इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, २९ जून, २०२१

माविममार्फत शाहू महाराजांची जयंती साजरी

 



         कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय): महिला आर्थिक विकास महामंडळ कोल्हापूर अंतर्गत उन्नती लोकसंचलित साधन केंद्रामार्फत राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी  करण्यात आली.

प्रारंभी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे फोटो पूजन दीप प्रज्वलाने करण्यात येवून मान्यवरांचे स्वागत रण्यात आले.

कार्यक्रमास पेठवडगाव पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती सूर्यवंशी, सहकारी प्रियांका पाटील, जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे, सहाय्यक सनियंत्रण अधिकारी उमेश लिंगनूरकर, सी. एम. आर. सी. अध्यक्षा तनुजा मुल्लांनी, सचिव सुलोचना पाटील, सी एम आर सी व्यवस्थापक अमृता पाटील, क्षेत्रीय समन्वयक गौरी उरूनकर, लेखापाल, सहयोगिनी व स्वंय सहाय्यता बचत गटातील महिला उपस्थित होत्या .

   माविम कोल्हापूर जिल्ह्यातील 6 लोकसंचलित साधन केंद्रातील 68 गावात नगरपरिषद कार्यक्षेत्रात राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी उरूनकर यांनी तर आभार प्रदर्शन केदार लंगरकर यांनी केले.

000000

गडहिंग्लज येथे काल 3.9 मिमी पाऊस

 


          कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात  गडहिंग्लज तालुक्यात सर्वाधिक 3.9  मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

          जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.

हातकणंगले 1.5 मिमी,  शिरोळ-0.1 मिमी, पन्हाळा-  निरंक, शाहूवाडी- 0.1 मिमी, राधानगरी 0.1 मिमी, गगनबावडा-2.9 मिमी, करवीर- 1.1 मिमी, कागल- 0.1 मिमी, गडहिंग्लज- 3.9 मिमी, भुदरगड- 0.1 मिमी, आजरा 2.8 मिमी,  चंदगड 0.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

00000

2 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1614 क्युसेक विसर्ग

 


          कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 72.66 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1100 तर सिंचन विमोचकातून 514 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील- रुई व इचलकरंजी असे 2 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 43.53 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 89.933  इतका पाणीसाठा आहे.

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 50.17 दलघमी, वारणा 540.07 दलघमी, दूधगंगा 278.30 दलघमी, कासारी 30.46 दलघमी, कडवी 31.67 दलघमी, कुंभी 39.12 दलघमी, पाटगाव 48.73 दलघमी, चिकोत्रा 22.57 दलघमी, चित्री 32.23 दलघमी, जंगमहट्टी 13.98 दलघमी, घटप्रभा  42.73 दलघमी, जांबरे 23.23 दलघमी, आंबेआहोळ 16.12, कोदे (ल.पा) पुर्ण क्षमतेने भरला आहे.

          तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 14.7 फूट, सुर्वे 17 फूट, रुई 43 फूट, इचलकरंजी 40 तेरवाड 38.3 फूट, शिरोळ 29.3 फूट, नृसिंहवाडी 25.9 फूट, राजापूर 16 फूट तर नजीकच्या सांगली 8.9 फूट व अंकली 8.6  फूट अशी आहे.

00000

नोंदीत घरेलू कामगारांची माहिती अद्ययावत करण्याचे आवाहन

 

 

     कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय) कोल्हापूर कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व नोंदीत घरेलू कामगार व कामगार संघटना यांनी  त्यांचे बँक खाते, आधार कार्ड व इतर तपशील महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळाने उपलब्ध करुन दिलेल्या https://public.mlwb.in/public या लिंक द्वारे लवकरात लवकर अद्ययावत करावे, जेणेकरुन या कामगारांना शासनाने जाहीर केलेले अनुदान त्वरीत त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करता येईल.  कामगारांची माहिती अद्ययावत करताना काही अडचण निर्माण झाल्यास सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, शाहुपूरी, व्यापारी पेठ, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासन कामगार विभागामार्फत कोवीड-19 संसर्गाच्या अनुषंगाने राज्यातील कष्टकरी नोंदीत घरेलू कामगारांना आर्थिक मदत म्हणून 1500 रूपये इतके अनुदान देण्यात आले आहे.  त्यास अनुसरुन जिल्ह्यातील नोंदीत कामगारांच्या बँक खात्यामध्ये अनुदान वर्ग करण्यात आले आहे.  तथापि काही घरेलू कामगारांनी नोंदणीच्या वेळी त्यांची बँक खाते, आधार कार्ड, मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती दिली नसल्यामुळे तसेच काही बँकांचे विलीनकरण झाल्यामुळे हे अनुदान काही कामगारांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यास अडचण निर्माण होत आहे. 

000000

शनिवार, २६ जून, २०२१

जिल्हयातील 46 वसतिगृहांना लाभ - पालकमंत्री सतेज पाटील

 


 

कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय) : वसतीगृहांचे शहर अशी कोल्हापूर शहराची ओळख राजर्षी शाहू महाराजांनी निर्माण केली. त्यामुळे कोल्हापूरास वसतिगृहाची जननी असे संबोधिले जाते. समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्या अधिनस्त कोल्हापूर जिल्हयातील कार्यरत असणाऱ्या 46 वसतिगृहांसाठी सन 2021-22 जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत नाविण्यपूर्ण योजनेमधून विद्यार्थ्याकरीता निवासाची सोय होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

 26 जून हा दिवस राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्म दिन ‘सामाजिक न्यायदिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून श्री देवी इंदुमती बोर्डींग या वसतीगृहाच्या नवीन इमारतीचा अर्पण सोहळा श्रीमंत शाहू महाराज यांच्या शुभहस्ते व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

            यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे मागासवर्गीय कल्याणाबाबत उदात्त धोरण होते. असेच धोरण राज्य शासनाचे असून या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी  बंकबेड तसेच विद्यार्थ्याना ऑनलाईन शिक्षणासाठी प्रत्येक वसतिगृहांस 5 संगणक, 1 प्रिंटर व 1 स्मार्ट टिव्ही संच, वसतिगृहातील विद्यार्थ्यांना आंघोळीच्या गरम पाण्याची सोयीसाठी सोलर वॉटर हिटर सिस्टिम आदी सुविधा देण्यात येतील.  त्याचबरोबर वसतिगृहाचे कर्मचारी हे अनेक वर्षापासून मानधनावर काम करीत असून त्यांना नियमित वेतनश्रेणी लागू होण्याबाबत व वसतिगृहांना देण्यात येणाऱ्या विद्यार्थी परिपोषन अनुदानापोटी 1500 रुपयांची वाढ करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

वादाऐवजी संवादावर भर देणारा, समाजाचा चोहबाजुनी रक्षण करणारा व्यक्तीच खरा नेता-मुख्यमंत्री उध्दव ठाकरे दीन दुबळ्यांना ताकद देण्याच्या कामात कोणतीही अडचण येवू दिली जाणार नाही सारथी उपकेंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

 





 

            कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय) : संघर्ष करीत असताना संघर्ष कधी करायचा आणि संवाद कधी करायचा हे ज्याला कळते त्याचबरोबर जो वादा ऐवजी संवादावर भर देतो आणि समाजाचं चोहबाजुनी रक्षण करतो तोच खरा नेता होवू शकतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले.

            निमित्त होते .... राजर्षी शाहू महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर येथे सुरु करण्यात आलेल्या पहिल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव संस्थेच्या (सारथी) उपकेंद्राच्या उद्घाटनाचे...

            मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सारथीच्या या उपकेंद्राचे ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन केले यावेळी ते बोलत होते.

            याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील आदी प्रत्यक्ष उपस्थित होते तर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, मुख्य सचिव सिताराम कुंटे, अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रबर्ती हे ऑनलाईन पध्दतीने उपस्थित होते.  

            मुख्यमंत्री पुढे म्हणाले, शाहू जयंतीदिनी हे उपकेंद्र सुरु होत आहे याचा मनस्वी आनंद आहे. गेल्या काही दिवासापासून गाजत असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न खासदार संभाजीराजेने संयमाने हातळल्याबद्दल राजेंना धन्यवाद. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आपले सरकार कटिबध्द आहे. सरकार म्हणून जे जे करता येणे शक्य आहे ते सर्व करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. आरक्षणाच्या अनुषंगाने कायद्याची लढाई शासनाने सोडली नसल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, दिन दुबळ्यांना ताकद देण्याचे काम महाविकास आघाडी शासन करीत आहे.

            सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगितले की, मराठा समाजाला न्याय देण्याची शासनाची भुमिका असून समाजाच्या इतर मागण्याबाबतही सरकार संवेदनशील आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे. मराठा समाजाने आरक्षणाबाबत समजुतदारपणाची भुमिका घेतल्याबद्दल त्यांनी समाजाला धन्यवाद दिले. तर पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, मराठा समाजाला न्याय देण्याची सरकारची भुमिका असून सरकार या समाजाला न्याय देईल. येत्या सोमवारपासून येथील उपकेंद्र सुरु होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आल्याचेही ते म्हणाले.  

            तत्पुर्वी खासदार संभाजीराजेंनी राज्यातील पहिले उपकेंद्र कोल्हापूरात सुरु केल्याबद्दल सरकारचे आभार मानुन या उपकेंद्रसाठी शासनाने किमान 5 एकरापेक्षा अधिक जमीन द्यावी अशी मागणी केली तर अध्यक्षीय भाषणात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले, या उपकेंद्राच्या माध्यमातून समाजाला मार्गदर्शन मिळेल. शासनाने समाजाच्या इतर प्रश्नांबाबतही लवकरात लवकर निर्णय घेवून समाजाला न्याय देण्याचे कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

            राजाराम महाविद्यालयातील प्री आयएएस ट्रेनिंग सेंटरच्या परिसरातील कमवा आणि शिक्षा योजनेच्या इमारतीत हे उपकेंद्र सुरु होणार आहे. या उपकेंद्रामुळे विद्यार्थ्यांची, संशोधकांची, अभ्यासकांची चांगली सोय होणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर तर आभार सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी मानले.

 

000000

शाहू महाराज- डॉ बाबासाहेबांच्या उपस्थितीतील ऐतिहासिक "माणगाव परिषद पहा लघुपटातुन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

 







 

कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय): माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालय निर्मित "माणगाव परिषद-१९२०" या लघुपटाचे ऑनलाईन लोकार्पण सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. हा ऐतिहासिक ठेवा या लघुपटाच्या माध्यमातून समोर आणल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.

या ऑनलाईन लोकार्पण सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजित कदम, श्री श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, राज्य वित्त आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, ऊर्वरीत वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष योगेश जाधव, संभाजीराजे छत्रपती, खासदार संजय मंडलीक, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह जिल्ह्यातील विधीमंडळ सदस्य आदी ऑनलाईन सहभागी झाले होते.

लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थित १९२० साली झालेल्या परिषदेला १०१ वर्षपूर्ती निमित्ताने हा लघुपट प्रतिकात्मक स्वरुपात तयार केला आहे.

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी समिती बनविण्यात आली होती. ज्येष्ठ विचारवंत आणि इतिहास तज्ज्ञ डॉ.  जयसिंगराव पवार, ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता आणि संवादशास्त्र विभागप्रमुख डॉ. निशा मुडे, शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांचा या समितीत समावेश होता. पुण्याच्या रिडिफाईन कॉन्सेप्टस या संस्थेचे योगेश देशपांडे यांनी याची निर्मिती-दिग्दर्शन केले आहे तर या निर्मितीत प्रशांत सातपुते यांच्यासह जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही आपले योगदान दिले.

या लोकार्पण प्रसंगी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (प्रशासन / मा ) गणेश रामदासी (माहिती संचालक ) गोविंद अहंकारी यांनी प्रारंभी सर्वांचे स्वागत केले. सचिव तथा महासंचालक डॉ.  दिलीप पांढरपट्टे यांनी प्रास्ताविकात लघुपटनिर्मितीमागील पार्श्वभूमी सांगितली. मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिरुध्द अष्टपुत्रे यांनी सर्वांचे आभार मानले.

00000

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या उठावशिल्पाचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते अनावरण ◆ पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम

 



 कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोल्हापुरातील कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या उठाव शिल्पाचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील प्रमुख उपस्थित होते.

यावेळी आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, मधुरिमाराजे छत्रपती, यशराजे छत्रपती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, सीपीआर रुग्णालयाच्या बाह्य सम्पर्क वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमेश कदम व अन्य मान्यवर उपस्थित होते.

'राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा जपत हे सेवा रुग्णालय गरीब व गरजूंना चांगल्याप्रकारे वैद्यकीय सेवा देत आहे', असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.

              राजर्षी शाहू महाराज यांनी राज्यकारभार करताना सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडे देखील विशेष लक्ष दिले होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे द व्हिक्टोरिया डायमंड ज्युबिली हॉस्पिटल म्हणजे आजचे वैद्यकीय सेवा रुग्णालय होय. जून 1897 मध्ये "करवीर सरकारचे गॅझेट" मध्ये द व्हिक्टोरिया डायमंड जुबिली हॉस्पिटलच्या पायाभरणी समारंभाची  'तंतोतंत वेळेची' कार्यक्रम पत्रिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात या समारंभानिमित्त गरीबांना अन्नदान, वस्त्रदान, महाव्याधीग्रस्त  लोकांना भोजन, विद्यार्थ्यांना खाऊ वाटप आदी बाबींचा उल्लेख करण्यात आला असल्याची माहिती डॉ. उमेश कदम यांनी दिली.

या रुग्णालयाच्या ऐतिहासिक जुन्या इमारतीचा पायाभरणी समारंभ दि. 21 जून 1897 मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत झाला होता. 1897 मध्ये ‘द व्हिक्टोरिया डायमंड ज्युबिली हॉस्पिटल’ या नावाने सुरू झालेले हे रुग्णालय लष्करासाठी बांधण्यात आले होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा जपून सध्या अद्ययावत उपकरणांसह सज्ज असणारे हे  'सेवा रुग्णालय' गरीब व गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवा देत आहे.

रुग्णालयाच्या पायाभरणी समारंभाला 124 वर्ष पूर्ण होवून यावर्षी 125 व्या वर्षात पदार्पण होत आहे. या घटनेचे औचित्य साधून पायाभरणी समारंभाच्या दुर्मिळ छायाचित्रावरुन उठावशिल्प (म्युरल) साकारण्यात आले आहे. मालोजीराजे छत्रपती व मधुरिमाराजे छत्रपती यांच्या वतीने हे उठावशिल्प  रुग्णालयाला देण्यात आले आहे. हे शिल्प वास्तुशास्त्रज्ञ वैशाली चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आले आहे.

00000

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री सतेज पाटील यांचे विनम्र अभिवादन

 



 

कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर मधील दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी खासदार संजय मंडलिक, माजी मंत्री आमदार चंद्रकांत पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार जयंत आसगावकर, समरजितसिंह घाटगे, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे तसेच इतिहास संशोधक, राजर्षी शाहू प्रेमी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

00000

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले अभिवादन

 






 

कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थळ 'लक्ष्मी विलास पॅलेस' येथील राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ व खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

             यावेळी खासदार संजय मंडलिक, माजी मंत्री आमदार चंद्रकांत पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, इतिहास संशोधक, राजर्षी शाहू प्रेमी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

00000

शुक्रवार, २५ जून, २०२१

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या उन्नतीसाठी महत्वपूर्ण योजना

 



             राज्य शासनाच्या सामाजिक न्यायविभागामार्फत अनुसूचित जाती नवबौध्द घटकांसाठी त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना राबविल्या जातात. अनुसूचित जाती उपयोजनेच्या माध्यमातून एकूण 19 इतर शासकीय कार्यान्वयीन यंत्रणांच्या माध्यमातून 56 योजनांच्या अनुषंगाने निधी वितरीत केला जातो. सन 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये इतर शासकीय यंत्रणाना 113.97 कोटी रूपये निधी कोल्हापूर जिल्ह्यासाठी वितरीत करण्यात आला आहे, समाज कल्याण विभागामार्फत जिल्ह्यात सन 2020-21 मध्ये राबविण्यात आलेल्या योजनांबाबत समाज कल्याण विभागाचे कोल्हापूर जिल्हा सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांच्याशी माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी साधलेला संवाद...

          सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन उच्च शिक्षण घेता यावे तसेच विद्यार्थ्यांचे शिक्षणातील गळतीचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी  भारत सरकार शिष्यवृत्ती शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क इतर तत्सम शिष्यवृत्तीच्या महत्वाकांक्षी योजना राबविल्या जातात. या योजनेंतर्गत 34 हजार विद्यार्थ्यांना वर्षभरामध्ये लाभ देण्यात आला आहे.

          अनुसूचित जाती नवबौध्द कुटुंबांचे राहणीमान उंचवावे त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा यासाठी ग्रामीण शहरी भागामध्ये रमाई आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना (वैयक्तिक) धनगर समाजासाठी घरे बांधण्याची योजना अशा योजनांतर्गत पक्के घर बांधून देण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाते. या योजनेमार्फत 2 हजार 183 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. जातीयतेच्या कारणावरुन अत्याचाराला बळी पडलेल्या अनुसूचित जाती जमातीच्या 105 पिडीतांना वर्षभरात 141.06 लक्ष रुपये अर्थसहाय्य देवून त्यांचे पुनर्वसन केले आहे.

          जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातीच्या व्यक्ती चामडयाच्या वस्तु पादत्राणे दुरुस्ती या व्यवसायाच्या माध्यमातून उपजीविका करीत असतात. ऊन, वारा, पाऊस यापासून त्यांचे संरक्षण व्हावे तसेच त्यांची आर्थिक सामाजिक उन्नती व्हावी यासाठी या व्यवसायातील अनुसूचित जातीच्या 146 कामगारांना पत्र्याचे गटई स्टॉल मंजूर करण्यात आले आहेत.

          सहकाराच्या माध्यमातुन अनुसूचित जाती नवबौध्द घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने या घटकातील यंत्रमाग, निटींग गारमेंटस, सुत प्रोसेसिंग युनिटस, शेती माल प्रक्रीया, साखर कारखाने, खांडसरी कारखाना तत्सम उदयोगांना,   औद्योगिक संस्थांना अर्थसहाय्य दिले जाते. पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील भुमीहीन अनुसूचित जाती नवबौध्द शेतमजूर कुटुंबांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे, त्यांच्या राहणीमानात सुधारणा व्हावी  मजुरीवर असलेल्यांचे अवलंबित्व कमी व्हावे या उद्देशाने सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामार्फत ही योजना राबविण्यात येते.

          डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना, अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील बचत गटांना मिनी ट्रॅक्टर त्यांची उपसाधने पुरविणे योजना अनुसूचित जातीच्या नवउद्योजकांना केंद्र शासनाच्या स्टँडअप इंडिया या योजनेंतर्गत मार्जिन मनी उपलब्ध करुन देणे, तृतीय पंथीयांचे हक्काचे संरक्षण कल्याण योजना, ज्येष्ठ नागरीकांच्या कल्याणार्थ चरितार्थ त्यांचे जीवन सुसहय व्हावे, शारिरीक / मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावे, यासाठी राज्याचे सर्व समावेश धोरण राबविणे . महत्वकांक्षी योजनांची अंमलबजणी केली जाते.

          सामाजिक न्याय विभागांतर्गत जिल्हयामध्ये अनुसूचित जाती नवबौध्द मुलां/मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी याकरिता 18 शासकीय वसतिगृहे 4 शासकीय निवासी शाळा 23 विमुक्तजाती भटक्या जमातीच्या आश्रमशाळा आहेत. वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी पात्र असलेल्या परंतु वसतिगृहात प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जाती नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ दिला जातो. या आर्थिक वर्षामध्ये 167 इतक्या विद्यार्थ्यांना लाभ मंजूर करण्यात आला आहे. समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा अधिकाधिक विद्यार्थी नागरिकांनी लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी विहीत मुदतीत अर्ज/ प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.

        

000000