झाला. अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील उपस्थित होते.

          मुश्रीफ पुढे म्हणाले, कोरोना स्थितीमुळे गेल्या दोन वर्षात या स्पर्धा भरविता आल्या नाहीत. मात्र यंदा या स्पर्धा होत आहेत याचा आपणाला मनस्वी आनंद होत आहे. तर पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, क्रीडा स्पर्धेव्दारे खेळाडूंच्या नेतृत्वगुणाला निश्चत वाव मिळतो. या स्पर्धेतून अनेक खेळाडू स्वत:ला सिध्द करुन त्यांच्यातील नैपुण्य दाखवतील, असे सांगत कोरोना स्थितीत जिल्हा परिषदेने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव केला.

प्रारंभी मंत्री महोदय श्री. मुश्रीफ आणि श्री. पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन, क्रीडाज्योत आणि ध्वजारोहण करण्यात आले.

          प्रास्ताविकामध्ये या क्रीडा स्पर्धा आयोजनामागील भूमिका जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील यांनी मांडली तर या स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व  पंचायत समित्यांनी आपला सहभाग नोंदविल्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सांगितले.

          जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या खेळाडूंनी संचलनाद्वारे विविध थोर महापुरुषांची पात्रे साकारत उपस्थितांची वाहवा मिळवली. दि. 25, 26 रोजी क्रीडा स्पर्धा संपन्न होणार असून 28 फेब्रुवारी रोजी या स्पर्धेचा समारोप होणार आहे.

           यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयंत शिंपी, सभापती श्रीमती रसिका पाटील, वंदना जाधव, शिवानी भोसले, कोमल मिसाळ, उमेश आपटे, युवराज पाटील, अति. उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, सामान्य प्रशासनच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. रवि शिवदास यांच्यासह जिल्हा परिषदेचे इतर सदस्य, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000

गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२

27 फेब्रुवारीची पल्स पोलिओ लसीकरण मोहिम यशस्वी करूया - जिल्हाधिकारी श्री. राहुल रेखावार.

 


 

कोल्हापूर, दि. 24 (जिमाका) : पोलिओ निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शून्य ते पाच वयोगटातील सर्व बालकांना रविवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी पोलिओ डोस देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व बालकांना पोलिओ डोस मिळाल्याची खात्री करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्ती यांच्यामार्फत घरोघरी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. घरोघरी भेट देणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सर्वतोपरी सहकार्य करावे व पल्स पोलिओ लसीकरण मोहिम शंभर टक्के यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतामध्ये १३ फेब्रुवारी २०११ नंतर एकही पोलिओ रुग्ण आढळून आलेला नसला तरी भारता शेजारील देशांमध्ये २०२१ या वर्षामध्ये पोलिओचे रुग्ण आढळून आले आहेत. पोलिओ हा भारतातून उच्चाटन झाला असला तरी जगातून अद्यापी नष्ट झालेला नाही. पर्यटन व जागतिकीकरणामुळे पोलिओ विषाणू पसरण्याची शक्यता असल्यामुळे ० - ५ वयोगटातील बालकांसाठी पोलिओचे दोन थेंब महत्त्वाचे आहेत.

देशामध्ये कोविड -19 च्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून दि. २७ फेब्रुवारी रोजी होणारी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना करून राबविण्यात येत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यामध्ये कोविड -19 विषयक सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करून यावर्षी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. याबाबतच्या सर्वतोपरी मार्गदर्शक सूचना सर्व संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत, जसे की दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर राखणे, मास्क व ग्लोव्हज वापर करणे व सॅनिटायझर वापरणे या त्रिसूत्रीनुसार मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

 या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात ग्रामीण, शहरी तसेच महानगरपालिका विभागांतर्गत एकूण २ हजार ४२३ बुथची निर्मिती करण्यात आलेली असून त्या अंतर्गत एकूण ६ हजार ९९९ कर्मचारी नियुक्त केलेले आहेत. जिल्ह्यासाठी एकूण ३ लाख ९० हजार पोलिओ डोस प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यामध्ये शुन्य ते पाच वयोगटातील अंदाजीत ३ लाख ८ हजार ३६० बालकांना या दिवशी पोलिओ डोस देण्यात येणार आहे. बाळ नुकतेच जन्मलेले असले तरी पोलिओ डोस द्यावयाचा आहे. जिल्ह्यातील सर्व बाजारहाट गर्दीची ठिकाणे, धार्मिक स्थळे, बस स्थानके, टोल नाके व रेल्वे स्टेशन्स या ठिकाणी सुद्धा ट्रान्झीट टीम व दुर्गम भागातील वाड्यावस्त्यावरील भटक्या जमाती, ऊस तोडणी मजूर यांच्या मुलांना मोबाईल टीमद्वारे पोलिओ डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

 00 0 0 0 0

 

प्रवर अधीक्षक डाकघर कार्यालयात डाक अदालतीचे आयोजन

 


        कोल्हापूर, दि. 24 (जिमाका) : प्रवर अधीक्षक डाकघर विभागाच्यावतीने  दि. 4 मार्च रोजी सकाळी 11 वाजता प्रवर अधीक्षक डाकघर, कोल्हापूर येथे डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कोल्हापूर डाक विभागाचे प्रवर अधीक्षक रुपेश सोनावले यांनी दिली आहे.

कोल्हापूर डाकघर विभागाशी संबंधित पोस्टाच्या सेवे विषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालत मध्ये दखल घेतली जाईल.  विशेषत: टपाल, वस्तु /मनीऑर्डर/ बचत खाते / प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा.  उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नांव हुद्दा इत्यादी.

 संबंधितानी डाक सेवे बाबतची तक्रार  प्रवर अधीक्षक डाकघर रुपेश सोनावले, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर ४१६००३ यांच्या नावे दोन प्रती सह दिनांक 28 फेब्रुवारी पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची या डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाणार नाही.

 00 0 0 0

पणजी येथे डाक अदालत

 


कोल्हापूर दि. 24 (जिमाका) :  गोवा रिजन पणजी कार्यालयामध्ये दि. 10 मार्च रोजी सकाळी 12 वा. 51 व्या डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कोल्हापूर डाक विभागाचे प्रवर अधीक्षक रुपेश सोनावले यांनी दिली आहे.

गोवा रिजनशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल वस्तू/ मनीऑर्डर/ बचत खाते/ प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव, हुद्दा इ.

संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार डाक अदालतीचे सेक्रेटरी रमेश प्रभू सहायक निदेशक आणि सचिव, डाक अदालत, पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, गोवा रिजन पणजी 403001 यांच्या नावे दोन प्रतींसह दि. 1 मार्च पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहचेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची या डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाणार नाही.

00000

मंगळवार, २२ फेब्रुवारी, २०२२

खाद्यतेल व तेलबियांच्या साठवणुकीवर निर्बंध लागू

 


 

कोल्हापूर, दि. 22 (जिमाका): राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर खाद्यतेलाच्या किंमतीमध्ये वाढ झाली असल्यामुळे सर्व खाद्यतेल व तेलबियांच्या साठवणुकीवर 30 जून 2022 पर्यंत साठा निर्बंध लागू करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सह सचिव चारुशीला तांबेकर यांनी दिली आहे.

खाद्यतेल व खाद्य तेलबियांच्या साठवणुकीवर साठा निर्बंधाची मर्यादा खालीलप्रमाणे-

       खाद्यतेल साठा-किरकोळ 30 क्विंटल, घाऊक- 500 क्विंटल, मोठे ग्राहक 30 क्विंटल पासून 1 हजार क्विंटल -90 दिवसांची साठा क्षमता.

खाद्य तेलबिया- किरकोळ 100 क्विंटल, घाऊक- 2 हजार क्विंटल, 90 दिवसांचे खाद्यतेलाचे उत्पादन.

केंद्र शासनाच्या आदेशानुसार उपरोक्त साठा निर्बंधांच्या मर्यादेमधून वगळण्यात आलेल्या बाबी खालीलप्रमाणे आहेत.

निर्यातक, जो की रिफायनर, मिलर, एक्स्ट्रॅक्टर, घाऊक व्यापारी किंवा किरकोळ व्यापारी किंवा डिलर आहे, ज्याच्याकडे विदेश व्यापार महानिदेशालय यांच्याकडून देण्यात आलेला आयातक निर्यातक कोड नंबर आहे, जर असा निर्यातक दर्शवू शकला की त्याच्याकडे उपलब्ध असणारा खाद्यतेल व तेलबियांचा संपूर्ण साठा किंवा त्या साठ्याचा काही भाग निर्यातीसाठी असून सदर साठा निर्यातीसंबंधीच्या साठा निर्बंधाच्या मर्यादेत आहे.

आयातक, जो की रिफायनर, मिलर, एक्स्ट्रॅक्टर, घाऊक व्यापारी किंवा किरकोळ व्यापारी किंवा डिलर आहे. जर असा आयातक दर्शवू शकला की त्याच्याकडे उपलब्ध असणा-या खाद्यतेल व तेलबियांच्या साठ्याचा काही भाग आयातीतून प्राप्त झाला आहे.

जर संबंधित कायदेशीर घटकांकडे असणारा सर्व खाद्यतेल व तेलबियांचा साठा निर्बंधांच्या ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असल्यास संबंधितांनी त्याबाबतचा तपशिल https://evegoils.nic.in या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर करावयाचा आहे. संबंधितांनी त्यांच्याकडे उपलब्ध असणारा साठा या साठा निर्बंधाच्या आदेशाच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत ठरवून दिलेल्या मर्यादेपर्यंत कमी करणे आवश्यक असेल.

00000